Android app on Google Play

 

प्रकरण २०

 

८ ऑक्टोबर १९१२ च्या पत्रात ती म्हणते,

" अंटार्क्टीकावरील पाँटींगने काढलेल्या फोटोंचा मी एक छोटेखानी शो ठेवला होता. लॉर्ड कर्झनपासून अनेकांनी त्याला हजेरी लावली होती. तुझ्या मोहीमेचे फोटो पाहून सर्वांना खूप आनंद झाला.

अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी एव्हाना तुला न्यूझीलंडमधून किंवा कदाचित धृवावरच मिळाली असेल. तुला काय वाटलं असेल याची मी कल्पनाही करु शकत नाही ! सुरवातीला त्याचा फार मोठा गाजावाजा झाला, परंतु आता मात्रं लोक त्याला फारसं महत्वं देईनासे झाले आहेत. विशेषतः तुझ्या मोहीमेत तू शास्त्रीय संशोधनाचं जे कार्य करत आहेस, ते लोकांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे !

त्याने तुला फसवून चकवलं असं बहुतेकांचं मत आहे. मी याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. त्याने त्याचा मार्ग पत्करला होता आणि त्याचं लक्ष्यं निवडलं होतं. सर्वप्रथम धृवावर पोहोचल्यावर त्याच प्रयत्नात असलेल्या इतरांचा त्याने एका शब्दानेही उल्लेख केलेला नाही, परंतु त्याने तुझ्या मार्गात आडकाठी न करता आपला वेगळा मार्ग निवडला होता हे मान्यं करावंच लागेल.

इंग्लंडमध्ये सर्वांना तुझ्याबद्दल किती अभिमान आहे याचा मला खूप आनंद आहे ! लवकर घरी परत ये ! मी आणि पीटर तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत !"
बिचारी कॅथलीन !  आपल्या पतीने सहा महिन्यांपूर्वीच रॉस आईस शेल्फवर शेवटचा श्वास घेतल्याची तिला काहीही कल्पना नव्हती !


कॅथलीन आणि पीटर स्कॉट

केप इव्हान्सला असताना अ‍ॅटकिन्सनने आपल्या सहका-यांसमोर दोन पर्याय ठेवले होते. दक्षिणेला स्कॉटचा शोध अथवा कँपबेलच्या तुकडीपर्यंत पोहोचणे. परंतु कँपबेलच्या तुकडीच्या शोधात जाण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे पृष्ठभागावरील बर्फ अद्यापही पुरेसा टणक नव्हता. तसंच त्यांच्या शोधात केप आद्रेला गेलेल्या टेरा नोव्हाने त्यांना गाठल्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. सर्वानुमते पोलर पार्टीचा शोध घेण्याची योजना आखण्यात आली.

२९ ऑक्टोबरला अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने कुत्रे आणि सात खेचरांसह केप इव्हान्सहून दक्षिणेची वाट पकडली. जुन्या मार्गानेच एक टन डेपो गाठून पुढे तपास करण्याचा त्यांचा बेत होता.

७ नोव्हेंबरला कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचली ! वाटेत हट पॉईंटला त्यांना अ‍ॅटकिन्सनचा पेनेलसाठी ठेवलेला संदेश मिळाला. खेचरं आणि कुत्र्यांसह पोलर पार्टीच्या शोधात दक्षिणेला जात असल्याचा त्यात उल्लेख होता. कॅंपबेल केप इव्हान्सला पोहोचला तेव्हा तिथे फक्त डेबनहॅम आणि आर्चर हे दोघेजणच हजर होते.


अ‍ॅबॉट, कँपबेल, डिकसन, प्रिस्टली, लेव्हीक आणि ब्राउनिंग - केप इव्हान्स, ७ नोव्हेंबर १९१३

तब्बल दहा महिन्यांनी ते सर्वजण केप इव्हान्सला परतले होते !

