Android app on Google Play

 

प्रकरण १८

 

टास्मानियाच्या किना-यापाशी येऊन पोहोचल्यानंतरही फ्रामपुढच्या समस्या अद्याप संपल्या नव्हत्या. होबार्ट बंदराभोवतीच्या परिसरात वादळाचा धुमाकूळ सुरू होता !  हवामान सुधरल्यावर ते होबार्ट बंदराजवळ पोहोचत असतानाच जोरदार वा-याने फ्रामला पुन्हा खुल्या समुद्रात आणून सोडलं ! जालांड म्हणतो,

" होबार्ट बंदरात प्रवेश करणं अत्यंत कठीण होत होतं. शेवटी एकदाचे आम्ही तिथे पोहोचलो तर वादळाने पुन्हा आम्हाला सागरात हाकललं ! फ्रामचं एक शिड फाटलं होतं !"
रॉस आईस शेल्फवरुन केप इव्हान्सच्या दिशेने मार्गक्रमणा करणा-या स्कॉटच्या तुकडीच्या हालात दिवसेदिवस भर पडत होती. दिवसभरात ८ मैलांवर वाटचाल करणं त्यांना जमत नव्हतं. ओएट्सच्या पायाच्या दुखापतीने आता उग्र स्वरुप धारण केलं होतं. रोज पायात बूट घालतानाही त्याला संघर्ष करावा लागत होता. स्लेजच्या बाजूने तो केवळ अडखळत चालू शकत होता. परिणामी स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सवर स्लेज ओढण्याचं काम येऊन पडलं होतं. ते तिघं मार्ग शोधत असताना ओएट्स स्लेजवर बसून राहत असे.

" ओएट्सच्या पायात असह्य वेदना होत असाव्यात असा माझा अंदाज आहे !" स्कॉट म्हणतो, " मात्रं तो एका शब्दानेही तक्रार करत नाही. अद्यापही आमच्यापाठोपाठ अडखळत का होईना पण तो चालतो आहे !"
आपल्या डेपोपासून ते अद्यापही सुमारे २० मैलांवर होते. त्यांच्याजवळचं इंधन संपत आलं होतं. स्कॉट आणि बॉवर्स स्पिरीटवर चालणारा दिवा बनवण्याच्या प्रयत्नात होते. डेपो गाठण्यापूर्वी इंधन संपल्यास स्पिरीट वापरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता ! डेपोवर आवश्यक तेवढं इंधन उपलब्ध असेल अशी स्कॉटला आशा होती.

होबार्ट बंदराभोवती घोंघावणारं वादळ अखेर एकदाचं निवळलं ! फ्रामने होबार्ट बंदरात प्रवेश केला !

७ मार्च १९१२ !

नॉर्थवेस्ट पॅसेज मधून यशस्वी प्रवास केल्याची बातमी वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात झालेल्या गोंधळामुळे अ‍ॅमंडसेनने योग्य तो धडा घेतला होता. या वेळी मात्र आवश्यक ती खबरदारी घेण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. मात्रं आपल्या भावाने - लिऑनने कोणत्या वर्तमानपत्राशी करार केला आहे याची त्याला कल्पना नव्हती ! तसंच आपल्या आधी स्कॉट परतला असण्याचीही त्याला भिती वाटत होती !

फ्रामने होबार्ट बंदरात प्रवेश करुन नांगर टाकला, परंतु ती दक्षिण धृवावरुन परत आली आहे याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली ! इतर कोणाशीही संपर्क साधायचा नाही असा अ‍ॅमंडसेनचा सक्त आदेश होता ! एका लहानशा होडीवरुन अ‍ॅमंडसेन एकटाच होबार्टच्या धक्क्यावर उतरला !


फ्राम - होबार्ट - ७ मार्च १९१२

अ‍ॅमंडसेनने ओरीएण्ट हॉटेलमध्ये एक खोली घेतली. सर्वात प्रथम त्याने चौकशी केली ती स्कॉट आणि टेरा नोव्हाची ! अद्यापही त्यांच्याकडून कोणतीही बातमी न आल्याचं कळताच त्याचा आनंद गगनात मावेना. होबार्टच्या नॉर्वेजियन कौन्सिलरची गाठ घेऊन त्याने आपली ओळख करुन दिली. त्याच दिवशी त्याने आपण दक्षिण धृव यशस्वीपणे गाठून परत आल्याची राजा हकून, फ्रिट्झॉफ नॅन्सन आणि लिऑनला तार पाठवली !

