Android app on Google Play

 

प्रकरण ८

 

लेबॉल्डला आसपास कोणीही दिसत नव्हतं. काही क्षणांनी त्याला अद्यापही पाण्यावर असलेली पाणबुडीची पुढील बाजू  दिसली, परंतु जोरदार प्रवाहामुळे त्या दिशेला जाणं त्याला अशक्य होतं. आपली दुर्बीण, लाकडी जॅकेट आणि पायातील बूट त्याने वजन कमी करण्याच्या दृष्टीने पाण्यात सोडून दिले. आपल्या पँटला गाठ मारून त्याने त्यात हवा भरण्याचा प्रयत्न करुन पाहीला, परंतु त्यात हवा ठरत नव्हती. निरुपायाने त्याने पँटचा नाद सोडला.

लेबॉल्ड आपल्या पँटशी झगडत असतानाच त्याच्या नजरेला लेफ्टनंट जॉन ह्यूबेक पडला. ह्यूबेक स्वीमींग चँपीयन होता. सफाईदारपणे पाण्यातील प्रवाह पार करुन तो पाणबुडीच्या पाण्यावर असलेल्या भागाच्या दिशेने दिसेनासा झाला.

काही क्षणांतच लेबॉल्डला लाटेचा जबरदस्त तडाखा बसला आणि जोरदार स्फोटांचा आवाज आला !

डेप्थ चार्ज !

जपानी बोट काही अंतरावर डेप्थ चार्जचा मारा करत होती. लेबॉल्डच्या नजरेला ती बोट पडली. काही वेळाने ती दिसेनाशी झाली.

लेबॉल्डपासून काही अंतरावरच कॅव्हर्ली स्वतःला बुडण्यापासून वाचवण्याची पराकाष्ठा करत होता. अचानकपणे त्याच्या समोर एक नौसेनीक प्रगटला. सफाईदारपणे पोहणारा तो नौसेनीक कोण असावा याची कॅव्हर्लीला एका क्षणात कल्पना आली.

" मि.ह्यूबेक ?" कॅव्हर्लीने आवाज दिला.
 " येस !" ह्यूबेक उत्तरला, " तू कोण?"
" फ्लॉईड कॅव्हर्ली सर !"
" जमीन कोणत्या दिशेला आहे ?"
" सरळ खाली ! १८० फूट !"
टँगपासून पश्चिमेला दहा मैलांवर चीनचा किनारा होता याची कॅव्हर्लीला कल्पना होती. पण पाण्यात पडल्यापासून तो इतक्या वेळी वेगवेगळ्या दिशांना पोहत होता, की त्याचा साफ गोंधळ उडाला होता !

" चायना कोणत्या दिशेला आहे ?" ह्यूबेकने प्रश्न केला.
" पश्चिमेला ! दहा मैल !"

ह्यूबेकने पश्चिमेचा मार्ग धरला. पुन्हा तो कोणालाही दिसणार नव्हता !

कॅव्हर्ली पाण्यावर तरंगण्यासाठी धडपड करतच होता. जपानी बोटी येऊन वाचलेल्यांना उचलून घेईपर्यंत अथवा गोळ्या घालेपर्यंत किंवा शार्कने फन्ना उडवेपर्यंत पाण्यात पोहत राहणं इतकंच त्याच्या हाती होतं !

कॅव्हर्लीपासून काही अंतरावर डिक ओ'केनही पाण्याशी झगडत तग धरुन होता !

टँगवर टॉर्पेडो आदळला तेव्हा लॅरी सॅव्ह्डकीन कोनींग टॉवरमध्ये टॉर्पेडो कॉम्प्यूटरसमोर उभा होता. त्याच्याशेजारीच रेडीओमन एडविन बर्गमन सोनारवर येणारे आवाज टिपत होता. टॉर्पेडोच्या आघातानंतर पाणबुडी वर-खाली हलत असल्याचं त्याला जाणवलं.

