प्रकरण १९
टेरा नोव्हा मोहीमेवर येण्यापूर्वी व्हाईस अॅडमिरल सर फ्रान्सिस
चार्ल्स ब्रिजमन स्कॉटचा वरिष्ठ अधिकारी होता. त्याला लिहीलेल्या पत्रात
स्कॉट म्हणतो,
" हे पत्रं तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे. आमचा
शेवट अगदी जवळ आलेला आहे ! नौदलात असताना तुमच्या हाताखाली काम करण्याचा जो
बहुमान मला मिळाला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या मोहीमेवर तुलनेने
तरुण अधिका-यांची अपेक्षेपेक्षा लवकर दमछाक झाली ! दुर्दैवाने आम्ही या
कठीण परिस्थितीत सापडलेलो असलो, तरीही आम्ही धीराने मृत्यूला सामोरं
जाण्याचा आमचा निर्धार आहे ! लेडी ब्रिजमनना आमचा निरोप सांगा !"
व्हाईस अॅडमिरल सर जॉर्ज ले क्लर्क इगर्टनला स्कॉटने लिहीलं,
" आमचा अंत आता जवळ आलेला आहे. आम्ही दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झालो. आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रवास आम्ही केला आहे !
आमच्या
सहका-यांची खालावलेली प्रकृती हे आम्ही सुखरुप परत न येण्यामागचं एक कारण
असलं, तरीही परतीच्या वाटेवर बिघडलेलं हवामान आणि घसरलेलं तापमान
यांच्यामुळे ख-या अर्थाने आम्ही हतबल झालो आहोत. धृवावर पोहोचताना आम्हाला
जेवढे श्रम पडले, त्याच्या तिप्पट शक्ती बॅरीअर ओलांडण्याच्या प्रयत्नात
खर्च झाली आहे. माझा अंदाज आणि आडाखा पूर्णपणे चुकला आहे !
नौदलाच्या परंपरेनुसार माझ्या पत्नीची योग्य ती काळजी घेतली जावी अशी माझी विनंती आहे ! गुड बाय् ! "
टेरा नोव्हा मोहीमेची खर्चाची बाजू सांभाळणा-या सर एडगर स्पेयरला स्कॉटने लिहीलं,
"
आमची वेळ आता आली आहे ! मोहीमेच्या दृष्टीने ही बाब दुर्दैवी असली, तरी
आम्ही दक्षिण धृवावर पोहोचण्यात यशस्वी झालो हे मी मुद्दाम नमूद करू
इच्छीतो ! आम्ही मरणाला सामोरं जाण्याची तयारी केलेली आहे. अखेरच्या
क्षणापर्यंत आमची झुंज सुरूच राहील !"आपल्या पत्रात पुढे स्पेयरने केलेल्या
मदतीबद्दल स्कॉटने त्याचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले होते.
सर
जेम्स बॅरीला लिहीलेल्या पत्रात स्कॉटने आपल्या पत्नीची काळजी घेण्याची
विनंती केली. बॅरी स्कॉटच्या मुलाचा - पीटरचा गॉडफादर होता.
" आम्ही
अत्यंत अवघड जागी येऊन पोहोचलो आहोत. दक्षिण धृवावर पोहोचण्यात आम्ही
यशस्वी झालो असलो, तरीही पुन्हा इंग्लंडला परतणं आम्हाला शक्यं नाही !
परतीच्या वाटेवर आमच्या सहका-यांच्या अंतिम क्षणापर्यंत आम्ही त्यांची साथ
सोडली नव्हती. त्यांनी धैर्याने मृत्यूला कवटाळलं आणि त्यांच्याप्रमाणेच
शेवट्च्या क्षणापर्यंत आमचा मृत्यूशी संघर्ष सुरूच राहील ! आपल्या पुढच्या
मोहीमांवर मी तुझ्याबरोबर नसेन याचं मला वाईट वाटत आहे, परंतु त्याला इलाज
नाही. मी, विल्सन आणि एडगर इव्हान्स - आमच्या तिघांच्याही विधवांना
नौदलाकडून योग्य तो मोबदला मिळेल यासाठी शक्यं ते प्रयत्न करण्याची
जबाबदारी मी तुझ्यावर सोपवित आहे ! पीटरची काळजी घे !"
