Android app on Google Play

 

श्री सिंहेश्वर महादेव

 


एकदा पार्वतीने महान तपश्चर्या केली. तिच्या तपाने तीनही लोक जळू लागले. हे पाहून ब्रम्हदेव पार्वतीकडे आले आणि म्हणाले की तू कशासाठी तप करत आहेस? तुला जे काही पाहिजे असेल ते माझ्याकडे माग. तिने सांगितले की शंकर माला काळी म्हणतात, मला गोरा वर्ण पाहिजे. यावर ब्रम्हदेव म्हणाले की काही काळानंतर तुझी इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून पार्वती क्रोधीत झाली. तिच्या क्रोधातून एक सिंह उत्पन्न झाला.
सिंह भुकेला होता आणि पार्वतीला खाण्यासाठी तिच्याकडे वळला, परंतु पार्वतीचे तेज आणि तप यामुळे तो तिला खाऊ शकला नाही आणि तिथून जाऊ लागला. त्याला निघून जाताना बघून पार्वतीला त्याची दया आली आणि तिने दुधाची अमृत वर्षा केली. त्यानंतर सिंह तिच्याकडे आला आणि म्हणाला की मी मातेला मारणार होतो, मी पापी आहे. मला नरकात जावे लागेल. हे ऐकून पार्वती म्हणाली की तू महाकाल वनात जा. तिथे कंटेश्वर महादेवाच्या जवळ उत्तम शिवलिंग आहे. त्याचे दर्शन पूजन कर. तू पापमुक्त होशील. माता पार्वतीचे बोल ऐकून सिंह महाकाल वनात आला आणि त्याने शिवलिंगाचे दर्शन पूजन करून दिव्य देह प्राप्त केला.
आईच्या मायेपोटी पार्वती देखील तिथे आली. सिंहाच्या दर्शन पूजनामुळे तिने या शिवलिंगाचे नाव सिंहेश्वर ठेवले. त्याच दरम्यान ब्रम्हदेव तिथे आले आणि पार्वतीला म्हणाले की तुझ्या क्रोधातून हा सिंह उत्पन्न झाला आहे, तेव्हा आता तो तुझे वाहन बनेल. त्यानंतर पार्वतीचा वर्ण गोरा झाला.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य सिंहेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो तो अक्षय स्वर्गात वास्तव्य करतो, नुसत्या दर्शनाने देखील सर्व पापे नष्ट होतात आणि त्याच्या ७ पिढ्यांचा उद्धार होतो.