स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सच्या शोधात असलेल्या अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला, परंतु स्कॉट  तिथे पोहोचल्याचं दर्शवणारा एकही पुरावा तिथे आढळला नाही. डेपोच्या परिसरात बारकाईने शोध घेऊनही त्यांची कोणतीही खूण न आढळल्यावर अ‍ॅटकिन्सनने आणखीन दक्षिणेला त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

१२ नोव्हेंबरला अ‍ॅटकिन्सनची तुकडी दक्षिणेच्या मार्गावर होती. एक टन डेपोपासून सुमारे दहा मैलांवर आघाडीवर  असलेल्या राईटला बर्फाचा एक लहानसा ढिगारा दिसला. त्या बर्फातून बाहेर डोकावणा-या एका वस्तूने राईटची उत्सुकता चाळवली. सुरवातीला ते काय असावं याचा त्याला अंदाज येईना, परंतु जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

तो तंबूच्या वरच्या टोकाचा भाग होता !

हिमवादळाने तंबूवर बर्फाचा थर जमा झालेला होता. तंबूचं दार कोणत्या दिशेला असावं याची राईटला कल्पना येत नव्हती. आपल्या सहका-यांचं लक्ष्यं वेधण्यासाठी राईटने त्यांना खुणा करण्यास सुरवात केली, परंतु त्याच्या खुणांचा त्याच्या सहका-यांना अर्थ लागत नव्हता.

" त्यांना मोठ्याने हाक मारुन तिथल्या शांत आणि पवित्रं वातावरणाचा भंग करण्याची माझं धैर्य झालं नाही !" राईट म्हणतो.

अ‍ॅटकिन्सन आणि चेरी-गॅराडला गाठून राईटने त्याला तंबूची माहीती दिली. चेरी-गॅराड म्हणतो,
" राईटने आम्हाला त्याला आढळलेल्या तंबूची माहीती दिली. गेल्या वर्षीच्या आमच्या एका मार्करच्या शेजारी आम्हाला केवळ बर्फाचा एक ढिगारा दिसत होता. राईटला तो तंबू असल्याची खात्री नक्की कोणत्या गोष्टीमुळे पटली होती हे मला कळेना ! आम्ही जवळ जाऊन पाहीलं तरीही बर्फाशिवाय आम्हाला काही दिसेना. आमच्यापैकी कोणीतरी ढिगा-या वरच्या भागात असलेला बर्फ बाजूला केला आणि तंबूच्या वरच्या भागात असलेली खिडकी आमच्या नजरेस पडली !"
" प्रत्येकाचा डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या !" विल्यमसन म्हणतो, " गेल्या आठ महिन्यांपासून या प्रसंगाला सामोरं जावं लागेल याचा अंदाज असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवणं अशक्यं झालं होतं ! आमच्यासमोर असलेल्या तंबूत नक्की काय पाहण्यास मिळेल या कल्पनेनेच माझी छाती दडपली होती !"
अ‍ॅटकिन्सनने प्रत्येकाला आळीपाळीने तंबूच्या आत शिरुन पाहणी करण्याची सूचना केली.

" मी कितीतरी वेळ आत जाण्याचं टाळत होतो !" विल्यमसन म्हणतो, " आतलं दृष्यं मी पाहू शकणार नाही याची मला भीती वाटत होती. अखेर हिम्मत करुन मी आत गेलो आणि समोर जे दिसलं ते पाहून काही क्षणांत बाहेर आलो ! स्लिपींग बॅगमध्ये गोठलेल्या अवस्थेतील मृतदेहांपैकी एक कॅप्टन स्कॉट आहे हे माझ्या ध्यानात आलं. इतरांचे चेहरे पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही !"

कॅप्टन स्कॉट मध्ये होता. त्याच्या एका बाजूला बॉवर्स आणि दुस-या बाजूला विल्सन होता. विल्सनचं डोकं आणि छाती तंबूला आधार देणा-या खांबाला विळखा घातलेल्या अवस्थेत होती. विल्सन आणि बॉवर्स दोघंही पूर्णपणे स्लिपींग बॅगमध्ये बंदिस्त होते. रात्री झोपेतच मृत्यूने त्यांना गाठलं असावं ! स्कॉटच्या कमरेच्या वरचा भाग स्लिपींग बॅगच्या बाहेर होता. त्याच्या चेहरा वेदनेने पिळवटलेला होता. अखेरच्या क्षणी त्याला ब-याच यातना झाल्या असाव्यात ! अत्यंत कमी तापमानामुळे त्यांची त्वचा पिवळसर पडली होती आणि काचेप्रमाणे चकाकत होती. प्रचंड प्रमाणात फ्रॉस्टबाईटच्या खुणा त्यांच्या मृतदेहांवर दिसून येत होत्या.