दुस-या दिवशी त्याला लिऑनची तार मिळाली. ' डेली क्रॉनीकल ' वृत्तपत्राला संपूर्ण रिपोर्ट पाठवण्याची लिऑनने त्याला सूचना केली होती. या वृत्तपत्राशी लिऑनने करार केला होता. त्याच्या सूचनेप्रमाणे अ‍ॅमंडसेनने आपली साद्यंत हकीकत डेली क्रॉनीकलला पाठवली.

" अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचला !"


जगभरातील सर्व वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर बातमी झळकली.

" १४ ते १७ डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण धृव पादाक्रांत करण्यात आला ! फ्राम होबार्टमध्ये परत !"
अ‍ॅमंडसेनवर अभिनंदनाचा वर्षाव झाला ! सर्वात पहिली तार नॉर्वेचा राजा ७ वा हकून याची होती ! पाठोपाठ नॅन्सन आणि डॉन पेड्रो क्रितोफर्सन यांच्या तारा आल्या. माजी अमेरीकन प्रेसीडेंट थिओडोर रुझवेल्ट  आणि इंग्लंडचा जारा किंग जॉर्ज ५ वा यांचेही अभिनंदनाचे संदेश आले. दक्षिण धृवावरुन परत आल्यावर ब्रिटीश साम्राज्यातील होबार्ट बंदरावर आगमन झाल्याबद्दल राजाने विशेष आनंद व्यक्त केला होता !


दक्षिण धृवावरुन परतलेले फ्रामवरील दर्यावर्दी - होबार्ट, टास्मानिया

नॉर्वेतील वृत्तपत्रांनी अ‍ॅमंडसेनचं अभिनंदन केलं असलं तरी स्कॉटपूर्वी दक्षिण धृव गाठण्यात अ‍ॅमंडसेनने राजकीयदृष्ट्या घोडचूक केली आहे असं अनेक नॉर्वेजियनांचं मत होतं ! अवघ्या काही वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या नॉर्वेला बलाढ्य इंग्लंडशी या मुद्द्यावरुन शत्रुत्वं पत्करावं लागू शकेल असा त्यांचा अंदाज होता ! एका वृत्तपत्राने तर  मॅकमुर्डो साऊंडहून बिअर्डमूर ग्लेशीयरच्या मार्गावर केवळ ब्रिटीशांचा हक्क असल्याचं आणि अ‍ॅमंडसेनने त्यांच्या मार्गावर अतिक्रमण न करता व्हेल्सच्या उपसागरातून अ‍ॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरमार्गे दक्षिण धृव गाठल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला होता !

इंग्लंडमध्ये 'डेली क्रॉनीकल' आणि 'इलस्ट्रेटेड लंडन न्यूज'ने अ‍ॅमंडसेनच्या यशस्वी मोहीमेची बातमी सविस्तरपणे छापली. 'मँचेस्टर गार्डीयन'ने अ‍ॅमंडसेनच्या धैर्याची तारीफ केली. 'यंग इंग्लंड'ने  अ‍ॅमंडसेनच्या शौर्याला वाचकांनी कोणत्याही पूर्वग्रहाविना दाद द्यावी असं आवाहन केलं. इंग्लंडमधील प्रत्येक मुलाने आणि तरुणाने अ‍ॅमंडसेनच्या प्रवासाचा वृत्तांत वाचावा असं 'द बॉइज् ओन पेपर'ने आव्हान केलं होतं. टाईम्सने अ‍ॅमंडसेनच्या साहसाचं आणि अज्ञात प्रदेशातून नवीन मार्ग शोधून काढण्याच्या जिगरी वृत्तीच कौतुक केलेलं असलं, तरी स्कॉटला शेवटच्या क्षणी कळवल्याबद्दल त्याच्यावर टीकाही केली होती. अ‍ॅमंडसेनने आधीच स्कॉटला कल्पना दिली असती तर स्कॉटने त्याचं स्वागतच केलं असतं असा टाईम्सचा सूर होता. न्यूयॉर्क टाईम्सने मात्रं अ‍ॅमंडसेनची दक्षिण धृवावरील मोहीम ही केवळ ब्रिटीशांपूर्वी धृवावर पोहोचण्याचा एकमेव उद्देश असलेली मोहीम म्हणून संभावना केली होती.