ओ'केनने पाणबुडी हलवण्यासंबंधी केलेली विचारणा त्याच्या कानावर पडली होती. कोनींग टॉवरमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. पाणबुडी पाठीमागच्या बाजूने बुडत असल्याची सॅव्ह्डकीनला कल्पना आली. बाहेरची हॅच वेळेत बंद न झाल्यामुळे कोनींग टॉवरमध्ये पाण्याचा लोंढा शिरला होता ! आजूबाजूला असलेलं सामान आणि आपले सहकारी पाण्यात बुडत असल्याची भयावह जाणिव त्याला झाली ! त्याने पेरीस्कोपच्या शाफ्टचा आधार घेतला.

सॅव्ह्डकीनने पेरीस्कोपवर चढण्यास सुरवात केली. सुदैवाने पेरीस्कोप पाणबुडीतून बाहेर पडत होता त्या जागी त्याला श्वास घेण्यापुरती हवा मिळाली ! पाणबुडी कोणत्या परिस्थीतीत आहे याची त्याला काहीही कल्पना नव्हती. सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता !

फुफ्फुसात पूर्ण हवा भरुन घेत त्याने पाण्यात शोध घेण्यास सुरवात केली. सुदैवाने तो पूर्वीपेक्षा मोठ्या मोकळ्या जागेत पोहोचला. नेमक्या त्याचवेळेला त्याच्या हाताला कोनींग टॉवरमधून ब्रिजवर जाणारी शिडी लागली ! पाणबुडीच्या दोन्ही आवरणांमध्ये पाणी शिरलेलं नसल्यास त्याला आवश्यक ऑक्सीजन मिळू शकणार होता.

सॅव्ह्डकीनचा अंदाज अचूक ठरला ! मोकळ्या हवेत भरभरुन श्वास घेतानाच त्याच्या कानावर बर्गमनचा आवाज आला. सॅव्ह्डकीनप्रमाणे तो देखील कोनींग टॉवरमधून बाहेर पडला होता !

" कोण आहे ?" बर्गमनने विचारणा केली.
" लॅरी सॅव्हडकीन ! तू कोण ?"
" बर्गमन ! आपण कुठे आहोत याची तुला काही कल्पना आहे ?"
" आपण ब्रिजखालच्या भागात आहोत बहुतेक !"
" पुढे काय करायचं ?"
" मी पाण्यावर चाललो आहे !" सॅव्ह्डकीन उद्गारला.
" मी पण येतो !"
" ठीक आहे ! माझे पाय पकड आणि पाठोपाठ बाहेर पड !"

सॅव्ह्डकीनने दीर्घ श्वास घेतला आणि हातांच्या सहाय्याने पाण्याच्या पृष्ठभागाच्या दिशेने सूर मारला. शेवटच्या क्षणी बर्गमनने त्याचे पाय सोडून दिले होते ! पाणबुडीतच आपण सुरक्षीत राहू असा विचार त्याने केला असावा ! सुटका होण्याची शक्यता असतांना शेवटच्या क्षणी त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला होता !

सॅव्ह्डकीन सुमारे पन्नास फूट पाण्याखाली होता. पाण्याचा प्रचंड दाब त्याला जाणवत होता. वर जाण्याची घाई केल्यास आपली फुफ्फुसं फुटून तात्काळ मृत्यू होईल याची त्याला कल्पना होती. सावकाशपणे तो वरच्या दिशेने निघाला होता. परंतु फार काळ तग धरणं आपल्याला शक्य होणार नाही याची त्याला कल्पना आली. मोकळ्या हवेविना त्याचा जीव गुदमरला होता. ' कोणत्याही क्षणी आपण बुडणार !' त्याच्या मनात आलं. आणखी दहा फारतर पंधरा सेकंद ! त्याला श्वास घेण्यासाठी तोंड उघडावंच लागणार होतं. हे विचार मनात येत असतानाच तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला !

कोणत्याही आधाराविना पन्नास फूट खोलीवरुन समुद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलेला लॅरी सॅव्ह्डकीन हा दुस-या महायुध्दातील पहिला नौसेनीक होता !

सॅव्ह्डकीनने आजूबाजूला नजर टाकली. काही अंतरावरच त्याला पाणबुडीचा नांगर दिसला. याचा अर्थ पुढच्या भागात असलेली बाहेर पडण्याची ' एस्केप ट्रंक ' पाण्याखाली होती ! पाणबुडीत कोणी जीवंत असलंच तर बाहेर पडणं सोपं जाणार नव्हतं !