अ‍ॅटकिन्सनने तंबूत आढळलेली सर्व कागदपत्रं ताब्यात घेतली. स्कॉट, विल्सन, बॉवर्स - तिघांच्याही डाय-या, स्कॉटने लिहीलेली पत्रं. बॉवर्स आणि विल्सनने केलेल्या शास्त्रीय निरिक्षणांच्या नोंदी यांचा त्यात समावेश होता. विल्सनच्या सूचनेवरुन जमा करण्यात आलेले शास्त्रीय नमुने अ‍ॅटकिन्सनने आपल्या कँपमध्ये नेले. हे काम आटपल्यावर स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. स्कॉटच्या स्लेजच्या अवशेषांमध्ये ग्रान आणि विल्यमसनला योगायोगानेच नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने अ‍ॅमंडसेनने लिहीलेलं पत्रं आणि स्कॉटच्या नावाने लिहीलेली चिठ्ठी सापडली होती !


अ‍ॅमंडसेनचे राजा हकून ७ वा याला लिहीलेले मूळ नॉर्वेजियनमधील पत्रं

" त्यांच्या चिरविश्रांतीत आम्ही कोणताही व्यत्यय आणला नाही !" चेरी-गॅराड म्हणतो, " त्यांच्या मृतदेहांना आम्ही स्पर्शही केला नाही. सर्वजण बाहेर आल्यावर तंबूला आधार देणारे बांबू आम्ही काढून घेतले. आपसूकच तंबूच्या कापडाने त्यांचे मृतदेह झाकले गेले !"

तंबूच्या कापडावर बर्फाचा मोठा ढिगारा रचण्यात आला.  त्यावर ग्रानच्या स्कीईंगच्या फळ्यांपासून बनवलेला मोठा क्रॉस उभारण्यात आला. स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सला अखेरची मानवंदना देऊन सर्वांनी काही अंतरावर असलेला कँप गाठला.


स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांची अंतिम चिरनिद्रा - रॉस आईस शेल्फ - १२ नोव्हेंबर १९१३

आपल्या तंबूत बसून अ‍ॅटकिन्सन स्कॉटची डायरी वाचत होता. ज्याला कोणाला डायरी मिळेल त्याने ती पूर्ण वाचावी आणि परत आणावी अशी स्कॉटने कव्हरवर सूचना लिहीली होती ! आपल्या सहका-यांना एकत्र करुन अ‍ॅटकिन्सनने स्कॉटने ब्रिटीश जनतेच्या नावाने लिहीलेलं पत्रं वाचून दाखवलं. ओएट्सच्या मृत्यूची आणि त्याच्या असामान्य त्यागाची हकीकत सर्वांसमोर यावी अशीही स्कॉटने इच्छा व्यक्त केली होती.

ओएट्सच्या मृतदेहाचा शोध घेण्याचाही त्यांनी बराच प्रयत्न केला. दक्षिणेला काही मैलांवर त्यांना ओएट्सची स्लिपींग बॅग आढळली, परंतु त्याच्या मृतदेह मात्रं आढळला नाही. स्लिपींग बॅग मिळालेल्या ठिकाणी ओएट्सच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी बर्फावर दुसरं स्मारक उभारलं.

१५ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने लंडनच्या क्वीन्स हॉलमध्ये दक्षिण धृवावरील आपल्या मोहीमेची सविस्तर काहणी सांगणारं व्याख्यान दिलं. कॅथलिन स्कॉट प्रेक्षकांमध्ये उपस्थीत होती ! आपल्या मोहीमेचे अनेक फोटोही अ‍ॅमंडसेनेने सर्वांना दाखवले. कॅथलिनच्या मते त्यातील बहुतांश फोटो हे अगदीच हलक्या दर्जाचे आणि बनावट होते ! व्याख्यानानंतर कोणीतरी अ‍ॅमंडसेनला विचारलं,

" दक्षिण धृवावर पोहोचून तू काय मिळवलंस ? "
अ‍ॅमंडसेनने प्रश्नकर्त्याकडे रोखून पाहीलं.