स्कॉटने नंतर या पत्राला आणखीन परिच्छेद जोडले. तो म्हणतो,
"
आमचा शेवट आता फार दूर नाही. आत्महत्येचा विचार आमच्या मनात आला होता,
परंतु आम्ही नैसर्गिक मृत्यूची प्रतिक्षा करण्याचा निश्चय केला आहे ! तुझी
मैत्री हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा ठेवा आहे ! पीटरची काळजी
घे ! त्याला योग्य मूल्ये आणि इंग्लिश परंपरांची शिकवण दे ! मृत्यूशय्येवर
असलेल्या तुझ्या मित्राची विनंती तू नाकारणार नाहीस याची मला खात्री आहे !
गुड बाय !"
टेरा नोव्हा मोहीमेचा क्राईस्टचर्च इथे असलेला प्रतिनिधी सर जोसेफ किन्सीला लिहीलेल्या पत्रात स्कॉट म्हणतो,
"
आमचा खेळ संपला आहे ! गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवादळाने
आम्हाला या ठिकाणी अडकवून ठेवलं आहे ! या शेवटच्या क्षणी मला सतत कॅथलीन
आणि पीटरची आठवण येते आहे. त्यांच्यासाठी शक्यं ते सर्व कर अशी माझी तुला
विनंती आहे ! मोहीमेतील उरलेल्या लोकांची काळजी घेण्यास तू समर्थ आहेस
याबद्दल मला तिळमात्रंही शंका नाही !
कॅथलीन आणि पीटर यांना तुझ्या
सुपुर्द केल्यावर मला फारशी काळजी नाही. मृत्यूचं मला भय वाटत नाही.
राष्ट्राला आमचा अभिमान वाटेल अशी आशा आहे. आमच्या खडतर आणि विक्रमी
प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवाने आम्हाला हिमवादळाने गाठल्यामुळे
आमचा मार्ग खुंटला ! परंतु दक्षिण धृव गाठण्याच्या उद्दीष्टात आम्ही पूर्ण
यशस्वी झालो आहोत."
आपल्या मेव्हण्याला लिहीलेल्या पत्रात त्याने आपल्या कुटुंबियांसाठी केलेल्या आर्थिक तरतूदीविषयी सूचना दिल्या,
"
माझ्याजवळ असलेली सर्व संपत्ती - सुमारे २००० पौंड - मी माझ्या आईच्या
नावाने मागे ठेवत आहे ! नौदलाकडून आणखीन भरपाई मिळेल ! स्पेयरची भेट घेऊन
कॅथलीनच्या कायदेशीर हक्कांबाबत बोलणी कर !"
कॅथलीनला लिहीलेल्या पत्रात स्कॉट म्हणतो,
"
या शेवटच्या क्षणी तुझी आणि पीटरची सतत आठवण येते आहे ! पीटरला
खेळाव्यतिरिक्त निसर्गाची ओढ लागेल याकडे लक्षं दे. तो कोणत्याही
प्रलोभनाला किंवा वाईट सवयींना बळी पडणार नाही याची काळजी घे ! कोणत्याही
परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तो सक्षम असेल यासाठी त्याला तयार कर !
माझ्या
बॅगमध्ये मी दक्षिण धृवावर लावलेल्या राष्ट्रध्वजाचा एक लहानसा तुकडा आणि
अॅमंडसेनचा काळा झेंडा आहे ! युनियन जॅकचा छोटासा तुकडा राजेसाहेब आणि
राणी अलेक्झांड्रा यांना पोहोचवण्याची व्यवस्था कर ! सर क्लेमेंट्स
मार्कहॅमची गाठ घेऊन त्यांनी या मोहीमेवर माझी नियुक्ती केल्याचा मला
कोणताही पश्चात्ताप झालेला नाही असा निरोप दे !
आमच्या या
मोहीमेबद्दल किती सांगू आणि किती नाही अशी माझी अवस्था झाली आहे ! घरच्या
उबदार वातावरणात आराम करण्यापेक्षा आमचा हा प्रवास किती थरारक होता !
दक्षिण धृवावर पोहोचणारे आम्ही सर्वप्रथम ब्रिटीश नागरीक होतो याचा मला
अभिमान आहे ! परंतु याची जी किंमत मोजतो आहोत याची मात्रं आम्हाला अपेक्षा
नव्हती ! अगदी शेवटच्या क्षणी आम्हाला देवाचं बोलावणं यावं यामागे
निश्चीतच काहीतरी संकेत असावा ! गुड बाय !"
विल्सनच्या पत्नीला लिहीलेल्या पत्रात आपल्या सर्वात विश्वासू सहका-याबद्दल स्कॉटने गौरवोद्गार काढले,
"
तुम्हाला हे पत्रं मिळालंच तर मी आणि बिल शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र
होतो हे कळून येईल. या जगाचा एकत्र निरोप घेण्याचा आमचा निर्धार आहे !
