Android app on Google Play

 

प्रकरण ८

 

२६ जानेवारीला टेरा नोव्हातील व्हि़क्टर कँपबेलच्या तुकडीने केप इव्हान्स सोडलं आणि ग्रेट आईस बॅरीअरच्या पूर्वेच्या किंग एडवर्ड ७ लँडच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. बटलर पॉइंटवर मॅकमुर्डो ड्राय व्हॅली आणि कोटीलीट्झ ग्लेशीयरच्या प्रदेशांत संशोधनासाठी निघालेली तुकडी जहाजवरुन उतरली. किंग एडवर्ड ७ लँडवर शास्त्रीय संशोधनाची त्यांची योजना होती. मात्रं किंग एडवर्ड ७ लँडवर उतरण्यास त्यांना योग्य जागा न मिळाल्याने त्यांनी आपला मोहरा व्हिक्टरी लँडकडे वळवला. बॅरीअरच्या काठाने पशिमेच्या दिशेने परत येताना ३ फेब्रुवारीला त्यांना व्हेल्सच्या उपसागरात नांगरलेलं एक जहाज आढळून आलं !

फ्राम !

अ‍ॅमंडसेनने कँपबेलच्या तुकडीचं आनंदाने स्वागत केलं. किंग एडवर्ड लँड ७ वरील संशोधनासाठी कँपबेलने फ्रामहेम जवळच मुक्काम करण्याची आणि आपल्या कुत्र्यांची मदत घेण्याची अ‍ॅमंडसेनने सूचना केली, परंतु कँपबेलने त्याला नकार दिला.


फ्राम

अ‍ॅमंडसेनची मोहीम वेडेल समुद्राच्या किना-यावर उतरुन मोहीमेला सुरवात करेल असा स्कॉटचा अंदाज होता. व्हेल्सच्या उपसागरातून सुरवात केल्यामुळे अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला स्कॉटच्या तुलनेत ६० मैल अंतर कमी पडणार होतं. कँपबेलला या गोष्टीची विशेष काळजी वाटत होती. टेरा नोव्हावर रेडीओ नसल्याचं कळल्यावर अ‍ॅमंडसेनला हायसं वाटलं. दक्षिण धॄवावरील यशस्वी मोहीमेची बातमी सर्वप्रथम आपण द्यावी अशी त्याची इच्छा होती. मात्रं स्कॉटच्या मोटरस्लेजची प्रगती उत्तम होत असल्याचं कँपबेलकडून कळल्यावर अ‍ॅमंडसेन काळजीत पडला होता.

२७ जानेवारी पासून स्कॉटने दक्षिणेच्या दिशेने एक टन डेपो कँप उभारण्याच्या दृष्टीने मोहीमेला सुरवात केली. ८० अंश दक्षिणेला डेपो उभारण्याची त्याची योजना होती. ४ फेब्रुवारीला हट पॉईंटपासून ४० मैलावर त्याने कॉर्नर कँप उभारला. मात्रं हिमवादळामुळे ( ब्लिझर्ड ) पुढचे तीन दिवस त्यांना तिथेच अडकून पडावं लागलं. हिमवादळानंतर त्यांनी पुढे कूच केलं, परंतु एव्हाना आठपैकी तीन घोड्यांचा दम निघाला होता. स्कॉटने त्यांना परत पाठवलं, परंतु तीनपैकी दोन घोडे मरण पावले. पुढच्या वाटचालीत स्कॉटला घोड्यांची काळजी वाटू लागली होती. लॅरी ओटेसने घोडी कोसळल्यास त्यांचा मांसासाठी वापर करुन ८० अंशापर्यंत जाण्याची सूचना केली, परंतु स्कॉटने त्याला ठाम नकार दिला. ८० अंश दक्षिणेच्या सुमारे ३० मैल आधी ७९'२९'' अंशावर एक टनाचा डेपो कँप उभारण्याचा त्याने निर्णय घेतला.

दक्षिण धृवावरुन परत येताना एक टन डेपो गाठण्यासाठी ३० मैलांची जास्तीची वाटचाल करावी लागणार होती.

याचा परिणाम काय होणार होता ?

स्कॉटने परतीचा मार्ग धरला. परतीच्या वाटेवर कुत्र्यांची संपूर्ण तुकडी बर्फाच्या मोठ्या कपारीत पडली, परंतु प्रसंगावधान राखून आणि आपला जीव धोक्यात घालून स्कॉटने सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवलं ! मात्रं, यामुळे कुत्र्यांच्या बद्दल त्याच्या प्रति़कूल मताला खतपाणीच मिळालं. स्कॉटच्या पाठोपाठ काही दिवसांतच घोडे सेफ्टी कँपला परत येऊन पोहोचले, परंतु आणखीन एक घोडा प्राणाला मुकला होता. हट पॉईंटला परत येताना दुर्दैवाने आणखीन तीन घोडे बर्फाळ कपारीत फसले ! कपारीतून घोड्यांना बाहेर काढण्यात स्कॉटला यश आलं तरीही तीनही घोड्यांनी दम तोडला. एक टन वजनाचा डेपो उभारण्याच्या मोहीमेवर गेलेल्या आठ पैकी सहा घोड्यांचा बळी गेला होता !