" सामान्यं माणसं फक्तं दोन वेळचं जेवण मिळवण्याचाच विचार करू शकतात ! मी तो विचार कधीच करत नाही !"
रॉयल जॉऑग्राफीक सोसायटीसमोर अ‍ॅमंसेनने केलेल्या भाषणाच्या वेळी तर लॉर्ड कर्झनने दक्षिण धृवीय मोहीमेचं श्रेयं हे अ‍ॅमंडसेनचं नसून स्लेजच्या कुत्र्यांच्या तुकडीचं आहे हेच जणू सूचित केलं.

" थ्री चिअर्स फॉर द डॉग्ज !"
लॉर्ड कर्झन उद्गारला !

कर्झनचे हे उद्गार अ‍ॅमंडसेनला अर्थातच रुचले नाहीत, परंतु त्याने त्यावेळेस वाद घालणं हे श्रेयस्कर नव्हतं असा अ‍ॅमंडसेनचा विचार होता.

अ‍ॅमंडसेनला भाषणाला बोलावल्याच्या निषेधार्थ क्लेमंट्स मार्कहॅमने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता ! रॉयल सोसायटी आणि ब्रिटीश जनता अ‍ॅमंडसेनची धोकेबाज म्हणूनच संभावना करत होती.

रॉस आईस शेल्फवरुन हट पॉईंटकडे परतीच्या वाटेवर असताना ग्रानने स्कॉटच्या स्कीईंगच्या फळ्या चढवल्या.

" स्कॉट नाही पण निदान त्याच्या स्कीईंगच्या फळ्यांचा तरी प्रवास पूर्ण होईल !" ग्रान म्हणाला.

व्हिक्टर कँपबेलच्या तुकडीबद्दल अद्यापही अ‍ॅटकिन्सनला काहीच कल्पना नव्हती. घाईघाईतच त्याने हट पॉईंटची वाट धरली. २७ नोव्हेंबरला ते हट पॉईंटला येऊन पोहोचले. कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचल्याचा संदेश मिळाल्यावर अ‍ॅटकिन्सनने सुटकेचा नि:श्वास टाकला !

" स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स एक टन डेपोपासून फक्त ११ मैलांवर असताना मरण पावले !" चेरी-गॅराडने विषादाने आपल्या डायरीत नोंद केली, " ते ११ मैलांवर येऊन पोहोचलेले असताना आम्ही एक टन डेपोवरुन परत फिरलो असतो, तर मी स्वतःला कधीच क्षमा करु शकलो नसतो ! पण आम्ही परत फिरल्यावर दहा दिवसांनी ते त्यांच्या अंतिम मुक्कामाला पोहोचले होते. अर्थात आम्ही परत निघालो तेव्हा आमच्यापासून ते अवघ्या ६० मैलांवर असतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. आम्हांला मिळालेल्या आदेशाचं आम्ही पालन केलं, परंतु इतक्या जवळ असूनही आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही हा सल मला आयुष्यभर राहील !"
स्कॉटच्या शारिरीक क्षमतेविषयी चेरी-गॅराड म्हणतो,

" मोहीमेला सुरवात झाली तेव्हापासून माझ्या मनात स्कॉटच्या शारिरीक क्षमतेविषयी शंका होती. स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचू शकणार नाही अशी माझी कल्पना होती. बिअर्डमूर ग्लेशीयरवरुन दक्षिणेला जाताना तर स्कॉटची दमछाक झाली असावी अशी माझी पक्की खात्री झाली होती. मात्रं स्कॉटचा मृतदेह पाहील्यावर त्याचं शारिरीक सामर्थ्य आणि कष्ट करण्याची क्षमता याची मला कल्पना आली. बॅरीअरवर घोंघावणा-या वादळातून स्लेज ओढत एक टन डेपोपासून फक्त ११ मैल अंतरापर्यंत पोहोचण्यात तो यशस्वी झाला होता. दुर्दैवाने शेवटच्या क्षणी त्याचे प्रयत्न अपुरे पडले होते !"

