*कलिंगडाच्या साली 13
“मग जिवंत कसं ठेवूं ? माझ्या बेअब्रूची ही खूण ! माझे लोक काय म्हणतील ? माझ्या जातींत असलं मूल नको. गोरं परंतु उद्यां करणीनं काळं होणारं श्रीमंतांची ही अवलाद. गरिबांचं रक्त पिणारं, त्यांचं हें बीज. नको, नको हें मूल. मी कसं तोंड दाखवूं ? मी देवाला आळवीत होतें की काळं मूल जन्मूं दे. माझ्या पतीचं मूल. परंतु हें धनजीचें पाप फळलं. मला तें गाडूं दे.”
पोलिसांनीं तिला पकडलें. तें मूल बरोबर घेतलें. शुक्रीला अटक झाली. ती तुरुंगांत होती. धनजीशेटनें हजारों रुपये अधिकार्यांना दिले तें मुल पुरलें गेलें. मुलाचा पुरावा दूर करण्यात आला. शुक्रीवर
मात्र खटला भरण्यांत आला. शुक्रीला सात वर्षांची शिक्षा देण्यांत आली.
“मंगळ्या कुठं आहे ? तो सूडबुद्धीनं पेटला आहे. धनजीशेटची खांडोळी करीन तरच नांवाचा मंगळ्या!” अशी त्यानें प्रतिज्ञा केली. एके दिवशीं रात्रीं धनजीशेट आपल्या बंगल्याबाहेर अंगणांत बसले होते. हातांत फुलें होतीं. मंगळ्या दारूनें तर्र झाला होता. त्यांच्या हातांत कुर्हाड होती. तों आंत आला. धनजीशेटच्या डोक्यांत त्यांने कुर्हाड घातली. एक भेसूर किंकाळी ! पुन्हां घाव घालण्यांत आले. धनजीशेट तेथें मरून पडले. घरांतील मंडळी धांवून आली. गडीमाणसें धांवलीं. तेथील आकांत कोण वर्णील ?
मंगळ्याच्या खटल्याचा निकाल लागून त्याला फांशीची शिक्षा देण्यांत आली. तुरुंगातील फांशीकोठ्यांत तो आहे. तो शान्त आहे. एकदा शुक्री भेटली तर बरे होईल असें त्याच्या मनांत येई. एके दिवशीं, त्यानें तुरुंगाच्या अधिकार्यांस प्रार्थना केली. शुक्री त्याच तुरुंगातील औरतकोठ्यांत होती. तिनें सारी हकिगत ऐकली होती. तिनें अन्न जवळ जवळ वर्ज्य केलें होतें. तिच्या जीवनातील सारा आनंद निघून गेला होता.
फांशीकोट्याच्या कोठडींत मंगळ्या बसला आहे आणि शुक्री बाहेर उभी आहे. सभोंवती पोलीस आहेत.
“शुक्री, रडूं नको. त्या पाप्यानें पापाचा पुरावा दूर करवून, तुला बदनाम करून तुला शिक्षा देवविली. मी त्याचा सूड घेतला. मी सुखानं मरेन. तुझी वरती वाट पाहात बसेन. तिथं भेटूं हंसू, खेळूं. पूस तें डोळे. रानांत जशी हंसत असस तशी ऐकदां हांस बघूं. तुझ्या प्रेमासाठीं मी मरत आहे. मंगळ्यानं तुला
कधीं थपडा मारल्या असतील त्या विसरून जा. शुक्री, एके दिवशीं तुला झाडांला बांधून मी झोडपलं । मीं ताडी पिऊन आलों होतों. पशु बनलों होतों. परंतु दुसर्या दिवशीं, मी तुझं अंग चेपलं. तूं मंगळ्याचं वाईट विसर, भले तें आठव.” त्याला बोलवेना.
“मी कशी जगूं? तुरुंगांत मी तिकडे, तुम्ही इकडे. अशीं राहिलों असतों तरीहि थोडी आशा होती. परंतु तुम्हीं कायमचे जाणार ? माझेहि प्राण जावोत ! असें बोलत शुक्री रडूं लागली.