दक्षिण धृव सर्वप्रथम पादाक्रांत करणारे दर्यावर्दी - हेसेल, विस्टींग, अ‍ॅमंडसेन, जालांड, हॅन्सन

यल जिओग्राफीक सोसायटीच्या सभासदांनी मात्रं अ‍ॅमंडसेनवर टीकेची झोड उठवली. अ‍ॅमंडसेनने स्कॉटला फसवल्याची बहुतेकांची भावना होती. क्लेमंट्स मार्कहॅमने तर अ‍ॅमंडसेनचा दक्षिण धृवावर पोहोलाच नसल्याची शक्यता व्यक्त केली !

" अ‍ॅमंडसेनचा दावा खोटा असण्याची शक्यता आहे !" मार्कहॅम म्हणाला, " सत्य उजेडात येण्यासाठी टेरा नोव्हा परत येईपर्यंत वाट पाहणं आवश्यंक आहे !"

स्कॉट मार्कहॅमचा पट्ट्शिष्य होता. अ‍ॅमंडसेनने स्कॉटपूर्वी दक्षिण धृव पादाक्रांत केल्याचं मार्कहॅमला सहन होणं शक्यंच नव्हतं.

एर्नेस्ट शॅकल्टनने मात्रं अ‍ॅमंडसेनची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ' धृवीय प्रदेशातील सर्वोत्कृष्ट संशोधक ' म्हणून त्याने अ‍ॅमंडसेनची पाठ थोपटली.

फ्रिट्झॉफ नॅन्सनने डेली क्रॉनीकलला पत्रं लिहून अ‍ॅमंडसेनवर टीका करणा-यांचा समाचार घेतला. नॅन्सन म्हणतो,

" त्याने आपलं लक्ष्यं निश्चीत केलं होतं आणि मग मात्रं एकदाही मागे वळून पाहीलं नाही !  संपूर्णपणे अज्ञात प्रदेशातून वाटचाल करताना अनेक संकटांशी मुकाबला करत, अनेक अडचणींतून मार्ग काढत तो आपलं उद्दीष्टं गाठण्यात सफल झाला. एखादी शोधमोहीम कशी आखावी आणि पूर्ण करावी याचा वस्तूपाठ त्याने सगळ्या जगाला घालून दिला आहे ! सहजपणे एखाद्या सहलीला जावं तसं आपल्या प्रवासाचं त्याने वर्णन केलं असलं तरी त्यामागे असामान्य धाडस आणि प्रचंड मेहनत दडलेली आहे !"
कॅथलीन स्कॉटने मात्रं आपल्या पतीचा पराभव खिलाडूपणे स्वीकारला. ती म्हणते,
" अ‍ॅमंडसनने शेवटच्या क्षणापर्यंत आपला उद्देश लपवून ठेवला असला, तरीही दक्षिण धृव गाठून परत येण्याचा त्याचा असामान्य धाडसी प्रवास नि:संशय कौतुकास्पद आहे !"
सर्व जग अ‍ॅमंडसेनची पाठ थोपटत असताना स्कॉट कुठे होता ?

आपल्या डेपोपासून अद्यापही ८ मैलांवर असलेल्या स्कॉटच्या तुकडीची परिस्थिती दिवसागणि़क खालावत होती. ओएट्सच्या डाव्या पायातील वेदना आता इतक्या वाढल्या होत्या, की आपण सुखरुप परतू शकणार नाही याची त्याला शंका येत होती !  त्यातच विल्सनच्या पायाच्याही तक्रारी सुरु झाल्या होता. दक्षिणेला जाताना ज्या प्रदेशातून त्यांनी सहजपणे मार्गक्रमणा केली होती, त्याच प्रदेशात परतीच्या वाटेवर दुपटीने श्रम करुन अर्ध्या अंतराचीही मजल मारणं त्यांना कठीण जात होतं. डेपोला पोहोचल्यावर काय परिस्थिती असेल याचा विचार सतत त्याच्या मनात येत होता.