ग्रानचा दृष्टीकोन मात्रं थोडा वेगळा होता. तो म्हणतो,
" चेरी-गॅराडला नॅव्हीगेशनची थोडीजरी कल्पना असती तर स्कॉटला वाचवणं शक्यं होतं असं मला राहून राहून वाटतं ! आमच्या तुकडीतील जवळपास प्रत्येकजण जरुरीपेक्षा जास्त सहनशील आणि संयमी आहे ! कधीकधी मदतीसाठी रान उठवणं हे फार उपयोगी पडतं ! मात्रं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आपल्या सहका-यांचा जीव धोक्यात घालणं हे स्कॉटला कधीही मंजूर झालं नसतं ! त्याच्यासाठी हा प्रतिष्ठेचाही असण्याची शक्यता होती ! शॅकल्टन कोणत्याही मदतीविना ८८ अंश अक्षवृत्तापार पोहोचून परत आला होता, तर आपण कोणत्याही मदतीविना धृवावर पोहोचून परत येऊ शकतो हे सिध्द करण्याचा स्कॉटने विचार केला असावा !
अ‍ॅटकिन्सनमध्ये उत्कृष्ट नेतृत्वगुण असले, तरी तो वेगळा विचार करताना दिसत नाही. पोलर पार्टीचा शोध घेण्यास त्याने काही दिवस लवकर हालचाल केली असती तर... अर्थात जे झालं ते खूप दुर्दैवी आहे !"
होबार्ट येथे अ‍ॅमंडसेनने हकालपट्टी केलेला योहान्सन नॉर्वेला परतला. अ‍ॅमंडसेनने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. मोहीमेशी संबंधीत असलेल्या कोणत्याही समारंभात योहान्सनला सहभागी करून घेऊ नये अशी तार त्याने नॉर्वेजियन जॉग्रॉफीक सोसायटीला आधीच पाठवली होती. आपल्या पुस्तकातही त्याने योहान्सनने प्रेस्टर्डचा जीव वाचवण्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख केला नाही !  दक्षिण धृवावरील नॉर्वेजियन मोहीमेच्या यशाच्या स्मरणार्थ नॉर्वेचा राजा ७ वा हकून याने जाहीर केलेलं ' मेडल ऑफ द साऊथ पोल ' योहान्सनला देण्यासही अ‍ॅमंडसेनने विरोध दर्शवला होता, मात्रं राजापुढे त्याची डाळ शिजली नाही !

अ‍ॅमंडसेनने चालवलेल्या या उपेक्षेमुळे योहान्सनला नैराश्याने ग्रासलं. त्याचं दारू पिणं प्रमाणाबाहेर वाढत गेलं. तो डिप्रेशनची शिकार झाला !

४ जानेवारी १९१३ ला जॅल्मर योहान्सनने नॉर्वेत आत्महत्या केली !

योहान्सनच्या या शोकांतिकेला अ‍ॅमंडसेन ब-याच अंशी जबाबदार होता.


फ्रेड्रीक जॅल्मर योहान्सन

१८ जानेवारीला केप इव्हान्स इथे असलेल्या ग्रानला त्यांच्या दिशेने येणारं जहाज दृष्टीस पडलं !

टेरा नोव्हा !

स्कर्व्हीने ग्रस्त झालेल्या टेडी इव्हान्सची ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅमंडसेनची भेट झाली होती. लंडनला परतल्याव योग्य ते उपचार घेतल्यावर इव्हान्सची प्रकृती सुधारली. त्याला कमांडरची बढती देण्यात आली आणि स्कॉटच्या मोहीमेला अंटार्क्टीकाहून परत आणण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली !

" तुम्ही सर्व जण ठीक आहात ना ?" इव्हान्सने टेरा नोव्हाच्या मेगाफोनवरुन विचारणा केली !
" पोलर पार्टीतील सर्वजण मरण पावले !" कँपबेल उत्तरला, " आमच्यापाशी त्यांचे सर्व दस्तावेज सुरक्षित आहेत !"

१९ जानेवारी १९१३ - टेरा नोव्हाने केप इव्हान्स सोडलं !

