Android app on Google Play

 

प्रकरण १४

 

टँगमधील वाचलेल्या नऊजणांची लवकरच अमेरिकेला रवानगी करण्यात आली. पर्ल हार्बरमध्ये अ‍ॅडमिरल निमीट्झ आणि वाईस अ‍ॅडमिरल लॉकवूड स्वतः त्यांच्या स्वागताला हजर होते !

कमांडर रिचर्ड ओ'केन आपल्या कुटुंबात परतला. त्याच्या पत्नीने आणि कुटुंबियांनी संपूर्ण युध्दात त्याच्या परतण्याची आशा सोडली नव्हती !

पीट नेरॉवन्स्की आपल्या घरी परतला ! त्याच्या आईवडिलांना आणि चार वर्षांच्या मुलीला त्याला पाहून काय बोलावं तेच सुचेना !

फ्लॉईड कॅव्हर्ली सॅन फ्रान्सिस्कोला परतला. काही दिवसांतच त्याची आपली पत्नी लिऑन आणि मुलीशी गाठ पडली ! घरी परतल्यावर तीन दिवसांनी त्याला त्याच्या इन्शुरन्स कंपनीकडून हजार डॉलर्सचा चेक आला ! कॅव्हर्लीने चेक परत पाठवला आणि लिहीलं,

" आणखीन काही वर्षांनी प्रयत्न करा ! सध्या तरी मी जिवंत आहे !"

बिल लेबॉल्डची पत्नी ग्रेस लॉस अँजलीसमध्ये नोकरी करत होती. बिल परतल्याची बातमी तिला कळल्यावर तिचा प्रथम विश्वासच बसेना ! स्वतः बिलशी फोनवर बोलणं झाल्यावर तिची खात्री पटली ! एक दिवस संध्याकाळी ती कामावरुन घरी परत आली तेव्हा घराच्या पाय-यांवर वाट पाहत असलेला बिल तिला भेटला !

जेम्स डी'सिल्वाच्या पत्नीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्याची दोन्ही मुलं पाणबुडीवर कामाला होती ! जेसी डी'सिल्वा नाहीसा झाल्याची बातमी आल्यावर जेम्सवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. जेसीच्या भावाची - जिमचीही त्यांना सतत काळजी वाटत होती. एका सकाळी जेसी सुखरुप परतल्याची बातमी फोनवर कळल्यावर जेम्सचा प्रथम विश्वास बसेना ! जेसीला प्रत्यक्ष समोर पाहील्यावर त्यांना खात्री पटली !

क्लेटन डेक्करची आपली पत्नी ल्युसी आणि मुलगा हॅरीशी झालेली भेट मात्र तणावपूर्ण होती. क्ले युध्दात मरण पावला या कल्पनेने ल्युसीने पुन्हा लग्नं केलं होतं ! हे ऐकल्यावर डेक्कर विलक्षण निराश झाला. काही दिवसांनी स्वतःला सावरत त्याने मुलाचा ताबा मिळवला आणि त्याने कोलोरॅडो गाठलं. पुढच्या वर्षी डेक्करची अ‍ॅन नावाच्या तरूणीशी गाठ पडली. लवकरच त्यांनी लग्न केलं.

लॅरी सॅव्ह्डकीनच्या पत्नीनेही दुसरा संसार मांडला होता. सॅव्ह्डकीनने तिच्याशी घटस्फोट घेऊन दुसरं लग्नं केलं. नौदलातील नोकरी मात्रं त्याने सोडली नाही.

हँक फ्लॅगननने अमेरिकेत परतल्यावर आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. जपानी कारावासात असताना त्याला सर्वात वाईट वागणूक मिळाली होती. बंडखोर वृत्तीमुळे जपान्यांनी त्याचे सर्वात जास्त हाल केले होते.

हेस ट्रकच्या गर्लफ्रेंडने तो जपानी बंदीवासात असताना लग्नं केलं होतं. परतल्यावर काही महिन्यांनी ट्रक एका अपघातग्रस्त विमानातून पायलटला बाहेर पडण्यास मदत करत असताना त्याच्या वरिष्ठ अधिका-याशी त्याचा वाद झाला. त्याने नौदलातून बाहेर पडून लॉस अँजलीस पोलीस खात्यात नोकरी पत्करली.

