*कलिंगडाच्या साली 33
मित्र निघून गेला. गंगू खिडकींतून शून्य मनानें कोठेतरी पाहात होती. परंतु काय असेल तें असो. तिचें आजारीपण गेले. तिची पाठ दुखेनाशी झाली. जयन्ता कां तिचें आजारीपण घेऊन गेला ? गंगू आता नोकरी करते. घरी सर्वांना मदत करते.
जयन्ता जाऊन आज वर्ष झालें होतें, गंगूनें एक सुरेखशीं आंगठी आणली होती.
‘आई, तुझ्या बोटांत घालूं दे.’
‘मला कशाला आंगठी ? तुम्ही मुलें सुखी असा म्हणजे झालें.
‘आई, जयन्ताची ही शेवटची इच्छा होती.’
‘त्याची इच्छा होती ? त्याची इच्छा कशी मोडूं ?’ मातेनें बोटांत आंगठी घातली. डोळ्यांतून पाणी आलें. मातेनें मुलाचें श्राद्ध केलें.
कांही वर्षांपूर्वीचा तो अनुभव. चारपांच वर्षे त्या गोष्टीला झाली. मी बोर्डीला गेलो होतो. तेथील सुंदर समुद्रशोभा रोज बघत होतो.
“तुम्हीं जवळचीं आदिवासींचीं गांवे बघायला याल ? चला, नाही म्हणूं नका.” एक मित्र म्हणाले.
“जाऊं.” मीं म्हटले.
आणि आम्हीं दोघे गेलो. पावसाळा नुकताच संपला होता. आजूबाजूला हिरवीं पिवळीं शेते. मधूनमधून नाले होते. बांधाबांधानें जात होतों. एका बाजूला गवताळ भाग दिसला.
“हें कां कुरण आहे ?” मीं विचारलें.
“ही खरें म्हणजें शेतीची जमीन आहे. परंतु गवताला भाव आहे म्हणून मालक गवतच करीत आहे.
पुन्हां गवताला खर्च नाहीं. एक राखोळी ठेवला म्हणजे झालें.” मित्र म्हणाला.
“तिकडे अधिक धान्य पिकवा मोहीम आहे आणि इकडे गवत वाढवलें जात आहे. हे कसें काय ?,”
“अधिकार्यांची मूठ भरली म्हणजे सारे चालते.”
“ही जमीन आदिवासींना का देत नाहीं ?”
“आदिवासींना कां शेती करायला येईल ? उद्यां स्वराज्यांत त्यांना मिलिटरीत पाठवावें.”
“आदिवासी का माणसें नाहींत ? तुमच्या शेतांतून तेच राबतात. तुमच्या वाड्या तेच करतात. त्यांना सारे येईल. मिलिटरींत वेळ आली तर सर्वांनी जायला हवें. देशाच्या रक्षणासाठीं उभे राहायला हवें. आदिवासींनींच कां जांवे ? पारश्यांनीं कां नये जाऊं ? तुम्हीं आम्हीं का नये जाऊं ?