प्रभू रामाशी पहिली भेट
प्रभू श्रीरामांना इ. स. पू. ५०८९ मधील ५ जानेवारीला वनवास झाला. त्या वेळी त्यांचे वर २५ वर्षांचे होते. वनवासाच्या १३ व्या वर्षी त्यांचे खर आणि दूषण यांच्याशी युद्ध झाले होते. ही तिथी इ. स. पू. ७ ऑक्टोबर ५०७७ ही होती, तेव्हा अमावस्या होती. या वर्षीच श्रीरामांची भेट हनुमानाशी झाली होती. हनुमान आणि सुग्रीव यांना भेटल्यावर ज्या दिवशी प्रभू रामांनी वालीचा वध केला होता तेव्हा आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होते. नासाच्या प्लेटिनियम सॉफ्टवेयर नुसार ही तिथी इ. स. पू. ३ एप्रिल ५०७६ अशी समजते. हनुमानाला रामाचा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठा भक्त मानले जाते. हनुमान सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. हनुमानाशिवाय रामही नाही आणि रामायणही. असं म्हणतात की जग चालत नाही रामाशिवाय आणि राम चालत नाही हनुमानाशिवाय. जेव्हा रावण पंचवटी (महाराष्ट्रातील नाशिक जवळ) इथून सीता मातेचे अपहरण करून लंकेला उडाला, तेव्हा राम आणि लक्ष्मण जंगले विंचरून काढत सीता मातेला शोधत होते. असे अनेक प्रसंग आले, जेव्हा त्यांच्या हाती केवळ निराशा पडली आणि ते हताश झाले. या दरम्यान अनेक घटना घडल्या. एकीकडे जिथे सीतेच्या शोधात राम रानोवनी भटकत होते, तेव्हा दुसरीकडे किष्किंधाचे दोन वानरराज भाऊ वाली आणि सुग्रीव यांच्यात युद्ध झाले आणि सुग्रीवाला पळून जाऊन ऋष्यमूक पर्वताच्या एका गुहेत लपून राहावे लागले. याच क्षेत्रातील असलेल्या अंजनी पर्वतावर हनुमानाच्या वडिलांचे राज्य होते, जिथे हनुमान राहत होता. सीतेचा शोध घेत राम आणि लक्ष्मण ऋष्यमूक पर्वताजवळ पोचले. वाल्मिकी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे ऋष्यमूक पर्वत हा वानरांची राजधानी किष्किंधा पासून जवळच होता. इथल्या एका गुहेत सुग्रीव आपले मंत्री आणि विश्वस्त वानरांसोबत राहत होता. राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत या पर्वतावर आले. जेव्हा सुग्रीवाने राम आणि लक्ष्मण यांना पहिले तेव्हा तो भयभीत झाला. इतके बलवान आणि तेजस्वी मनुष्य त्याने कधीही पहिले नव्हते. तो पळत हनुमानाकडे गेला आणि सांगू लागला की आपल्या प्राणांना धोका आहे.
सुग्रीवाला वाटत होते की कदाचित त्यांना वालीने पाठवले असावे. सुग्रीवाने हनुमानाला सांगितले की तू ब्रम्हचाऱ्याचा वेश घेऊन त्यांच्या समोर जा आणि त्यांच्या मनातली गोष्ट माहित करून घे आणि मला इशारा करून सांग. जर त्यांना वालीने पाठवले असेल तर मी लगेच इथून दुसरीकडे पळून जाईन. सुग्रीवाचे बोलणे ऐकून हनुमान ब्रम्हचारी रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांच्या समोर गेला आणि विनम्रतेने नतमस्तक होऊन त्यांना विचारू लागला, "हे वीर, सावळे आणि गोरे शरीर असणारे आपण कोण आहात, जे क्षत्रियाच्या रूपाने वनात फिरत आहात? हे स्वामी, या कठोर जमिनीवर आपल्या कोमल, नाजूक पावलांनी चालणारे तुम्ही कोणत्या हेतूने या जंगलात फिरत आहात?" हनुमानाने पुढे म्हटले की - मनाला मोहून टाकणारे असे तुमचे सुंदर, कोमल अंग आहे आणि तुम्ही या जंगलातील असह्य ऊन आणि वारा सहन करत आहात. तुम्ही ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन देवतांपैकी कोणी आहात का? की तुम्ही दोघे नर आणि नारायण आहात? प्रभू श्रीरामांनी सांगितले - आम्ही कोसलराज महाराज दशरथ यांचे पुत्र आहोत आणि पित्याच्या वचनाचे पालन करण्यासाठी या वनात आलो आहोत. आमची नावे राम आणि लक्ष्मण आहेत. आम्ही दोघे भाऊ आहोत. आमच्या सोबत सुंदर सुकुमार अशी स्त्री होती. इथे (वनात) राक्षसाने माझी पत्नी जानकी हिचे अपहरण केले आहे. ब्राम्हण महाराज, आम्ही तिलाच शोधत फिरत आहोत. आम्ही आमची संपूर्ण ओळख तुम्हाला सांगितली. आता ब्राम्हण महाराज, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही कोण आहात? प्रभूंना ओळखून हनुमानाने त्यांच्या पायावर लोटांगण घातले. त्याने साष्टांग नमस्कार घालून प्रभूंची स्तुती केली. आपल्या नाथाला, स्वामीला ओळखल्यामुळे हृदयात आनंदाच्या लाखो लहरी उमटत होत्या. मग हनुमान म्हणाला, "स्वामी, मी जे विचारले ते माझे विचारणे न्याय्य होते. इतक्या वर्षांनी आपल्याला पहिले, ते देखील तपस्वीच्या वेशात, त्यात माझी वानराची बुद्धी... त्यामुळे मी तुम्हाला ओळखले नाही आणि परिस्थितीनुसार मी तुमची चौकशी केली.. परंतु आपण मनुष्याप्रमाणे कसे विचारात आहात? मी तर तुमच्या लीलेमुळे सगळे विसरून फिरत असतो, त्यामुळेच मी माझे स्वामी, माझे प्रभू असलेल्या तुम्हाला ओळखू शकलो नाही, परंतु तुम्ही तर अंतर्यामी आहात...! असे म्हणून हनुमान अति हर्षाने प्रभूंच्या चरणी लीन झाला. त्याने आपले खरे शरीर प्रकट केले. त्याच्या हृदयात प्रेम दाटून आले. तेव्हा श्रीरामांनी त्याला उभं करून छातीशी कवटाळले आणि आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्याच्यावर सिंचन करून त्याला शांत केले - रामचरित मानस. रामाने हनुमानाला हृदयाशी धरून म्हटले, "हे कपि! ऐक, मनात शंका आणू नकोस. तू मला लक्ष्मणाहूनही अधिक प्रिय आहेस. सर्वजण मला समदर्शी ( प्रिय - अप्रिय यांपासून अलिप्त ) म्हणतात, परंतु मला सेवक प्रिय आहे, कारण मी सोडून त्याला कोणताही दुसरा आधार नसतो.