२७ मार्च १९४६ रोजी वॉशींग्टनमध्ये एका खास समारंभात अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी टँगवरील नौसेनीकांना शौर्यपदकं बहाल केली.

रिचर्ड ओ'केनला सैनीकाला देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान - मेडल ऑफ ऑनर देण्यात आला.
लॅरी सॅव्ह्डकीनला नेव्ही क्रॉस देण्यात आला. फ्रँक स्प्रिंगरही मरणोत्तर नेव्ही क्रॉसचा मानकरी ठरला.
फ्लॉईड कॅव्हर्ली, जेसी डी'सिल्वा, हेस ट्रक, हँक फ्लॅगनन, पीट नेरॉवन्स्की, क्लेटन डेक्कर आणि बिल लेबॉल्डला सिल्वर स्टार्सनी गौरवण्यात आलं.

टँगमधील मरण पावलेल्या इतर तेरा नौसेनीकांनाही मरणोत्तर शौर्यपदकं जाहीर करण्यात आली. यात मेल एनॉस, जॉन ह्यूबेक, जॉर्ज झॉफ्कीन आणि पॉल लार्सनचा समावेश होता. त्याखेरीज टँगला दुस-यांदा अध्यक्षांचं विशेष पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) बहाल करण्यात आलं !

टँगमधून वाचलेल्यांपैकी हॅंक फ्लॅगनन सर्वप्रथम १९५७ मध्ये मरण पावला. जपानी तुरूंगात झालेला त्याचा अपरिमीत छळ त्याला कारणीभूत होता.

लॉस अँजलीस पोलीसखात्यात नोकरी करणा-या हेस ट्रकचंही युध्दानंतर आयुष्य दु:खातच गेलं. नौदलातून बाहेर पडल्यावर त्याने लग्नं केलं, परंतु आपल्या पाच वर्षांच्या मुलाला गमावण्याची त्याच्यावर पाळी आली. दारुच्या आहारी गेलेल्या ट्रकचा १९८१ मध्ये मृत्यू झाला.

रिचर्ड ओ'केन अ‍ॅडमिरल पदावरुन निवृत्त झाला. निवृत्तीनंतर काही वर्ष त्याने आरामात आपल्या रँचवर घालवली. १९९४ मध्ये न्युमोनियाने त्याचं निधन झालं.

ज्या दिवशी ओ'केन मरण पावला त्याच रात्री पीट नेरॉवन्स्कीने झोपेतच जगाचा निरोप घेतला ! क्ले डेक्कर म्हणतो,

" पीटची ती नेहमीची सवय होती ! कमांडरच्या सावलीसारखा तो त्याच्यापाठी जात असे !"

जेसी डि'सिल्वाला कॅन्सरने गाठलं. १९९८ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

२००० साली रशियन अणुपाणबुडी कर्स्क बेरेंट समुद्रात बुडाली. जगभरातील वार्ताहरांनी टँगमधील वाचलेल्या नौसेनीकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. क्ले डेक्कर म्हणतो,

" त्या पाणबुडीतील लोकांच्या मनात काय येत असेल याची मी कल्पना करू शकतो !"

कर्स्कमधील ११६ नौसेनीकांपैकी एकही वाचला नाही.

क्ले डेक्करचं २००३ मध्ये निधन झालं.

लॅरी सॅव्हडकीन १९७२ साली नौदलातून निवृत्त झाला. मृत्यूपूर्वी काही वर्षे त्याल स्मृतीभ्रंशाचा ( अल्मायझर ) विकार जडला होता. २००७ मध्ये तो मरण पावला.

फ्लॉईड कॅव्हर्ली जपानहून परतल्यावर नौदलातच होता. निवृत्त झाल्यावर कॅव्हर्ली आपल्या कुटुंबासह ओरेगॉन राज्यातील लहानशा गावी राहू लागला. २०११ मध्ये त्याचं निधन झालं.

टँगमधून वाचलेल्या नऊ जणांपैकी बिल लेबॉल्ड हा एकमेव नौसेनीक अद्यापही हयात आहे !

 

 कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन

 

१९४३ च्या डिसेंबरमध्ये मेर आयलंड नेव्हल यार्डमध्ये यूएस्एस् टँग

 

आपल्या दुस-या मोहीमेवरुन परत येताना टँग