प्रकरण ५
दुस-या दिवशी मॉर्टनने तीन बोटींवर हल्ला चढवला होता. तीनपैकी एक बोट सागरतळाला गेली होती. दुस-या बोटीचं बरंच नुकसान झालं होतं. मात्रं तिसरी बोट कोणतीही हालचाल करत नव्हती. त्या बोटीला संपवण्याच्या हेतूने मॉर्टनने त्यावर टॉर्पेडो सोडला होता. त्या बोटीवरील ४९१ हिंदुस्थानी युध्दकैद्यांसह ११२६ माणसांनी पाण्यात उड्या ठोकल्या ! बोटीवरील लाईफबोटींचा त्यांनी आधार घेतला.
हे सर्व जपानी सैनीक असल्याबद्दल मॉर्टन आणि ओ'केनला कोणतीही शंका नव्हती. मॉर्टनने लाईफबोटी उडवण्याचा हुकूम दिला. जपानी सैनीकांपैकी काहींनी पिस्तुलाच्या सहाय्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नं केला. मॉर्टनला तेवढंच कारण पुरलं ! पुढील तासाभरात त्याने सरसकट सर्वांची कत्तल उडवली !
हवाईला परतल्यावर मॉर्टनने केलेल्या या कत्तलीची कहाणी अधिकृतरित्या दाबून टाकण्यात आली ! मॉर्टनला आपल्या कृत्याचा जवाब देण्याची पाळीच आली नाही. १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये जपानी वैमानीकांच्या हल्ल्यात वाहू सागरतळाला गेली ! डिक ओ'केनही वाहूबरोबरच सागरतळाला गेला असता, परंतु त्यापूर्वीच टँगचा कमांडर म्हणून त्याची बदली झाली होती.
जास्तीत जास्त जपान्यांना सागरतळाशी पाठवणं हीच ओ'केनच्या मते मॉर्टनला खरी श्रध्दांजली ठरणार होती !
२२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी उशीरा ओ'केन आपल्या केबीनमध्ये असताना त्याला ड्यूटी चीफचा संदेश आला,
" कॅप्टन, आम्हाला शत्रूच्या जहाजांचा आणखीन एक काफीला दिसला आहे !"
ओ'केनने त्या काफील्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. काफील्यात एकूण सहा जहाजं होती. त्यापैकी दोन त्सुगा आणि हासू या डिस्ट्रॉयर्स होत्या. ओ'केन रात्रीच्या अंधारात हल्ला चढवण्याचा विचार करत होता, परंतु तोपर्यंत ती जहाजं उथळ पाण्यात पोहोचली असती.
मध्यरात्रीच्या सुमाराला दोनपैकी एक डिस्ट्रॉयरने काफीला सोडून समुद्रात गस्त घालण्यास सुरवात केली. ओ'केन सावधपणे त्या बोटीच्या हालचालींवर नजर ठेवून होता. रात्री दीडच्या सुमाराला त्याने टँगला हल्ल्याच्या दृष्टीने योग्य अश्या स्थितीत आणली होती.
पुढच्या बाजूच्या सर्व टॉर्पेडो ट्यूब्सची आवरणं मोकळी करण्यात आली. ओ'केनने पेरीस्कोपमधून बाहेर नजर टाकली. एक मोठा तेलाचा टँकर नेमक्या जागी आला होता !
ओ'केन आणि बिल लेबॉल्ड ब्रिजवर उभे होते.
" कॉन्स्टंट बेअरींग ! मार्क !" ओ'केन
" सेट !" मेल एनॉस उत्तरला.
" फायर !"
ओ'केनने सोडलेले टॉर्पेडोनी अचूक वेध घेतला होता. टँकरची अक्षरशः होळी झाली होती !
ओ'केनचं अद्यापही समाधान झालं नव्हतं, परंतु लेबॉल्डने पाणबुडीला धडक देण्यासाठी वेगाने पुढे येणा-या बोटीकडे त्याचं लक्षं वेधलं. टँकरवर हल्ला करण्याच्या नादात ओ'केनचं त्या बोटीकडे साफ दुर्लक्षं झालं होतं ! ती बोट इतक्या जवळ आली होती की पाण्यात बुडी मारण्यास किंवा टॉर्पेडो झाडण्यासही वेळ नव्हता !
" ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार !"
समोरुन येणा-या १९२० टनी वाकाटके मारु या बोटीला बगल देत टँग डावीकडे वळली. बोटीवरील जपानी सैनीकांनी टँगच्या ब्रिजवर रायफलीतून गोळ्यांचा वर्षाव करण्यास सुरवात केली. अवघ्या काही यार्डांनी टँग त्या बोटीच्या तडाख्यातून सटकली होती !
" क्लीअर द ब्रीज !"
सर्वांनी पाणबुडीत उड्या टाकण्यास सुरवात केली. नेमक्या त्याच वेळेला नियंत्रण सुटून भरकटलेली एक फ्राईटर ओ'केनच्या दृष्टीस पडली ! ती फ्राईटर ठीक वाकाटके मारुच्या दिशेने येत होती !
" थांबा ! पाण्याखाली जाऊ नका ! होल्ड हर अप !" ओ'केनने आज्ञा सोडली.
काही क्षणांतच टँग पुन्हा पूर्णपणे पाण्याच्या पृष्ठभागावर आली.