स्कॉटप्रमाणेच अ‍ॅमंडसेननेही दक्षिण धृवाच्या मार्गावर सामग्रीने भरलेले डेपो कँप उभारण्यावर भर दिला होता. डेपोच्या उभारण्याचा मोहीमेवर निघण्यापूर्वी त्याने निल्सनला फ्राम घेऊन ब्युनॉस आयर्स गाठण्याची आणि साधनसामग्रीसह १९१२ च्या सुरवातीला व्हेल्सच्या उपसागरात परतण्याची सूचना दिली. 

१० फेब्रुवारी १९११ ला अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने डेपोच्या मोहीमेवर जाण्यासाठी फ्रामहेम सोडलं. ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर डेपो उभारण्याचा त्यांचा इरादा होता. ग्रेट आईस बॅरीअरच्या पृष्ठभागावरुन वाटचाल करणं कठीण असेल याची त्यांना कल्पना होती, मात्रं तुलनेने ग्लेशीयरवरुन जाणार मार्ग बराच सुकर असल्याचं त्यांना आढळून आलं. तसंच धृवीय प्रदेशात कुत्र्यांच्या सहाय्याने स्लेज वापरुन मार्गक्रमणा करण्याचा आपला निर्णय अचूक असल्याचंही त्याच्या ध्यानात आलं. १४ फेब्रुवारीला त्यांनी ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर डेपो उभारला आणि १६ फेब्रुवारीला फ्रामहेम गाठलं. 

घोड्यांचा वापर करुनही स्कॉटला ८० अंश दक्षिण अक्षवृत्तापासून ३० मैल उत्तरेचा डेपो उभारण्यास तब्बल वीस दिवस लागले होते, तर अ‍ॅमंडसेनने अवघ्या सहा दिवसांत डेपो उभारुन पुन्हा फ्रामहेम गाठलं होतं. अर्थात अ‍ॅमंडसेनने ६० मैल दक्षिणेला सुरवात केलेली होती आणि वादळामुळे स्कॉटचे कॉर्नर कँपला चार दिवस फुकट गेलेले असले, तरीही कुत्र्यांच्या तुलनेत धृवीय प्रदेशात वावरण्यात घोड्यांना अडचण येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 

एक टनाचा डेपो उभारुन परत येत असताना २२ फेब्रुवारीला स्कॉटला कँपबेलने कळवलेली व्हेल्सच्या उपसागराजवळील अ‍ॅमंडसेनच्या कँपची बातमी समजली. स्कॉटच्या ध्यानात एक गोष्ट आली होती, ती म्हणजे आपण आणि अ‍ॅमंडसेन यांच्यात सर्वप्रथम दक्षिण धृव गाठण्याची शर्यत लागणार आहे ! दक्षिण धृवाची मोहीम हा स्कॉटच्या दृष्टीने ब्रिटीश साम्राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. मात्रं, अ‍ॅमंडसेनच्या आगमनाच्या बातमीनंतरही स्कॉटने आपल्या पूर्वीच्या बेतात कोणताही बदल केला नाही. 

मॅकमुर्डो साऊंडच्या पश्चिमेला गेलेल्या तुकडीने फेरर ग्लेशीयरवर आपला कँप उभारला. पुढील काही दिवसांत त्यांनी ड्राय व्हॅली आणि टेलर ग्लेशीयरवर अनेक शास्त्रीय प्रयोग केले. त्यानंतर दक्षिणेला कोटीलीट्झ ग्लेशीयर गाठून त्यांनी आपलं संशोधनाचं काम सुरूच ठेवलं. १४ मार्चला ते सर्वजण केप इव्हान्सला परतले.

२२ फेब्रुवारीला अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने दुस-या डेपो मोहीमेवर जाण्यासाठी फ्रामहेम सोडलं. मात्रं यावेळी ग्रेट आईस बॅरीअरवरील परिस्थीतीत बराच फरक पडला होता. तापमान सुमारे -४० अंश सेल्सीयसपर्यंत उतरलं होतं ! त्या परिस्थीतीतही त्यांनी ३ मार्चला ८१ अंश दक्षिण अक्षवृत्तावर दुसरा डेपो कँप उभारला. अ‍ॅमंडसन, हेल्मर हॅन्सन, प्रेस्टड, योहान्सन आणि विस्टींग यांनी ८३ अंश दक्षिणेच्या दिशेने कूच केलं, परंतु बिघडत चाललेल्या वातावरणामुळे त्यांना ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे मजल मारणं अशक्यं झालं. आपल्या कुत्र्यांची दमछाक झाल्याचं ध्यानात येताच अ‍ॅमंडसेनने परतीचा निर्णय घेतला. २२ मार्चला त्यांनी फ्रामहेम गाठलं.