" अखेर आम्ही केप इव्हान्सची आमची जुनी झोपडी कायमची सोडली !" चेरी-गॅराडने आपल्या डायरीत नोंद केली, " बोटीवरुन मार्गक्रमणा ही कल्पना किती सुखद आहे ! जेवढं अंतर चालत पार करण्यास आम्हाला संपूर्ण दिवस लागत होता, ते अंतर तासाभरात कापलं जातं आहे ! ताजे अन्नपदार्थ आणि संगीत, घरुन आलेली खुशालीची पत्रं... केप इव्हान्स सोडताना मी आनंदात आहे. गमावलेल्या सहका-यांच्या वियोगाचं दु:ख शब्दात वर्णन न करण्यासारखं असलं, तरी त्याला आमचा इलाज नाही !"

टेरा नोव्हा परत येण्यापूर्वीच स्कॉट आणि इतरांच्या स्मरणार्थ हट पॉईंटवरील 'ऑब्झर्वेशन हिल' येथे लाकडाचा क्रॉस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २० जानेवारीला हट पॉईंटच्या किना-यावर टेरा नोव्हा आल्यावर अ‍ॅटकिन्सन, चेरी-गॅराड, राईट, लॅशी, क्रेन, डेबनहॅम, कोहेन आणि सुतार विल्यम्स यांनी हा क्रॉस उभारला.


स्कॉट मेमोरीयल क्रॉस - ऑब्झर्वेशन हिल, हट पॉईंट - २० जानेवारी १९१३

२१ जानेवारी १९१३ - टेरा नोव्हाने हट पॉईंटहून न्यूझीलंडची वाट पकडली !

पहाटेचे २.३० वाजले होते. न्यूझीलंडमधील ओमारु या लहानशा बंदरात एक भलंमोठं जहाज शिरलं होतं !

काळोखातच जहाजावरुन एक लहानशी बोट पाण्यात सोडण्यात आली. त्या बोटीतून दोन माणसं बंदरावर गेली. बंदरावरील दिपस्तंभाकडून त्या जहाजाला सतत विचारणा करणारे संदेश पाठवले जात होते, परंतु जहाजाकडून उत्तर येत नव्हतं.

१० फेब्रुवारी १९१३ - टेरा नोव्हा ओमारू बंदरात पोहोचलं होतं !

बोटीतून किना-यावर गेलेले दोघंजण अ‍ॅटकिन्सन आणि पेनेल होते. त्यांनी इंग्लंडला तार पाठवली. तार पाठवल्यावर चोवीस तास कोणाशीही संपर्क न साधण्याचं त्यांच्यावर बंधन होतं !

१२ फेब्रुवारीला टेरा नोव्हा लिटल्टन बंदरात पोहोचलं. बंदरातील सर्व जहाजांची शिडं आणि ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते !

अंटार्क्टीकाहून परत येत असलेल्या आपल्या पतीचं स्वागत करण्यासाठी कॅथलीन स्कॉट मुद्दाम न्यूझीलंडला आली होती. स्कॉटच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करणं अशक्यं आहे !

अमेरीकेतील विस्कॉन्सीन राज्यातील मेडीसन इथे एका हॉटेलमधील आपल्या रुममध्ये एक माणूस अस्वस्थपणे येरझा-या घालत होता. स्कॉट आणि त्याचे चार सहकारी १७ जानेवारी १९१२ रोजी दक्षिण धृवावर पोहोचल्याचं आणि परतीच्या वाटेवर २९ मार्च १९१२ च्या सुमाराला मरण पावल्याची बातमी नुकतीच त्याच्या कानावर आली होती !

रोनाल्ड अ‍ॅमंडसेन !

" हॉरीबल ! हॉरीबल !" अ‍ॅमंडसेन उद्गारला. त्याचे डोळे भरून आले होते, " कॅप्टन स्कॉटचा तो शेवटचा संदेश वाचताना मी स्वतःला आवरू शकत नाही ! मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नसलो, तरीही तो एक अत्यंत शूर पुरुष होता. जा तीन गुणांनी माणसाचं व्यक्तीमत्वं झळाळून उठतं ते प्रामाणिकपणा, शौर्य आणि संस्कार हे तिन्ही गुण त्याच्यात होते ! मृत्यूला कसं सामोरं जावं हे त्याने जगाला दाखवून दिलं !"
रॉस आईस शेल्फवर स्कॉट आणि त्याचे सहकारी जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर संघर्ष करत असताना आपण ऑस्ट्रेलियात व्याख्यानांच्या दौ-यात मग्न होतो या जाणीवेने अ‍ॅमंडसेन व्यथित झाला होता.

