*कलिंगडाच्या साली 8
आणि शुक्री कुठें होती ? एके दिवशीं धनजीभाईनें तिला पकडून आणलें. त्याच्या कोंडवाड्यांत ती गाय सांपडली. लांडग्याच्या तावडींत हरिणी सांपडली.
“तूं माझ्याकडे राहा. तो मंगळ्या तुला मारी, ताडी पिई. तूं इथें राहा. तूं माझी राणी तुला कांहीं कमी नाहीं पडणार, पोटभर खायला, सुंदर पातळ, गुलाबाचीं फुलें. राहा येथें शुक्री. “असें तो म्हणाला. तिनें त्याच्या हाताला कडकडून डांस घेतला. धनजी ओरडला. परंतु तो उंची दारू प्यायला होता. त्याच्या पशुतेंत तिच्या सतित्वाचा बळी घेतला.
दिवस जात होते. दंगल वाढणार असें वाटूं लागलें. सरकारनें मध्यस्थी करावी, असें कोणी म्हणूं लागले.
त्या दिवशीं एक सभा होती. सरकारी अधिकारी, जमिनदार, व्यापारी, यांचे पुढारी, आदिवासींचे पुढारी, सारे एकत्र जमले होते. काहीं उदार वृत्तीचे सज्जनहि होते. आदिवासी मंडळीत निरपेक्षपणें सेवा करणारेहि कांहीं होते. बोलणीं सुरू झालीं. मजुरीचा दर काय असावा, याविषयीं चर्चा झाली. तो प्रश्न सुटला.
“आमच्या मायबहिनींची अब्रूहि यांनी घेतली आहे, त्याचें काय? म्हातार्या बुध्यानें विचारलें.
“पुरावा आहे का?” सरकारी अधिकारी म्हणाले.
“पोर झाल्यावर पुरावा.” एक आदिवासी गंभीरपणें दु:खसंतापानें बोलला.
“या धनजीशेटनें पाप केलें कीं नाहीं विचारा. मंगळ्याची शुक्री याच्या पठाणानें पळवून नेली आणि एके दिवशीं रानांत तिला त्यांनी सोडलें. ती रडत होती. जीव देऊं पहात होती. मंगळ्या तुरुगांत. असे हें इंग्रजी राज्य. आमची अब्रू सुरक्षित नाहीं. आम्हीं का जनावरें ?” म्हातारा बुध्या बोलत होता.
“मग आतां म्हणणें काय?” एक जमीनदार म्हणाला.
“न्याय हवा.” बुध्या म्हणाला.
“शुक्रीला शंभर रुपये दंडाचे म्हणून धनजीशेटनें द्यावे.” अधिकारी म्हणाले.
“एखाद्या आदिवासीनें जमीनदाराची बायको पळवली असती तिला भ्रष्ट केलें असतें, तर त्या जमीनदाराच्या बायकोला शंभर रुपये दंड म्हणून आदिवासीनें द्यावे असें तुम्हीं म्हटले असतें का? त्या आदिवासीला तुम्ही पांचसात वर्षांची शिक्षा दिली असती. आदिवासी भगिनींची अब्रू म्हणजे का चार दिडक्या?” एक आदिवासी सेवक म्हणाला.