Get it on Google Play
Download on the App Store

श्री मतंगेश्वर महादेव


द्वापार युगात एक सुगती नावाचा ब्राम्हण होता. त्याच्या घरी मतंग नावाचा पुत्र जन्माला आला. बाल्यावस्थेतच मतंग क्रूर स्वभावाचा बनला. एकदा बालक मतंग आपल्या आईच्या मातेच्या मांडीवर बसून लाकडाने आपल्या वडिलांना मारत होता. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या एका गर्दाभीने सांगितले की हा ब्राम्हण नाही, हा तर चांडाळ आहे.
गर्दभीचे बोलणे ऐकून त्या बालकाने तिला विचारले की मी चांडाळ कसा काय झालो ते मला सांग. तेव्हा गर्दाभीने त्याला संपूर्ण कथा सविस्तर सांगितली. मतंगाने निश्चय केला की तो ब्राम्हणत्व प्राप्त करेल. असा निश्चय करून तो तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर इंद्र त्याच्यापुढे प्रकट झाला आणि त्याला सांगितले की तुला जे पाहिजे ते माग. मतंगाने इंद्राला सांगितले की मला ब्राम्हणत्व पाहिजे आहे. इंद्राने त्याला सांगितले की तू चांडाळ योनीत जन्माला आला आहेस, तुला ब्राम्हणत्व मिळू शकत नाही. त्यानंतर देखील मातंगाने हजारो वर्षे तपश्चर्या केली, इंद्राने त्याला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकले नाही, त्याने गया इथे जाऊन तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकदा पुन्हा इंद्र त्याला समजावून सांगण्यासाठी आला तेव्हा त्याने विचारले की मला ब्राम्हणत्व कसे प्राप्त होईल याचा उपाय मला सांगा. इंद्राने सांगितले की अवंतिका नगरीत महाकाल वनात सिद्धेश्वर महादेवाच्या पूर्वेला एक शिवलिंग आहे. तू त्याचे दर्शन पूजन कर. त्याचे सांगणे ऐकून मतंग अवंतिका नगरीत महाकाल वनात आला आणि इथे येऊन त्याने शिवलिंगाचे दर्शन पूजन केले. त्यामुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. अशा प्रकारे तो ब्रम्ह्लोकाला प्राप्त झाला. मतंग च्या पूजनामुळे हे शिवलिंग मतंगेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की कोणत्याही क्रूर मनुष्याने जर मतंगेश्वर महादेवाचे दर्शन पूजन केले तर तो शुद्ध होऊन अंती ब्रम्ह लोकाला जातो.