Android app on Google Play

 

श्री विश्वेश्वर महादेव

 
फार वर्षांपूर्वी विदर्भ नगरात विदूरथ नावाचा राजा होऊन गेला. एकदा तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला. त्याने चुकून मृगाची कातडी नेसलेल्या ध्यानमग्न अशा ब्राम्हणाची हत्या केली. या पापामुळे तो ११ वेगवेगळ्या योनीत जन्म घेत राहिला. ११ व्या योनीत तो चांडाळ म्हणून जन्माला आला आणि धन चोरण्यासाठी एका ब्राम्हणाच्या घरात शिरला असताना लोकांनी त्याला पकडून एका झाडाला टांगले. मृत्यू येईपर्यंत  चांडाळ शूलेश्वर च्या उत्तरेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेत राहिला. त्यामुळे मरणोत्तर तो स्वर्गात गेला. नंतर पृथ्वीवर विदर्भ नगरीतच तो राजा विश्वेश म्हणून जन्माला आला. त्याला आपला मागचा जन्म लक्षात होता.
तो अवंतिका नगरीत असलेल्या त्या शिवलिंगाजवळ पोचला आणि विधियुक्त असे महादेवाचे पूजन केले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वर मागायला सांगितला. राजाने मागितले की या सृष्टीत कोणाचेही पतन होऊ नये आणि तुमचे नाव विश्वेश्वर या नावाने प्रसिद्ध व्हावे. विश्वेश राजाला वरदान दिल्यामुळे हे शिवलिंग विश्वेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या महादेवाचे दर्शन पूजन करतो त्याचे ७ जन्मांचे पाप नाहीसे होते.