सॅव्ह्डकीनने पाणबुडीच्या पाण्यावर असलेल्या भागाकडे जाण्यास सुरवात केली. परंतु आपली शक्ती कमी पडत असल्याची त्याला कल्पना आली. नेव्हल अ‍ॅकॅडमीत असताना प्रशिक्षणादरम्यान आपला जीव वाचवण्याच्या देण्यात आलेल्या सूचना तो आठवू लागला. आपली पँट काढून त्यात त्याने हवा भरली आणि कधी पँटच्या सहाय्याने तर कधी पाठीवर तरंगण्यास सुरवात केली.

पाण्याखाली सुमारे १२० फूट पाणबुडीत अडकलेल्या सहका-यांचा विचार त्यांच्या मनात आला. त्यांना बाहेर पडणं शक्य होईल का ? झालंच तर पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत ते जिवंत पोहोचतील का ? आजूबाजूला नजर पोहोचेपर्यंत मिट्ट काळोख होता. कोणाचीही चाहूल लागत नव्हती !

टॉर्पेडो आदळला तेव्हा क्लेटन डेक्कर कोनींग टॉवरखाली असलेल्या टँगच्या कंट्रोल रुममध्ये होता. टॉर्पेडोच्या धक्क्यामुळे तो जेमतेम काही इंचच बाजूला सरकला होता ! परंतु इतरजण मात्रं इतके सुदैवी नव्हते. कोनींग टॉवरच्या हॅचमधून दोघंजण थेट कंट्रोल रुममध्ये कोसळले. त्यांच्यापैकी एकाची मान मोडली होती ! दुस-याच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली होती. बिल बेलींजर खाली आपटला होता. जॉन अ‍ॅकार्डीचा हात मोडला होता ! डेक्करला मात्रं साधं खरचटलंही नव्हतं ! लेफ्टनंट मेल एनॉसच्या कपाळातून रक्ताची धार लागली होती.

कोनींग टॉवरच्या हॅचमधून कंट्रोल रुममध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली होती. कंट्रोल रुमची हॅच बंद करण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते. परंतु एक लाकडी हँडल विचित्ररित्या अडकलेलं होतं त्यामुळे हॅच पूर्णपणे बंद होत नव्हती. त्यामुळे कंट्रोलरुममध्ये पाणी भरण्याचं थांबलं नव्हतं. काही वेळातच कंट्रोलरुमला विद्युतपुरवठा करणा-या जनरेटर्समध्ये पाणी शिरलं आणि सर्व दिवे बंद पडले !

पाणबुडी मागच्या बाजूने पाण्यात जात असल्याची डेक्करला कल्पना आली. काही वेळातच ती पंचेचाळीस अंशाच्या कोनात कलली होती ! मागचा भाग सागरतळावर आपटला होता, परंतु पुढील भाग अद्यापही पाण्यावर होता !

कंट्रोलरुममध्ये पूर्ण पाणी भरण्यापूर्वीच आपल्याला हालचाल करावी लागेल याची डेक्करला कल्पना आली. पाणबुडीच्या मागील भागात असलेले आपले सहकारी आणि जवळचे मित्र प्राणाला मुकले असावेत याची त्याला कोणतीही शंका वाटत नव्हती.

डेक्कर आणि इतरांना सुटकेचा एकच मार्ग होता. पुढील टॉर्पेडो रूममध्ये असलेली एस्केप ट्रंक ! अर्थात तिथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. अर्धा टन वजनाचे दोन मजबूत अभेद्य दरवाजे कंट्रोल रुम आणि टॉर्पेडो रुमच्या दरम्यान होते. तिथपर्यंत पोहोचणं शक्यं झालं तरीही दरवाजे उघडणं ही त्यांच्या ताकदीबाहेरची गोष्ट होती.