शेवटच्या क्षणापर्यंत तो आनंदी आणि दुस-याच्या मदतीला तत्पर आहे ! ज्या
परिस्थितीत आम्ही सापडलो आहोत त्याबद्द्ल या शेवटच्या क्षणीही तो मला दोष
देत नाही हा त्याचा मोठेपणा आहे ! ज्या शौर्याने तो आपलं आयुष्यं जगला,
त्याच वीरोचित धैर्याने तो मृत्यूला सामोरा गेला हे ऐकून तुमचा भार हलका
होईल अशी मला आशा आहे. माझ्या सर्वोत्कृष्ट सहका-याच्या येऊ घातलेल्या
मृत्यूचं दु:ख सहन करण्याची तुम्हांला शक्ती मिळावी अशी माझी प्रार्थना आहे
!"
बॉवर्सच्या आईचंही स्कॉटने सांत्वन केलं. तिला लिहीलेल्या पत्रात तो म्हणतो,
"
तुम्हाला होणा-या दु:खात मी पूर्णपणे सहभागी आहे ! आमचा शेवट आता जवळ आला
आहे. शेवटपर्यंत मला साथ देणा-या सहका-यांमध्ये हेनरी आहे याचा मला अभिमान
आहे ! त्याची झुंजार आणि लढाऊ वृत्ती आणि दुर्दम्य आशावाद याच्या जोरावर या
अंतिम क्षणीही आम्ही आनंदात आहोत ! शेवटच्या क्षणापर्यंत त्याला तुमची
आणि आपल्या बहिणींची सतत आठवण येते आहे ! गॉड ब्लेस यू !"स्कॉटने आपला
अंतिम संदेश ब्रिटीश जनतेच्या नावाने लिहीला होता. त्यात वेळोवेळी आपण
घेतलेल्या निर्णयांचं समर्थन आणि मोहीमेच्या अपयशाबद्दल स्पष्टीकरण केलेलं
होतं.
" आम्ही सर्वजण सुरक्षित परत न येण्यामागे मोहीम आखण्यात आणि
राबवण्यात राहीलेली कोणतीही त्रुटी अथवा चूक हे कारण नसून अनेक दुर्दैवी
घटना आणि आम्ही पत्करलेले धोके कारणीभूत आहेत. अर्थात पत्करणं हे
अत्यावश्यक होतं.
१. मार्च १९११ मध्ये आमचे अनेक घोडे मरण पावले.
त्यामुळे पूर्वी ठरलेल्या दिवसापेक्षा उशीरा निघणं आम्हाला भाग पडलं !
घोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे सामानातही आम्हाला काटछाट करावी लागली.
२.
आम्ही दक्षिण धृवाकडे जात असताना असलेलं प्रतिकूल हवामान आणि ८३ अंश
अक्षवृत्तावर आम्हांला अडकवून ठेवणारं हिमवादळ यामुळे आम्हाला किमान पाच
दिवसांचा उशीर झाला.
३. हिमवादळामुळे बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्याशी जमा झालेल्या भुसभुशीत बर्फाच्या थरामुळे आमचा वेग मंदावला.
या
सर्व परिस्थितीचा आम्ही धैर्याने मुकाबला केला आणि त्यावर मात करण्यात
यशस्वी झालो, परंतु त्यामुळे आमच्या उपलब्ध असलेल्या सामग्रीवर त्याचा
विपरीत परिणाम झाला.
आमची सर्व सामग्री, कपडे आणि दोन डेपोंमधील
अंतर याचं नियोजन अचूक आणि उत्कृष्ट होतं आणि दक्षिण धृवापर्यंतच्या ७००
मैलांच्या प्रवासात ते वारंवार दिसूनही आलं. पोलर पार्टी परतीच्या वाटेवर
असताना आमच्यापाशी आवश्यकतेपेक्षा जास्त सामग्री शिल्लक असेल अशीच आमची
अपेक्षा होती. ज्याच्या शारिरीक क्षमतेबद्दल आम्हाला सर्वात जास्तं खात्री
होती, तो एडगर इव्हान्स बळी पडला नसता तर आम्ही परतण्यात नक्कीच यशस्वी
झालो असतो.
योग्य हवामान असेल तर बिअर्डमूर ग्लेशीयर पार करणं हे
तितकंस कठीण नाही ! परंतु परतीच्या वाटेवर एक दिवसही हवमान अनुकूल नव्हतं.
