*कलिंगडाच्या साली 4
अंधार पडायची वेळ झाली. आज मजुरी चुकवायची होती.
“तुम्हीं बरोबर काम केलं नाहीं. मजुरी पुरी नाहीं मिळणार. आठ दिवसांत का इतकेंच गवत कापून झालं ? तुम्हीं कामचुकार लोक. ताडी पितां. काम नाहीं करीत. अधिक मजुरी कशाला ? ताडी प्यायला ? साले तुम्ही हरामखोर बनलां. तुम्हांला चिथावणी मिळते. याद राखा. हा धनजीभाई आहे. इंग्रज सरकारचें राज्य म्हणजे धनजीभाईचें राज्य. येरवड्याला पाठवीन एकेकाला. काम नाही करते. मजुरी मागते. साला बेकार कारभार !” धनजीभाई तिरस्कारानें, संतापानें बोलत होते.
“तुम्हीं मजुरी ठरल्याप्रमाणें द्या.” एकजण म्हणाला.
‘नाहीं दिलीत तर आम्ही संप करूं.’
‘येईल पाऊस, होईल नुकसान. आकाशांत आभाळ येतच आहे. मजुरी रीतसर दिलीत, तरच उद्यां विळे चालतील, आदिवासी बोलत होते. धनजीभाई अधिक मजुरी देईना. ते आदिवासी निघून गेले. आपापलीं गांवे सोडून ते आले होते. तेथें कुरणांतच लहान झोपड्या करून ते राहात होते. धनजीशेट तेथें बसून होता. थोड्या वेळानें तो पठाणास म्हणाला,
“लाला, उद्यां हे लोक कामावर येणार कीं नाहीं ? साले माजले ”
“मी दांडा मारून सर्वांना कामावर आणीन. हाडे मोडीन सगळ्यांचीं. तुम्हीं काळजी नका करूं. फिकीर मत करो, साब.”
“अच्छा. तो सबको सुबो कामपर लाना. ये दस रुपये तेरे वास्ते.” लाला दहा रुपयांची नोट खिशांत घालून गेला.
आदिवासी स्त्री-पुरुष मंडळी भाकर खाऊन एकत्र जमली होती. उद्यां काय करायचें याचा विचार चालला होता. संपावर जायची भाषा होती. सर्वच ठिकाणीं संप करावा, हा अन्याय कुठवर सहन करायचा, असें काहींचें म्हणणें होतें.
धनजीशेटला इंगा कळायलाच पाहिजे. आमच्या श्रमावर बेट्याची मिजास. आम्हांला दोन दिडक्या देतो, स्वत: बंगले बांधतो. आम्हांला खायला नाहीं, याच्या चार मोटारी, आमची ताडी याला दिसते, आणि स्वत: उंची दारू पितो. धनजीशेटचें राज्य दूर केलेंच पाहिजे. “एक तेजस्वीं तरुण म्हणाला.”
सर्वांनी माना डोलावल्या. रात्र बरीच झाली. सारे आपल्या झोंपड्यांत गेले. कोणी बाहेर गवतावरच झोंपले. ना सापांचे भय, न थंडीवार्याचे, पहांटेच्या दंवाचें.