" डेपोवर पोहोचल्यावर तिथे काय परिस्थिती असेल ?" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " कुत्र्यांची तुकडी तिथे येऊन पोहोचली असल्यास पुढील काही दिवस वाटचाल करण्याइतपत सामग्री आम्हाला मिळू शकेल, परंतु तिथेही पुरेसं इंधन उपलब्ध नसेल तर मात्रं पुढे काय होईल हे सांगता येत नाही ! आम्ही मोठ्या कठीण परिस्थितीत सापडलो आहोत !"

चेरी-गॅराड आणि डिमीट्री अद्यापही एक टन डेपोवर पोलर पार्टीची वाट पाहत होते ! हवामान झपाट्याने बिघडत चाललं होतं.

चेरी-गॅराड म्हणतो,
" रात्री किमान -४० अंश सेल्सीयसपर्यंत तापमान घसरत होतं. आम्ही पुढे काय करावं याची चर्चा करत इथे वाट पाहत थांबलो आहोत. काल रात्री मला पोलर पार्टी दूरवरुन येताना दिसल्याचा भास झाला ! स्कॉट आल्याची माझी इतकी खात्री पटली होती, की मी त्या दिशेने जाण्यास जवळजवळ निघालोच होतो !"
१० मार्चला स्कॉट आपल्या डेपोवर पोहोचला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कुत्र्यांच्या तुकडीने तिथे भेट दिलेली नव्हती ! इंधनाचे कॅन उघडून पाहिल्यावर स्कॉट निराश झाला. त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी इंधन तिथे उपलब्ध होतं. त्यातच खाद्यपदार्थांचीही कमतरता असल्याचं त्याच्या ध्यानात आलं !

" अखेर आम्ही डेपोवर पोहोचलो खरे," स्कॉटने डायरीत नोंद केली, " परंतु इथे एकही गोष्ट धड नाही. खाद्यपदार्थ, इंधन सगळ्याचीच कमतरता आहे ! यात कोणाचा दोष आहे याची मला कल्पना नाही, मात्रं पुढे गेलेल्यांनी मागून येणा-यांचा विचार केला आहे असं मला वाटत नाही. आम्ही ज्यांच्यावर अवलंबून होतो, ती कुत्र्यांची तुकडी सपशेल अपयशी ठरलेली दिसते आहे ! मेयर्सला परतीच्या वाटेवर बराच त्रास झाला असावा ! आम्ही कठीण परिस्थितीत सापडलो आहोत !”

वास्तविक पूर्वी ठरलेल्या योजनेत बदल करुन कुत्र्यांसह मेयर्सला पुढे नेण्याचा स्कॉटचा निर्णय याला कारणीभूत होता. योग्य वेळी कुत्र्यांसह मेयर्स केप इव्हान्सला न पोहोचल्याने त्याला पुन्हा दक्षिणेला येणं अशक्यं झालं होतं. तसंच स्कॉटने शेवटच्या क्षणी पोलर पार्टीत चार ऐवजी पाचा माणसांचा समावेश केल्यामुळे टेडी इव्हान्सच्या तुकडीला सर्व खाद्यपदार्थांची दर कँपवर नव्याने वाटणी करावी लागली होती, परंतु या गोष्टीचा स्कॉटला विसर पडला होता !

हवामान आता झपाट्याने बिघडत चाललं होतं. थंडगार वा-यांचा जोर चांगलाच वाढत होता. त्यातच ओएट्सची अवस्था अत्यंत दयनिय झाली होती. आपण सुखरुप परतू शकणार नाही याची त्याला जवळपास खात्री पटत चालली होती.

" डॉक्टर, मला किती चान्स आहे असं तुम्हांला वाटतं ?" ओएट्सने विल्सनला विचारलं !
" मला कल्पना नाही !" विल्सन उत्तरला, " परंतु तू हिम्मत सोडू नकोस ! काही दिवसांचाच प्रश्न आहे ! एकदा एक टन डेपोला पोहोचलो की मग आपल्याला चिंता नाही !"

विल्सनचा स्वतःचा तरी आपल्या शब्दांवर विश्वास होता की नाही कोणास ठाऊक, परंतु डॉक्टर म्हणून ओएट्सला धीर देण्याचं आपलं कर्तव्य बजावत होता ! स्कॉट म्हणतो,

" ओएट्सच्या पायाची अवस्था पाहता, एखादा चमत्कार झाला तरच... अन्यथा त्याची वेळ आली आहे ! त्याच्यामुळे आम्हांला कित्येकदा खोळंबून राहवं लागतं आहे ! अर्थात त्याला आमचा नाईलाज आहे ! बिचा-याला धीर देण्याव्यतिरिक्त आम्ही काहीच करु शकत नाही. परिस्थिती अशीच राहीली तर आम्ही तरी सुखरुप एक टन डेपो गाठू शकतो का ?"
पोलर पार्टीची वाट पाहत एक टन डेपोवर थांबलेल्या डिमीट्री आणि चेरी-गॅराडने अखेर कँप सोडला आणि हट पॉईंटची वाट धरली.

..... आणि स्कॉटची कुत्र्यांच्या मदतीची शेवटची आशा मावळली !

स्कॉट आणि इतर सर्वजण एक टन डेपो पासून अवघ्या ७० मैलांवर होते ! चेरी-गॅराडला याची कल्पना असती तर.....

स्कॉटला आता आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावर एक टन डेपो गाठावा लागणार होता ! मात्रं ओएट्सची अवस्था पाहता त्याला ते जवळपास अशक्यंच होतं !

पुढील तीन दिवसात त्यांनी आणखीन वीस मैलांची मजल मारली. तापमान -४३ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं !

एक दिवस स्कॉटने विल्सनला आदेश दिला,

" या सर्व वेदनांतून कायमची सुटका करणारी जी औषधं तुझ्यापाशी आहेत, त्याची सर्वांमध्ये योग्य प्रमाणात विभागणी कर !"
स्कॉटच्या या आदेशाने विल्सन हादरुन गेला, परंतु स्कॉटचा हुकूम टाळणं त्याला शक्यं नव्हतं. त्याने स्कॉट, बॉवर्स आणि ओएट्सला प्रत्येकी तीस अफूच्या गोळ्या दिल्या ! मॉर्फीनने भरलेली एक ट्यूब त्याने स्वतःसाठी ठेवली होती !

" आमच्यापाशी अद्यापही चार ते पाच दिवस पुरतील इतके खाद्यपदार्थ आहेत. एक टन डेपोपासून आम्ही बहुतेक ४२ मैलांवर आहोत ! ओएट्सला घेऊन दिवसाला ६ मैलांपेक्षा जास्तं अंतर कापणं आम्हाला अशक्यं आहे ! तरीही डेपो पासून १० मैल अंतर बाकी राहील !  सहनशक्तीच्या पलिकडे हवामान थंडगार आहे. वा-याचा जोर असह्य आहे ! वर्षाच्या या वेळेला हिमवादळाने गाठावं यापेक्षा दुसरं दुर्दैवं कोणतं ?"
होबार्ट बंदरात पोहोचल्यापासून अ‍ॅमंडसेनने प्रत्येक गोष्टीतून योहान्सनला कटाक्षाने वगळलं होतं ! कोणत्याही समारंभापासून अथवा सत्कारापासून त्याने योहान्सनला जाणिवपूर्वक दूर ठेवलं होतं ! आपला हा अपमान योहान्सनला सहन झाला नाही ! तो दारुच्या आहारी गेला ! अ‍ॅमंडसेनला तेवढंच निमीत्तं पुरलं ! त्याने योहान्सनची फ्रामवरुन हकालपट्टी केली. त्याला दुस-या जहाजावरुन एकट्याने नॉर्वेला परतण्याचा आदेश दिला !

योहान्सनने फ्राम सोडताच अ‍ॅमंडसेनने आपल्या मोहीमेतील प्रत्येकाला मोहीमेबद्दल एक शब्दही न उच्चारण्याची तंबी दिली ! मोहीमेची संपूर्ण हकीकत लिहीण्याचा अधिकार फक्त अ‍ॅमंडसेनला होता ! मोहीमेचं तपशीलवार वर्णन करणारं त्याचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार होतं !  फ्रामवरील प्रत्येकाची अशा आशयाच्या करारावर त्याने सही घेतली होती !

अ‍ॅमंडसेनने नॅन्सनला लिहीलेल्या पत्रात योहान्सनने आपला आदेश मानण्यात नकार दिल्याचा आरोप केला ! त्याच्या लहरीपणामुळे सर्व मोहीमेलाच धोका उत्पन्न होण्याची शक्यत असल्यामुळे दक्षिण धृवावर जाणा-या तुकडीत त्याचा समावेश केला नसल्याचं त्याने स्पष्टीकरण दिलं. होबार्टला परतल्यावर दारुच्या नशेत तो इतरांना त्रास देत असल्याने आणि त्यांच्या कामात अडथळे आणत असल्यामुळे त्याची फ्रामवरुन हकालपट्टी केल्याचं नमूद केलं ! योहान्सनने स्वत:चा जीव धोक्यात घालून हिमवादळाशी मुकाबला करत प्रेस्टर्डला सुखरुप फ्रामहेम मध्ये आणल्याचा मात्रं त्याने उल्लेखही केला नाही !

एवढं करुनही अ‍ॅमंडसेनचं समाधान झालं नव्हतं ! योहान्सनचं पूर्णपणे खच्चीकरण करण्याचा त्याने चंग बांधला होता. नॉर्वेजियन जॉग्रॉफीक सोसायटीच्या अध्यक्षाला अ‍ॅमंडसेनने तार केली,

" योहान्सनने बंड पुकारल्यामुळे त्याला फ्रामवरुन बडतर्फ करण्यात आलं आहे ! नॉर्वेतील कोणत्याही समारंभामध्ये त्याचा समावेश करण्यात येऊ नये !"
असामान्य धाडसी दर्यावर्दी असलेल्या अ‍ॅमंडसेनेनची ही काळी बाजू

१५ मार्चला चेरी-गॅराड आणि डिमीट्री हट पॉईंटला येऊन पोहोचले. परतीच्या प्रवासात डिमीट्रीने आपलं डोकं जडावल्याची आणि उजव्या हातात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. हट पॉईंटला पोहोचल्यावर त्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती. चेरी-गॅराडला मात्रं तो पुन्हा दक्षिणेकडे येणं टाळण्यासाठी सबब शोधतो आहे अशी पक्की खात्री वाटत होती !

स्कॉटच्या तुकडीची अवस्था आता गंभीर झाली होती. हिमवादळाचा जोर वाढतच होता. तापमान -४५ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं. स्कॉट आणि बॉवर्सने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आतापर्यंत स्वतःला फ्रॉस्टबाईटपासून मुक्तं ठेवण्यात यश मिळवलं होतं.  आपल्याला पुढे जात राहणं आवश्यक आहे हे स्कॉटला समजत होतं, परंतु सर्वांचीच शारिरीक क्षमता हळूहळू कमी होत होती. दिवसाला जेमतेम ५ ते ६ मैल अंतर चालणंही जिकीरीचं होत होतं.

१७ मार्चच्या सकाळी ओएट्स झोपेतून जागा झाला. आपला अंत जवळ आल्याचं त्याला कळून चुकलं होतं. आपल्याला स्लिपींग बॅगमध्ये ठेवून इतरांनी पुढे निघून जावं अशी त्याने आदल्या दिवशी स्कॉटला विनंती केली. स्कॉट, विल्सन, आणि बॉवर्स, तिघांनीही त्याला ठाम नकार दिला होता. रात्री झोपेतच आपल्याला मृत्यू यावा असं त्याने स्कॉटपाशी बोलून दाखवलं होतं ! सकाळी जाग येताच पुढचा निर्णय त्याने घेतला असावा.

" मी जरा बाहेर जातो आहे !" ओएट्स सहज स्वरात स्कॉटला म्हणाला, " परत येण्यास कदाचित वेळ लागेल !"
ओएट्सचे हे शेवटचे शब्दं ! तंबूतून बाहेर पडून तो हिमवादळात नाहीसा झाला !

पुन्हा तो कधीही कोणालाही दिसला नाही !

स्कॉटच्या तुकडीतील दुस-या माणसाने मृत्यूला कवटाळलं !

आपल्यामुळे आपल्या सहका-यांचा जीव धोक्यात आल्याची ओएट्सला कल्पना आली होती. आपल्याला सोडून ते पुढे जाणार नाहीत हे त्याला पक्कं ठाऊक होतं. आपल्या पायांनी चालत तो मृत्यूच्या भेटीला गेला !

" ओएट्स अत्यंत शूर आणि धाडसी सैनिक होता !" स्कॉटने खिन्नपणे आपल्या डायरीत नोंद केली, " शेवटच्या क्षणी आपल्या आईचे विचार त्याच्या मनात होते. ज्या शांतपणे आणि धैर्याने आपण मृत्यूला सामोर जात आहोत, त्याने आपल्या रेजिमेंटमधील सहका-यांना अभिमान वाटेल अशी त्याची भावना होती. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला अपार वेदना होत होत्या, परंतु एका शब्दानेही त्याने त्या ब्यक्त केल्या नाहीत ! तो सकाळी तंबूबाहेर पडला तेव्हा आपल्या मृत्यूला आलिंगन देण्यासाठी चालला आहे याची आम्हांला कल्पना आली होती. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्नं केला, परंतु त्याचा निर्णय झाला होता ! त्याने केलेला त्याग असामान्य आहे ! देव त्याच्या आत्म्याला शांती देवो !"


कॅप्टन लॉरेन्स 'टायटस' ओएट्स

ओएट्सची स्लीपींग बॅग, डाय-या, कॅमेरा आणि काही उपकरणं तिथे ठेवली आणि पुढचा मार्ग धरला. विल्सनच्या सूचनेवरुन जमा करण्यात आलेले खडकांचे आणि जीवाश्मांची सुमारे ३० पौंड वजनाचे नमुने मात्रं त्यांनी आपल्या स्लेजवर घेतले होते !

ओएट्सच्या त्यागाचा किती उपयोग होणार होता ?

स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांच्या भविष्यात काय लिहीलं होतं ?

फ्रामने होबार्ट सोडलं आणि ब्युनॉस आयर्सची वाट पकडली. ब्युनॉस आयर्सला आवश्यक साधनसामग्री घेऊन उत्तर धृवाच्या मूळच्या मोहीमेवर निघण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. स्वतः अ‍ॅमंडसेन मात्र फ्रामबरोबर न जाता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या व्याख्यानांच्या दौ-यावर रवाना झाला !

डिस्कव्हरी मोहीमेत स्कॉटच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचा अधिकारी असलेल्या अल्बर्ट आर्मिटेजने फ्रिट्झॉफ नॅन्सनला पत्रं लिहून अ‍ॅमंडसेनच्या यशस्वी मोहीमेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केलं. तो म्हणतो,

" अ‍ॅमंडसेनच्या यशाने एक गोष्ट निश्चित सिध्द होते, ती म्हणजे प्रॅक्टीकल अनुभव आणि लॉजिक याला पर्याय नाही ! स्कीईंग आणि कुत्र्यांचा क्षमतेबद्दल आणि त्यांचा नियोजनपूर्वक वापर करण्याबद्दल असलेले स्कॉट आणि त्याच्या सहका-यांना असलेले पूर्वग्रह याचा विचार केला तर स्कॉटला आपलं लक्ष्यं गाठून सुखरुप परत येणं खूपच कठीण जाण्याची शक्यता आहे !"
आर्मिटेजचा हा निष्कर्ष अचूक होता !

स्कॉटचा उजवा पाय बर्फात कोलमडून पडल्यामुळे जबरदस्त दुखावला होता. त्यातच त्याला अपचनाचा त्रास सुरू झाला ! त्यांच्यापाशी आता जेमतेम दोन दिवस पुरेल इतकेच अन्नपदार्थ आणि एक दिवसापुरतं इंधन शिल्लक होतं. वा-याचा जोर अद्याप कायम होता. स्कॉट म्हणतो,

" दिवसभरात जेमतेम ५-६ मैलांवर मजल मारणं आम्हाला अशक्यं झालं आहे ! ! एक टन डेपोवर पोहोचण्यात आम्हांला अद्याप किमान तीन दिवस लागतील. धृवावर जाताना हेच अंतर आम्ही एका दिवसात पार केलं होतं !"
२० मार्चला स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स एक टन डेपोपासून ११ मैलांवर येऊन पोहोचले होते !

" स्लेज ओढणं आता अशक्यंप्राय होत चाललं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " आमच्याजवळचं इंधन जवळपास संपलं आहे ! स्पिरीटही अगदी थोडंसं शिल्लक आहे !  हिमवादळाचा जोर ओसरण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत ! मला पुढे चालणं अशक्यं होत आहे ! आम्हांला गरम अन्न मिळाल्याखेरीज अधिक श्रम करणं अशक्यं आहे ! उद्या विल्सन आणि बॉवर्स एक टन डेपोवर जाण्यासाठी निघणार आहेत !"
बॉवर्सने आपल्या आईला पत्रं लिहीलं,
" आमचा परतीचा प्रवास अपेक्षेपेक्षा  बराच खडतर आहे ! एडगर इव्हान्सने बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्याशी मरण पावला. लेफ्टनंट ओएट्सही चार दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेला ! बॅरीयरवरील उतरलेल्या तापमानामुळे आणि आमच्या आजारी असलेल्या सहका-यांमुळे अपेक्षेप्रमाणे वाटचाल करणं आम्हांला शक्यं झालेलं नाही. मोसमाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे आम्हाला वाढत्या थंडीशी सामना करावा लागतो आहे. आमच्यापाशी फारसे खाद्यपदार्थ आणि इंधनही शिल्लक नाही, परंतु मी आशा सोडलेली नाही ! उद्या डॉक्टर विल्सनबरोबर मी एक टन डेपो कडे जाणार आहे. डेपो पर्यंतचा आणि तिथून स्कॉटपर्यंतचा परतीचा प्रवास करणं कसं शक्यं होईल हे परमेश्वरालाच ठाऊक, पण माझी त्याच्यावर नितांत श्रध्दा आहे. माणसाचे सर्व उपाय थकले की देवाला साकडं घालणं हाच उपाय उरतो. मृत्यूची साद मला ऐकू येते आहे, परंतु तुझ्यासाठी जीव बचावून परत येण्याची माझी  इच्छा अभंग आहे ! जर मरण आलंच, तर माझ्या सहका-यांसह मी त्याला आनंदाने सामोरा जाईन ! तुझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल... परंतु शेवटच्या क्षणी मी आनंदात होतो आणि सहज झोपी जावं इतक्या शांतपणे गेलो याची तू खात्री बाळग !"
दुस-या दिवशी हिमवादळाचा जोर आणखीन वाढला ! विल्सन आणि बॉवर्सला तंबूतून बाहेर पडणंही शक्यं झालं नाही !

" उद्या शेवटचा चान्स आहे !" २३ मार्चला स्कॉटने डायरीत नोंद केली, " उद्या आम्ही एक टन डेपोकडे जाण्यास निघणार आहोत. वाटेवरच आमच्या नशिबात मृत्यू आला तर त्यालाही आमची तयारी आहे !"

दुस-या दिवशी हिमवादळाचा जोर पूर्वीपेक्षाही वाढला होता ! त्यांना निघणं अशक्यं झालं !

आपला शेवट जवळ आल्याची स्कॉटला कल्पना आली !

विल्सनने दिलेल्या अफूच्या गोळ्या त्यांच्यापाशी होत्या. त्या गोळ्या खाऊन अफूच्या गुंगीत सगळ्या वेदनांपासून मुक्तं होणं शक्यं होतं ! परंतु तो विचार स्कॉटच्या मनाला शिवला नाही.

"आम्ही इंग्लिश परंपरेला अनुसरुन नैसर्गीक रित्या येणा-या मृत्यूचं स्वागत करण्यास सिध्द आहोत !"

स्कॉटने आता आपल्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना पत्रं लिहीण्यास सुरवात केली !