स्कॉट आणि त्याच्या सहका-यांच्या मृत्यूच्या बातमीने इंग्लंड शोकसागरात बुडालं. स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झाला हीच त्या दु:खाला सुखद किनार होती. ब्रिटीश जनतेच्या दृष्टीने स्कॉट हाच खरा हिरो होता ! अ‍ॅमंडसेन सर्वप्रथम दक्षिण धृवावर पोहोचला असला तरी स्कॉटच्या मृत्यूने त्याचं यश झाकोळलं गेलं होतं. इंग्लीश वृत्तपत्रांनी तर दक्षिण धृवावर धारातिर्थी पडलेला हुतात्मा असंच स्कॉटचं चित्रं रंगवलं.

इंग्लंडमध्ये एक मिथक लगेच निर्माण झालं. इंग्लीश वृत्तपत्रांच्या मते स्कॉटने आपली मोहीम प्रामाणिकपणे आणि नियोजनपूर्ण राबवली होती ! अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर आधी पोहोचला याचं एकमेव कारण म्हणजे त्याने आपलं सामान वाहून नेण्यासाठी कुत्र्यांच्या स्लेजचा वापर केला होता. त्या कुत्र्यांचा अन्नासाठी वापर करण्यासही त्याने मागेपुढे पाहीलं नाही ! उलट स्कॉट पारंपारीक ब्रिटीश पध्दतीने चालत दक्षिण धृवावर पोहोचला होता. त्यातच अ‍ॅमंडसेन व्यावसायिक संशोधक होता. उच्चभ्रू ब्रिटीश समाजधुरीणांच्या मते 'व्यावसायिक ( प्रोफेशनल )' असलेल्या अ‍ॅमंडसेनने मिळवलेल्या कोणत्याही यशाची शाही नौदलातील अधिका-यापुढे शून्य किंमत होती ! टेरा नोव्हा मोहीमेतील स्कॉटची डायरी आणि विशेषतः ब्रिटीश जनतेच्या नावाने त्याचा संदेश प्रसिध्द झाल्यावर तर याला आणखीनच खतपाणी मिळालं. स्कॉटच्या निर्विवाद लेखनकौशल्याचा हा विजय होता ! कोणत्याही टीकेच्या पार गेलेला ' ट्रॅजीक हिरो ' अशी स्कॉटची असलेली प्रतिमा ब्रिटीश जनतेच्या मनात वर्षानुवर्षे दृढ होत गेली.

दर्यावर्दी संशोधकांच्या वर्तुळात मात्रं अ‍ॅमंडसेनचं नाव पूर्वीइतक्याच आदराने घेतलं जात होतं. एर्नेस्ट शॅकल्टनने अ‍ॅमंडसेनचा ' धृवीय प्रदेशातील सर्वोत्कृष्ट संशोधक ' म्हणून नावाजलं होतं. फ्रिट्झॉफ नॅनन्सने अ‍ॅमंडसेननवर टीका करणा-यांना खरमरीत पत्रं लिहून झापलं होतं !

दक्षिण धृवाच्या मोहीमेवरुन नॉर्वेला परतल्यावर उत्तर धृवाच्या मोहीमेवर जाण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. मात्रं १९१४ मध्ये पहिल्या महायुध्दाला सुरवात झाल्याने त्याला आपला हा बेत पुढे ढकलावा लागला.

पहिलं महायुध्द संपल्यावर, १९१८ मध्ये ' मॉड ' या जहाजातून अ‍ॅमंडसेन उत्तर धृवाच्या मोहीमेवर निघाला. अलास्कातून निघून बेरींगच्या सामुद्रधुनीमार्गे उत्तर धृव ओलांडण्याचा त्याचा बेत होता. दक्षिण धृवावर पोहोचलेल्या आपल्या सहका-यांना त्याने या मोहीमेसाठीही आमंत्रित केलं होतं. जालांड आणि हॅसलने त्याला नकार दिला. हॅन्सन आणि विस्टींग मॉडवर दाखल झाले ! १९२३ मध्ये अ‍ॅमंडसेन मोहीमेतून परतल्यावर त्यांनी मोहीमेचं नेतृत्व सांभाळलं होतं !