त्यातच इव्हान्सच्या अवस्थेमुळे आमच्या हालअपेष्टांत अधिकच भर पडली.
त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरणं आम्हाला जवळपास अशक्यंच झालं.
त्यातच हिवाळ्याला लवकर सुरवात झाल्याने भराभर वाटचाल करणं अधिकच कठीण होत
गेलं.
परंतु ग्रेट आईस बॅरीअरवर आमची जी ससेहोलपट झाली, त्याच्याशी
तुलना करता वरील परिस्थिती उत्तम होती असंच म्हणावं लागेल ! परतीच्या
मार्गावर आम्ही साधनसामग्रीची योग्य ठिकाणी तरतूद केलेली होती, परंतु
प्रतिकूल हवामानापुढे मात्रं आमचा निरुपाय होता. धृवावर जाताना ८५ आणि ८६
अंश अक्षवृत्तावर तापमान अनुक्रमे -२० आणि -३० डिग्री सेल्सीयस होतं, परंतु
बॅरीअरवर, ८२ अंश अक्षवृत्तवर - दहा हजार फूट कमी उंचीवर - तापमान -४७
अंशापर्यंत घसरलं होतं ! आमच्या वाटचालीला खीळ बसण्याचं मुख्य कारण हे
घसरलेलं तापमान आणि जोडीला सतत जोरदार वेगाने वाहणारे बोचरे वारे हे होतं.
अचानकपणे झालेल्या हवामानातील या बदलाचं माझ्यापाशी कोणतंही स्पष्टीकरण
नाही. इतिहासात अशा हवामानातून कोणा मनुष्यप्राण्याने महिनाभर मार्गक्रमणा
केली असेल असं मलातरी वाटत नाही ! यावरही आम्ही मात करु शकलो असतो, परंतु
लेफ्टनंट ओएट्सच्या पायाची दुखापत, वाटेतील डेपोमध्ये असलेली इंधनाची
कमतरता आणि सर्वात शेवटचं म्हणजे सुरू असलेलं हिमवादळ , यामुळे आम्ही एक टन
डेपो पासून अवघ्या ११ मैलांवर अडकलो आहोत. अर्थात याचा अर्थ आम्हांला
परतीच्या वाटेवर इतरांची योग्य साथ मिळाली नाही असा निष्कर्ष काढणं मात्रं
योग्य नाही. एक टन डेपोमध्ये आम्हाला इंधन मिळण्याची शेवटची आशा होती.
आम्ही इथे पोहोचलो त्या दिवशी आमच्यापाशी दोन दिवसांपुरते अन्नपदार्थ आणि
एक दिवस पुरेल इतकंच इंधन शिल्लक होतं ! मात्रं गेले चार दिवस सतत
घोंघावणा-या वादळामुळे तंबूतून बाहेर पाय टाकणंही आम्हाला साध्यं झालेलं
नाही !
आम्ही अतिशय अशक्तं झालो आहोत. लिखाणाचे श्रमही आता नकोसे
झालेले आहेत. व्यक्तिशः मला या प्रवासाचा कोणताही पश्चात्ताप झालेला नाही.
इंग्लिश माणसांचं धैर्य आणि सहनशक्ती, कोणत्याही परिस्थितीत आपल्या
सहका-यांना मदत करण्याची वृत्ती आणि धीरोदत्तपणे मृत्यूला कसं सामोर जावं
हे या मोहीमेतून आम्ही दाखवून दिलेलं आहे ! आम्ही पूर्ण विचाराअंती आवश्यक
तो धोका पत्करला होता. दुर्दैवाने निसर्ग आमच्याविरुद्ध उभा ठाकला, परंतु
आमची कोणतीही तक्रार नाही. परमेश्वराच्या इच्छेपुढे मान तुकवून आम्ही आमचं
भवितव्य स्वीकारलं आहे ! आमच्या देशाचा मानबिंदू असलेल्या या मोहीमेसाठी
आमचे प्राण खर्ची पडले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. मागे राहिलेल्या
आमच्या कुटुंबियांची आमच्या देशवासियांनी काळजी घ्यावी अशी आमची विनंती आहे
!