" सेट अप !"
" रेंज आणि मार्क द्या !" मेल एनॉस
" त्याची गरज नाही !" ओ'केन गरजला, " जस्ट फायर ! तुझा नेम चुकण्याची शक्यताच नाही !"
पाणबुडीच्या मागील भागातील टॉर्पेडो वाकाटके मारूच्या दिशेने झेपावले.
भरकटलेली फ्राईटर वाकाटके मारुवर धडकली होती ! नेमक्या त्याच वेळी एनॉसने सोडलेले टॉर्पेडो वाकाटके मारुवर आदळले होते !
काही क्षण दोन्ही बोटी आग आणि धुराच्या लोळात लुप्त झाल्या. बोटींवरील अनेक वस्तू चारही दिशांना समुद्रात फेकल्या जात होत्या !
पहाटे १.४० च्या सुमाराला ब्रिजवरुन ओ'केनने नुकसानीचा अंदाज घेतला. दोन टॉर्पेडोनी वाकाटके मारुचा अचूक वेध घेतला होता. एक टॉर्पेडो तर पुढच्या बाजूला इंजिनरुममध्येच फुटला होता ! काही मिनीटांतच वाकाटके मारूचे दोन तुकडे झाले ! आणखी मिनीटभरातच ती पाण्याखाली अदृष्य झाली !
अचानक गोळीबाराला सुरवात झाली. काफील्याला एस्कॉर्ट करणा-या दोन बोटींनी एकमेकांवरच गोळागोळीला सुरवात केलेली पाहून ओ'केनची हसता हसता पुरेवाट झाली.
टँग रात्रीच्या अंधारात तिथून गुपचूप सटकली. कमांडर डिक ओ'केनने पुन्हा एकदा जपान्यांना आपला हिसका दाखवला होता !
२४ ऑक्टोबर १९४४ ! टँगच्या रडारवर पुन्हा शत्रूच्या बोटी दिसल्या होत्या ! ओ'केनने खुशीतच टँगला त्या दिशेने वळवलं ! रडारवर आणखीन जहाजांच्या खुणा दिसू लागल्या होत्या ! टँगला आपल्याला हवी ती शिकार निवडण्याचं स्वातंत्र्य होतं !
ओ'केन जवळ सहा-सात टॉर्पेडो शिल्लक होते. हा टँगचा शेवटचा हल्ला ठरण्याची शक्यता होती.
" फ्रॅंक, सकाळ उजाडण्यापूर्वी आपण हल्ला करू शकतो ?" ओ'केनने स्प्रिंगरला प्रश्न केला.
" येस कॅप्टन ! आपण टॉर्पेडो सोडण्यासाठी पोझीशन घेईपर्यंत दोन किंवा सव्वादोन वाजतील. तेव्हा हल्ला केला नाही तर आपण पृष्ठभागावर उघडे पडण्याचा धोका आहे !"
टँग सोईस्कर जागी पोहोचली.
" फायर !"
दोन फ्राईटर आणि एका मोठ्या टँकरच्या दिशेने टॉर्पेडो झेपावले. काही क्षणांतच जोरदार स्फोटांचा आवाज आला !
काही वेळातच एक टँकर आणि एक विमानवाहू नौका ओ'केनच्या नजरेस पडली. ओ'केनने टँगच्या मागील बाजूचे दोन टॉर्पेडो नेम धरुन सोडले.
टँकरची होळी झाली ! टँकरवर या टोकापासून त्या टोकापर्यंत इंधन साठवण्यात आलं होतं ! ते आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं ! टँकरच्या आगीचा इतका झगझगीत प्रकाश पडला होता की टँग भर दिवसा सागराच्या पृष्ठभागावर आल्याइतकी स्पष्टं दिसत होती !
काफील्याला एस्कॉर्ट करणा-या डिस्ट्रॉयर्सना एव्हाना या विध्वंसाला जबाबदार असणा-या पाणबुडीचा पत्ता लागला होता. मशीनगनच्या गोळ्यांचा वर्षाव करत त्यांनी टँगवर हल्ला चढवला. आता पाण्याखाली बुडी मारण्याची वेळ आली होती.
इंजीनांवर पडणा-या अतिरिक्त दाबाचा विचार न करता ओ'केनने २३ नॉटच्या पूर्ण वेगाने पाणबुडी त्या काफील्यापासून दूर नेली. सुमारे दहा हजार यार्डांवर गेल्यावर ओ'केनने आपला वेग कमी केला. अद्यापही पूर्ण न बुडालेल्या त्या विमानवाहू नौकेचा समाचार घेण्यासाठी तो परत फिरला !
ओ'केनजवळ अद्यापही दोन टॉर्पेडो शिल्लक होते. त्यापैकी एकाचाही नेम चुकून तो फुकट घालवणं त्याला मंजूर नव्हतं. पीट नॅरोवन्स्की, हेस ट्रक आणि इतर टॉर्पेडोमननी उरलेल्या दोन्ही टॉर्पेडोंची काळजीपूर्वक तपासणी केली. पुढच्या बाजूला पाच आणि सहा क्रमांकाच्या ट्यूबमध्ये टॉर्पेडो चढवण्यात आले.
आणखीन अर्ध्या तासात ओ'केन शेवटच्या हल्ल्यासाठी सज्ज झाला होता !