११ मे१९२६ ला अ‍ॅमंडसेन, विस्टींग आणि इतर पंधरा जणांनी अम्बर्टो नोबाईलच्या नॉर्ज या विमानातून स्पिट्सबर्जेनहून उड्डाण केलं. दोन दिवसांनी उत्तर धृव ओलांडून ते अलास्कामध्ये पोहोचले ! अ‍ॅमंडसेन आणि ऑस्कर विस्टींग दोन्ही धृवांवर पोहोचलेले पहिले दर्यावर्दी संशोधक होते !

( उत्तर धृव, दक्षिण धृव आणि 'तिसरा धृव' म्हणजे माऊंट एव्हरेस्ट हे तीनही पादाक्रांत करणारा पहिला वीर अर्थातच एडमंड हिलरी ! )

१९२८ मध्ये उत्तर धृवाच्या मोहीमेवर असताना नोबाईलचं ' इटालिया ' हे विमान बर्फात कोसळलं होतं. त्यांची सुटका करण्याच्या हेतूने १८ जून १९२८ ला अ‍ॅमंडसेन आणि इतर पाच जणांनी लॅथम ४७ जातीच्या विमानातून उत्तर धृवाच्या दिशेने उड्डाण केलं, मात्रं नोबाईलपाशी पोहोचण्यात ते अपयशी ठरले. नॉर्वेला परतण्यासही त्यांना यश आलं नाही ! त्यांच्याकडून कोणताही संदेश आला नाही !

नॉर्थवेस्ट पॅसेजमधून सर्वप्रथम यशस्वी प्रवास केलेल्या, दक्षिण धृवावर सर्वप्रथम पोहोचलेल्या, आणि दोन्ही धृव पादाक्रांत करणारा पहिला मानव असलेल्या रोनाल्ड अ‍ॅमंडसेनच्या विमानाचा शोध लागलाच नाही ! आपल्या पाचही सहका-यांसह अ‍ॅमंडसेन उत्तर धृवीय प्रदेशात कायमचा अदृष्य झाला ! बेरेंट्स समुद्रात अ‍ॅमंडसेननचं विमान कोसळलं असावं असा अंदाज आहे.

धृवीय प्रदेशातच अ‍ॅमंडसेनच्या अंत व्हावा हा काव्यगत न्याय !


बेरेंट्स समुद्र

स्कॉटची ट्रॅजिक हिरो ही प्रतिमा कित्येक दशके ब्रिटीश जनमानसात पक्की रुजली होती. त्याच्याविरुध्द कधीही कोणत्याही टिकेचा एक शब्दही उच्चारला गेला नाही.

१९७९ मध्ये रोलांड हंटफोर्डच्या 'स्कॉट अ‍ॅन्ड अ‍ॅमंडसेन' ( १९८३ मध्ये 'द लास्ट प्लेस ऑन अर्थ' या नावाने पुनःप्रकाशन ) या पुस्तकाने या प्रतिमेला जोरदार धक्का दिला. स्कॉटची पारंपारीक अधिकारीपध्दत, मोहीम आखण्यात आणि राबवताना घेण्यात आलेले निर्णय आणि वापरण्यात आलेली सामग्री आणि आपल्या सहका-यांची क्षमता ओळखण्यात आलेलं अपयश यावर हंटफोर्डने नेमकं बोट ठेवलं होतं. हंटफोर्डच्या या पुस्तकाने खवळलेल्या रानुल्फ फिनेसने स्कॉटची प्रतिमा सावरण्यासाठी 'कॅप्टन स्कॉट' हे पुस्तक प्रकाशित केलं. सुझन सॉलोमन, कॅरेन मे, डेव्हीड क्रेन यांनीही स्कॉटच्या तुकडीच्या मृत्यूची कारणमीमांसा करताना स्कॉटच्या निर्णयांपेक्षाही हवामानातील झालेला अचानक बदल आणि घसलेलं तापमान याचा शास्त्रीय उहापोह करण्यावरच भर दिला.