भारतीयांना ओट्सची गरजच काय?
ओट्ससारखे अमेरिकेमध्ये घोडे व
डुकरांचा खुराक म्हणून वापरले जाणारे धान्य कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी
उपयुक्त म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मुळात जिथे कोलेस्टेरॉलचा रक्तवाहिनी
चिंचोळी होण्याशी आणि पर्यायाने हार्ट अटॅकशी संबंध शंकास्पद आहे, तिथे ओट्स का खायचे? केवळ आरोग्यविषयक
नियतकालिके आणि आरोग्य विषयाला वाहिलेल्या पाश्चात्त्य चित्रवाहिन्यांवरील
आहारतज्ज्ञ तसे सांगतात म्हणून?
ज्या देशात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव आणि त्याहून
अधिक धान्ये पिकतात, त्यांनी आपल्या मातीत न पिकणारे धान्य का म्हणून खायचे? महत्त्वाचे म्हणजे
ओट्समधून आपल्याकडील या धान्यांपेक्षा फार पोषक तत्त्वे मिळतात असंही नाही.
ओट्सपेक्षा (३६१) अधिक आरोग्यदायी उष्मांक बाजरीतून (३८९) मिळतात. ओट्सहून (११)
अधिक चोथा बाजरीमधून (११.३) मिळतो. भारतीयांना अत्यावश्यक असणारी कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आदी तत्त्वे
ओट्सहून जास्त बाजरी किंवा नाचणीमधून मिळतात.
आहारशास्त्राच्या दृष्टीने विचार करता तृणधान्य व िशबीधान्य यांचे ५ : १ हे प्रमाण प्रथिनेच नव्हे, तर कबरेदके व ऊर्जा यांचे सर्वोत्तम पोषण देते; जे पुरवणारा अन्नपदार्थ म्हणजे आपला वरण-भात. महत्त्वाचे म्हणजे वरण-भात, दाल-रोटी, भाजी-भाकरी, दोसा-सांभार खाताना तुम्ही डाळी, भाज्या, औषधी व पाचक मसाले यांसोबत ते धान्य खाता. आणि तेही संपूर्णत: नसíगक स्वरूपात. याउलट, ओट्समधून मिळणारे पोषण एकांगी असते. ओट्स आपल्यासमोर येतात तेव्हा तो विविध कृत्रिम प्रक्रिया केलेला एक पदार्थ असतो; ज्यातून साखर, मीठ, प्रिझव्र्हेटिव्हज्सुद्धा आपल्या पोटात जातात. जे विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात. आपण नाचणी, बाजरी अशा देशी धान्यांचे सेवन वाढवले तर त्यांचा खपही वाढेल आणि त्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आपला थोडा हातभार लागेल. ओट्स खाऊन अमेरिकेची भर करण्यापेक्षा हे कधीही चांगलेच. नाही का?