डेक्कर वेगाने विचार करत होता. टॉर्पेडो रुममध्ये पोहोचण्याचा एकच मार्ग होता. टँगला तिरक्या अवस्थेतून एका समपातळीत आणणे ! समुद्राच्या पृष्ठभागाशी अथवा सागरतळाशी ! त्यासाठी पाणबुडीच्या पुढील भागात असलेल्या बॅलास्ट टँकमध्ये पाणी भरणं आवश्यक होतं. त्यासाठी हायड्रॉलीक जॅकची आवश्यकता होती. पाणबुडीच्या हायड्रॉलीक सिस्टीममधील प्रत्येक उपकरणाला एक बॅकअप् असतो याची डेक्करला आठवण होती. टँगवर आल्यावर बॅकअप् उपकरणांच्या शेकडो जागा त्याने प्रयत्नपूर्वक ध्यानात ठेवल्या होत्या. हायड्रॉलीक सिस्टीम कार्यन्वीत करणारी एक यंत्रणा चार्ट टेबलच्या वर होती हे त्याला आठवलं !

पाण्यातून तोल सावरत डेक्कर चार्ट टेबलवर चढला. टेबलवर चढून त्याने हायड्रॉलीक सिस्टीमची ती लिव्हर शोधून काढली आणि सर्व ताकद लावून ओढली !

बाहेरच्या झडपा उघडल्या गेल्या ! बॅलास्ट टँकमध्ये समुद्राचं पाणी शिरलं. पाणबुडीचा पुढचा भाग हळूहळू पाण्याखाली जाऊ लागला होता !

समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली १८० फूट खोलीवर अखेर टँग पाण्यात स्थिरावली !

एकोणीस वर्षांचा जेसी डी'सिल्वा कंट्रोल रुमच्या मागे असलेल्या नौसेनीकांच्या खोलीत आराम करत होता. शेवटचा टॉर्पेडो पाणबुडीवर परत येऊन आदळला तेव्हा तो कॉफी घेण्यासाठी मेस मध्ये आला होता !

 ' ओह गॉड ! आपण संपलो !' डी'सिल्वाच्या मनात आलं.

मागच्या बॅटरीच्या हॅचकडे जाणा-या शिडीचा आधार घेऊन तो उभा राहीला. पाणबुडी हादरणं थांबल्यावर त्याने बाजूला नजर टाकली. त्याचे अनेक सहकारी जखमी झालेले होते. मेसच्या मागे असलेल्या इंजीन रुममध्ये पाणी भरण्यास सुरवात झाली होती. मेसमध्ये आणि पुढेच असलेल्या कंट्रोलरुमध्येही पाणी शिरत होतं !

डी'सिल्वा आणि इतर दोघं अर्धा टन वजनाचं दार बंद करण्याचा प्रयत्न करू लागले. पाण्याच्या वाढत्या दाबापुढे त्यांची शक्ती कमी पडत होती. त्याचवेळी पाणबुडी मागच्या बाजूने बुडत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं !

सागराच्या पृष्ठभागावर असलेल्या डिक ओ'केनला पाणबुडीचा पुढचा भाग हळूहळू पाण्याखाली जाताना दिसला !

 ' नक्कीच हा अपघात नाही !' त्याच्या मनात आलं, ' कोणीतरी बॅलास्ट टँक्समध्ये पाणी भरुन पाणबुडी समुद्रतळाशी एका पातळीत आणण्याचा प्रयत्न करतं आहे ! पाणबुडीत कोणीतरी नक्कीच जिवंत आहे !'

ओ'केनने डोळे ताणून समुद्राच्या पृष्ठभागावर नजर टाकली, परंतु कोणाच्याही अस्तित्वाची खूण त्याला दिसत नव्हती. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तो तिथून बाजूला ढकलला गेला.

१८० फूट खाली सागरतळावर विसावलेल्या पाणबुडीत डी'सिल्वा आणि त्याच्या सहका-यांचे ते दार बंद करण्याचे प्रयत्न सुरुच होते. ते दार बंद होणं हा त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता ! सर्व ताकद पणाला लावून अखेर ते दार बंद करण्यात त्यांना यश आलं ! निदान सुटकेचा प्रयत्न करण्यास वेळ मिळणार होता !