आम्ही सुखरुप परत आलो असतो तर असामान्य शौर्य, सहनशक्ती आणि
जिगरबाज लढाऊ वृत्तीने भरलेल्या कहाण्या सर्वांना सांगू शकलो असतो. आमचे
मृतदेह आणि आमच्यापाशी असलेल्या नोंदींवरुन सर्व कथा तुमच्या ध्यानात येईल
अशी मला खात्री आहे. आपल्या गौरवशाली राष्ट्राच्या आणि वैभवशाली परंपरेच्या
छायेत आमच्या सर्व सुहृदांची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी आम्हाला
खात्री आहे !
रॉबर्ट स्कॉट. "
चेरी-गॅराड आणि डिमीट्री परतल्यावर
आणि त्यांच्याकडून स्कॉटची कोणतीही माहीती न मिळाल्याने सर्वांनाच चिंतेने
ग्रासलं होतं. केप इव्हान्सला उपस्थित असलेल्यांपैकी अॅटकीन्सन सर्वात
वरिष्ठ अधिकारी होता. त्याने कोहेनच्या साथीने स्कॉटला गाठण्यासाठी शेवटचा
प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
२६ मार्चला अॅटकिन्सन आणि कोहेनने हट पॉईंटहून एक टन डेपोची वाट पकडली.
दोघांनाही
स्लेज चालवण्याचा अनुभव नव्हता आणि चेरी-गॅराड आणि डिमीट्रीबरोबर नुकतेच
एक टन डेपो पर्यंत जाऊन आल्यामुळे कुत्र्यांना पुन्हा कामाला जुंपणं
अॅटकिन्सनला क्रूरपणाचं वाटत होतं. त्यांच्यापुढे पदयात्रेशिवाय दुसरा
पर्याय नव्हता.
स्कॉटच्या मूळ योजनेप्रमाणे ते २७ मार्चपर्यंत परत
येणार होते, त्यामुळे हट पॉईंटवरील इतरांना वरकरणी काळजी वाटत नसली तरी
सर्वजण अस्वस्थं झालेले होते. त्यातूनच त्यांना निरनिराळे भास होण्यास
सुरवात झाली. चेरी-गॅराड म्हणतो,
" कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज
आला की कोणीतरी येत असल्याची आमची खात्री पटत असे. कोहेनने येणा-या
माणसांना योग्य दिशा कळावी म्हणून स्वयंपाकाच्या खोलीत मेणबत्ती लावून
ठेवण्याची सूचना केली ! एकदा तर आम्हाला दारावर चार-पाच वेळा थाप पडल्याचा
आवाज आला. धावत बाहेर जाऊन आम्ही पाहीलं तर एक चिटपाखरूही नजरेस पडेना !
जणू काहीतरी भुताटकी झाली होती आणि आलेली माणसं अदृष्य झाली होती ! दारावर
थापा मारल्याच्या आलेल्या आवाजाचं स्पष्टीकरण एकच असू शकत होतं. त्या
दाराजवळ झोपणा-या आमच्या कुत्र्याने अंग झटकल्यावर त्याच्या शेपटीचे फटकारे
दारावर बसले होते आणि तो आवाज आला होता. आदल्या रात्री अॅटकिन्सनला
पावलांचा आवाज ऐकू आल्यासारखं वाटत होतं !"
स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली,
"
२१ तारखेपासून आम्ही या ठिकाणी अडकलो आहोत. हिमवादळाचा जोर कमी होण्याचं
कोणतंही चिन्हं दिसत नाही. २० तारखेला आमच्यापाशी प्रत्येकाला दोन कप चहा
करता येईल इतकंच इंधन आणि दोन दिवस पुरेल इतके अन्नपदार्थ शिल्लक होते. रोज
आम्ही ११ मैलांवर असलेल्या एक टन डेपोकडे जाण्याची तयारी करत असू, परंतु
हिमवादळापुढे आमचा नाईलाज होता. दिवसेदिवस आम्ही अधिकाधीक अशक्त होत चाललो
आहोत. आमचा शेवट आता काही तासांवर आला आहे !
या पुढे अधिक लिहीणं दुर्दैवाने मला शक्यं होईल असं वाटत नाही.
कृपया आमच्या लोकांची काळजी घ्या !
- रॉबर्ट स्कॉट "
स्कॉटच्या डायरीतील ही शेवटची नोंद होती !
२९ मार्च १९१२ !
कॅप्टन
रॉबर्ट फॅल्कन स्कॉट, लेफ्टनंट हेनरी रॉबर्ट्सन बॉवर्स आणि डॉ. एडवर्ड
विल्सन यांना काही तासांतच - कदाचित एक-दोन दिवसात मृत्यूने आपल्या कवेत
घेतलं असावं !