अंटार्क्टीकामध्ये एकदा का हिवाळी रात्र ( पोलर नाईट ) सुरू झाली की कोणतीही हालचाल करता येणं अशक्यंच असतं. अ‍ॅमंडसेनला याची नेमकी कल्पना होती. पोलर नाईटच्या आधी जास्तीत जास्त अन्नसामग्री दक्षिणेच्या दिशेने डेपो कँप्समध्ये पोहोचवण्याचा त्याचा बेत होता. त्या दृष्टीने योहान्सनन्च्या सात माणसांच्या तुकडीने ३१ मार्चला शिकार केलेल्या सहा सीलसह ८० अंशावरील डेपोकडे प्रस्थान ठेवलं. डेपोवर सर्व सामग्री साठवून ठेवून परत येताना योहान्सनची तुकडी पार भरकटली ! ज्या प्रदेशांत ते पोहोचले तो कपारींनी ( क्रिव्हाईस ) भरलेला होता ! धोकादायक कपारींच्या भूलभुलैयातून मार्ग काढून ११ एप्रिलला सर्वजण सुखरुप फ्रामहेमवर पोहोचले. 

डेपो उभारणीच्या या कार्यक्रमात योहान्सन आणि अ‍ॅमंडसेन यांच्यात चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. डेपो उभारणीच्या दुस-या मोहीमेत योहान्सनने सामग्रीबद्दल आपली मतं स्पष्टपणे मांडली होती. योहान्सनच्या या स्पष्टोक्तीमुळे आपल्या निर्विवाद अधिकाराला धोका निर्माण झाल्याची भावना अ‍ॅमंडसेनच्या मनात निर्माण झाली.

२१ एप्रिलला अंटार्क्टीकावर सूर्यास्त झाला ! 

पोलर नाईटला सुरवात झाली ! आता चार महिने सूर्यदर्शन होणार नव्हतं !अ‍ॅमंडसेनने पोलर नाईटच्या दरम्यान आपल्या साधनसामग्रीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची योजना आखली होती. डेपो उभारणीच्या कामात त्याच्या काही स्लेजनी आवश्यक कामगिरी बजावली नव्हती. दक्षिण धृवीय पठारावार ( पोलर प्लेन ) वापरण्याच्या दृष्टीने त्या स्लेजमध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं. ओलॅव्ह जालँडने स्लेजचं वजन ब-याच प्रमाणात कमी करण्यात यश मिळवलं होतं. योहान्सनने स्लेजबरोबर नेण्याच्या खाद्यसामग्रीचं योग्य नियोजन करुन सर्व सामग्री तयार ठेवली होती. इतर सर्वजण बूट, स्कीईंगची सामग्री, तंबू, गॉगल इत्यादी गोष्टी मोहीमेच्या दृष्टीने तयारीत ठेवण्यात गढून गेले होते. स्कर्व्हीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दिवसातून दोन वेळा सीलच्या मांसाचा त्यांच्या आहारात समावेश होता. जोडीला बेरीच्या फळं आणि ताजा ब्रेड !

अ‍ॅमंडसेनप्रमाणेच स्कॉटनेही दक्षिण धृवीय मोहीमेच्या दृष्टीने तयारीला सुरवात केली होती. शास्त्रीय संशोधनात खंड नव्हताच. मोहीमेच्या दृष्टीने उपलब्ध साधनसामग्री तयारीत ठेवण्यात सर्वजण मग्नं होते. स्कॉटचा बहुतेक सगळा वेळ दक्षिण धृवावर नेण्याच्या अन्नसामग्रीच्या कॅल्क्युलेशनमध्ये जात होता. विविध विषयांवर चर्चा होत असे. कधी कधी भर बर्फात फुटबॉलचा सामनाही रंगत असे. शॅकल्टनने निम्रॉड मोहीमेत सुरु केलेल्या साऊथ पोलर टाईम्सचं पुनरुज्जीवन करण्यात आलं ! त्याच्या संपादकपदी चेरी-गॅरार्डची नियुक्ती करण्यात आली ! ६ जूनला कॅप्टन स्कॉटचा वाढदिवस साजरा करण्यात आला. २१ जूनला हिवाळी रात्रीचा मध्य उलटल्याबद्दल पुन्हा मेजवानी आयोजीत करण्यात आली ! 

एडवर्ड विल्सनने ऐन हिवाळ्यात केप क्रॉझीयरवरुन संशोधनासाठी एम्परर पेंग्वीनची अंडी मिळवण्याची योजना आखली होती ! १९०१-०४ च्या दरम्यानच्या डिस्कव्हरी मोहीमेच्या दरम्यान सुरु झालेलं एम्परर पेंग्वीन पक्ष्यांच्या वाढीवरील संशोधन पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला ही अंडी मिळवणं अत्यावश्यक वाटत होतं. दक्षिण धृवावर जाण्याच्या दृष्टीने खाद्यसामग्री आणि इतर साधनांची चाचणी घेणं हा या मोहीमेचा दुसराही हेतू तितकाच महत्वाचा होता. विल्सन, बॉवर्स आणि चेरी-गॅरार्ड यांनी २७ जूनला क्रॉझीयरच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं.