Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

आफ्रीकेच्या दक्षिणेलाही महासागरच पसरलेला आहे दे डायझच्या सफरीमुळे सप्रमाण सिध्द झालं होतं. पुरातन ग्रीक सिध्दांतानुसार दक्षिणेला असलेली जमीन आफ्रीकेच्या दक्षिणेला असलेल्या महासागराच्याही पलीकडे असणार होती !

१५२२ मध्ये फर्डीनांड मॅजेलनने दक्षिण अमेरीकेच्या दक्षिणेच्या भागात असलेल्या मॅजेलन सामुद्रधुनीचा ( ५४ अंश दक्षिण ) शोध लावला. या सामुद्रधुनीच्या मार्गाने त्याने अटलांटीक महासागरातून पॅसीफीक महासागरात प्रवेश करण्यात यश मिळवलं.
मॅजेलननंतर सुमारे ५६ वर्षांनी १५७८ मध्ये फ्रान्सिस ड्रेकने मॅजेलन सामुद्रधुनीतून पॅसीफीक महासागरात प्रवेश केला. पॅसीफीकमध्ये आलेल्या झंझावाती वादळामुळे ड्रेकचं जहाज दक्षिणेच्या दिशेने भरकटलं. अटलांटीक आणि पॅसीफीक महासागरांना जोडणा-या सुमारे ५०० मैल रुंदीच्या ड्रेक पॅसेजचा अपघातानेच ड्रेकला पत्ता लागला होता ! 

१५९९ मध्ये डच दर्यावर्दी डर्क गेरिट्झ आणि १६०३ मध्ये स्पॅनीश दर्यावर्दी गॅब्रीएल डी कॅस्टीला या दोघांनीही ६४ अंश दक्षिणेला सागरात बेटं दिसल्याचा दावा केला. कॅस्टीलाचा दावा खरा मानला तर त्याला दिसलेली बेटं ही साऊथ शेटलँड बेटं असावीत.

१६१५ मध्ये जेकब ला मेर आणि विल्यम शूटेन यांनी मॅजेलन सामुद्रधुनीतून न जाता दक्षिणेला असलेल्या ड्रेक पॅसेजमधून यशस्वीपणे दक्षिण अमेरिकेला वळसा घालून अटलांटीक मधून पॅसीफीक महासागरात प्रवेश केला. ड्रेक पॅसेजमधून जाताना त्यांना झंझावाती वा-यांना तोंड द्यावं लागलं होतं. दक्षिण अमेरिकेच्या या शेवटच्या टोकाला शूटेनने आपल्या हूर्न या गावावरून नाव दिलं...

केप हॉर्न !


केप हॉर्न !

१६१९ मध्ये गार्सिया द नॉडल या स्पॅनीश मोहीमेतील दर्यावर्दींना डिएगो रॅमीरेझ बेटांचा शोध लागला. केप हॉर्नच्याही दक्षिणेला असलेली ही बेटं त्या काळी ज्ञात असलेला सर्वात दक्षिणेचा भूभाग होता.

ग्रीकांच्या सिध्दांतावर आधारीत टॉलेमीच्या टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा चा अद्याप कोणालाही पत्ता लागलेला नव्हता !

१७६९ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक ताहीती बेटांवर पोहोचला. इंग्लंडहून निघाल्यावर केप हॉर्नला वळसा घालून ड्रेक पॅसेजमार्गे पॅसीफीक मध्ये पोहोचण्यास त्याला जवळपास ८ महीने लागले होते. ताहीतीला येण्याचा कूकचा हेतू शुक्राच्या पृथ्वी आणि सूर्यादरम्यान होणा-या संक्रमणाचं निरीक्षण करणं हा असला तरीही टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटाचा शोध घेऊन त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापीत करण्याची ब्रिटीश रॉयल सोसायटीने कूकला सूचना दिली होती. 

ताहीती बेटांवरुन निघाल्यावर कूकने न्यूझीलंड गाठलं. न्यूझीलंड बेटांभोवती फेरी पूर्ण करुन त्याने न्यूझीलंडचा नकाशा तयार केला. २३ एप्रिल १९७० ला कूकला ऑस्ट्रेलियाचं प्रथम दर्शन झालं. २९ एप्रिलला कूकने ऑस्ट्रेलियाच्या किना-यावर पाय ठेवला. पुढे ग्रेट बॅरीयर रीफमध्ये कूकच्या काफिल्यापैकी एका जहाजाचं कोरलवर आदळून अतोनात नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाच्या सर्व किना-यावर कूकने ब्रिटीश साम्राज्याचा भाग म्ह्णून दावा केला. पुढे जकार्ता मार्गे केप ऑफ गुड होपला वळसा घालून कूक इंग्लंडला परतला.

न्यूझीलंड बेटं हा मोठ्या भूभागाचा एक हिस्सा असावा ही पूर्वीची समजूत निर्वीवादपणे चुकीची होती हे
कूकच्या या सफरीमुळे स्पष्ट झालं. अर्थात अॅरिस्टॉटलच्या सिध्दांतावर गाढ विश्वास असलेल्या रॉयल सोसायटीच्या सदस्यांनी कूकला पुढच्या सफरीवर आणखीन दक्षिणेला शोध घेण्याचा आदेश दिला. 

कूकने पुन्हा इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. १७ जानेवारी १७७३ या दिवशी प्रचंड धुक्यात आणि झंझावाती वा-याशी मुकाबला करत कूकने अंटार्क्टीक सर्कल ( ६६ अंश दक्षिण ) ओलांडलं. ३१ जानेवारीला कूक ७१'१०'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचला, परंतु अपेक्षीत असलेला भूभाग त्याच्या दृष्टीस पडला नाही. ताहीती बेटांवरुन आवश्यक ती सामग्री घेऊन कूक पुन्हा दक्षिणेकडे निघाला, परंतु त्याला कोणताही सागरकिनारा आढळून आला नाही. परतीच्या प्रवासात कूकने सॅंडविच बेटांचा ताबा घेतला. सँडविच बेटं ही डिएगो रॅमीरेझ बेटांच्याही दक्षिणेला असलेल्याचं आढळून आलं.

अंटार्क्टीकापासून अवघ्या ७५ मैलांवरुन कूकने माघार पत्करली !

कूकच्या सफरीमुळे टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटाच्या अस्तीत्वाविषयी असलेली आशा कमी होण्यास सुरवात झाली. (तिस-या सफरीवर हवाई बेटांवर झालेल्या संघर्षात कॅप्टन जेम्स कूक हवाईयन लोकांकडून मारला गेला).

ब्रिटीश दर्यावर्दी मॅथ्यू फिंडलर्सने १७९९ च्या सुमाराला टास्मानिया हे छोटं बेट असल्याचा शोध लावला. आपल्या पुढच्या सफरीत फिंडलर्सने ऑस्ट्रेलियाभोवती संपूर्ण प्रदक्षिणा घातली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या किना-याचा पहिला तपशीलवार नकाशा तयार केला. न्यूझीलंडच्या उत्तर दिशेला ऑस्ट्रेलिया आढळल्याने टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा म्हणजे हा भूभाग नव्हे याची फिंडलर्सला पक्की खात्री होती.

फिंडलर्सच्या मते दक्षिणेला आणखीन मोठा भूभाग आढळणं हे अशक्यंच होतं. इंग्लंडला परतल्यावर आपला हा सिध्दांत त्याने 'व्हॉयेज टू टेरा ऑस्ट्रलिस' या आपल्या पुस्तकात मांडला. दक्षिण महासागरात आणखीन मोठा भूप्रदेश आढळण्याची शक्यता नसल्याने फिंडलर्सने या प्रदेशाला नाव दिलं... 

ऑस्ट्रेलिया !

फिंडलर्सची ही समजूत चुकीची होती हे पुढे सिध्दं झालं. परंतु तोपर्यंत ऑस्ट्रेलिया हे नाव रुढ झालं होतं.

१८१९ च्या सुरवातीला कॅप्टन विल्यम स्मिथ चिलीहून इंग्लंडच्या मार्गावर होता. केप हॉर्नला वळसा घालून अटलांटीक मध्ये प्रवेश करताना ड्रेक पॅसेजमध्ये त्याने दक्षिण दिशा पकडली. १९ फेब्रुवारीला ६२ अंश दक्षिण अक्षवृत्तवर नवीन बेटं त्याच्या दृष्टीस पडली ! ६० अंश च्या दक्षिणेला दिसलेला हा पहिला भूभाग होता. पुढे दुस-या सफरीवर १६ ऑक्टोबरला तो त्या बेटावर उतरला. त्या बेटाला त्याने नाव दिलं किंग जॉर्ज ! त्या संपूर्ण बेटांच्या समुहाला त्याने स्कॉटलंडजवळच्या शेटलँड बेटांवरुन नाव दिलं...

साऊथ शेटलँड बेटं !