*कलिंगडाच्या साली 24
“वर्तमानपत्रांतून आमची हकीगत कोण देतो ?”
“नवीं वर्तमानपत्रें निघतील. समाजवादी पक्षाचीं निघतील. तीं तुमच्या दु:खाला वाचा फोडतील.”
“छान होईल. समाजवादी पक्षाला यश येवो.”
“यश तुम्ही द्यायचें. सर्वत्र समाजवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा. समाजवाद, असें सर्वत्र झालें पाहिजे. हें आपलेंच काम आहे.”
“आमच्याकडे कोणीहि पाठवीत जा. आम्ही करूं संघटना. समाजवादी पक्षाला ती जोडूं.”
“छान! मी येतो आतां.”
त्यांचा निरोप घेऊन मी गेलो. परंतु हिंग फोडणार्या बंधुभगिनींचे ते भिणभिण करणारे डोळे सारखे माझ्या डोळ्यांसमोर येत असतात. पळींत फोडणी पाहिली की तीं आंधळी होणारी, हिगाच्या उग्र दर्पांत जळणारीं तीं जीवने माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात. वर्तमानपत्रांतल्या हिंगाच्या जाहिराती वाचून माझ्या मनांत अपार विचार उसळतात. त्या श्रमणार्यांना किती दिवस हें असें नरकप्राय जीवन कंठावें लागणार ? ना आनंद, ना विश्रांति. आणि अखेरीस तो आंधळेपणा !
याला उपाय एकच. समाजवादी समाजरचना निर्माण व्हायला हवी. सर्वांना शाश्वती हवी. सर्वांची जीवनें मोलाची आहेत ही जाणीव तेंव्हाच येईल. आजच्या समाजरचनेत मानवी जीवन मातीमोल आहे. आजची रचना मानवभक्षक आहे, मानवसंहारक आहे. ही रचना मानवरक्षक, जीवनविकासक अशी करायची आहे. सारे समाजवाद आणण्यासाठीं धडपडूं, तरच हें होईल. तोच युगधर्म मानवधर्म!