प्रकरण ७
टॉर्पेडो आदळताच जबरदस्त स्फोट झाला ! एकूण नौसैनीकांपैकी पाणबुडीच्या मागील भागात असलेल्या अर्ध्या सैनीकांवर एका क्षणात मृत्यूने झडप घातली ! पाणबुडीच्या मध्यापर्यंत असलेल्या कंपार्टमेंट्समध्ये पाणी भरलं होतं !
टँगचं बाहेरचं आवरण त्याकाळातील सर्वोत्कृष्ट असलेल्या एक इंच जाडीच्या निकेल आणि स्टीलचं बनलेलं होतं. परंतु नाकाडात जबरदस्त विध्वंसक स्फोटके ठासून भरलेल्या आणि शत्रूच्या बोटींचा जाड पोलादी तळ भेदण्याच्या दृष्टीने खास बनवण्यात आलेल्या टॉर्पेडोचा मारा सहन करणं सोपं नव्हतं !
एखाद्या भूकंपाचा धक्का बसावा तशी टँग हादरुन गेली. कोनींग टॉवरमध्ये असलेल्या कॅव्हर्लीला पाणबुडीचे दोन तुकडे झाले असावेत अशी शंका आली. त्याचवेळी सर्व दिवे गेले आणि पाणबुडीत गुडूप अंधार पसरला !
" आपलाच टॉर्पेडो ! ओह गॉड !" फ्रँक स्प्रिंगरने आरोळी ठोकली !
पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये पीट नेरॉवन्स्की अचानक बसलेल्या धक्क्याने खाली कोसळला. स्वतःला सावरत तो कसाबसा उभा राहीला. अवघ्या काही क्षणांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सुटी घालवण्याचे विचार त्याच्या मनात येत होते. पाणबुडी वेगाने सागरतळाला चालल्याचं त्याच्या ध्यानात आलं. एकादा जपानी डेप्थ चार्ज तर आपटला नव्हता ? कंपार्टमेंटमधील सामान इतस्ततः फेकलं जाऊ लागलं. कंट्रोल रुममध्ये कोणीतरी बॅलास्ट टँक्समध्ये हवा भरून पाणबुडीला पुन्हा पृष्ठभागावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याला जाणवलं. अर्थात अर्ध्या पाणबुडीत पाणी भरल्याने त्या प्रयत्नाला यश येणार नव्हतंच !
स्वतःला सावरत नेरॉवन्स्कीने आजूबाजूला नजर टाकली. त्याचे सहकारी हेस ट्रक, लेलँड वीकली आणि जॉन फ्लूकर त्याच्या नजरेस पडले. त्यांच्यापैकी कोणालाही कसलीही दुखापत झाली नव्हती. कंपार्टमेंटची विशेष नुकसान झालेलं दिसत नव्हतं !
स्वतःला सावरत नेरॉवन्स्कीने कंपार्टमेंटचा जलाभेद्य ( वॉटरटाईट ) दरवाजा बंद केला. वीकलीच्या डोक्यावर हेडफोन होता. त्याने इतर कंपार्टमेंट्समध्ये संदेश पाठवण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. फ्लूकरने इमर्जन्सी दिवे लावले.
पाणबुडीच्या पुढील भागात असल्याने ते तसे सुदैवीच होते. पाणबुडीतून बाहेर पडण्याच्या एस्केप हॅचपासून ते अवघ्या काही फूट अंतरावर होते ! अर्थात वाचलेले सर्व नौसेनीक तिथे पोहोचेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नव्हता.
' पाणबुडीच्या मागील भागातील सर्वजण टॉर्पेडोच्या आघाताला बळी पडले असावे किंवा एव्हाना बुडाले तरी असावे !' नेरॉवन्स्कीच्या मनात आलं.
टँगच्या ब्रिजवर असलेल्या बिल लेबॉल्डच्या नजरेसमोर काळ्या धुराचा एक स्तंभ उसळला ! वास्तवीक टॉर्पेडो आदळल्यामुळे एखाद्या कारंज्याप्रमाणे पाणी उसळलं होतं.
' पाणबुडीचे दोन तुकडे होणार ' लेबॉल्डच्या मनात आलं.
डिक ओ'केन हादरुन आपल्याच टॉर्पेडोचे प्रताप पाहत होता. पाणबुडीच्या मागच्या भागात असलेले बॅलास्ट टॅंक्स तुटून हवेत उडाले होते ! पाणबुडीच्या मधल्या मुख्य डेकवर असलेल्या पाच इंची तोफेभोवती आणि मागील भागात असलेल्या सिगारेट डेकवर बसवलेल्या चाळीस मी.मी.च्या तोफेभोवती पाणी साचण्यास सुरवात झाली होती !
" आपल्याला पाणबुडी जागेवरुन हलवता येईल का ?"
ओ'केनने ब्रिजवरील फोनमध्ये प्रश्न केला, परंतु त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही ! ओ'केनने पुन्हा तोच प्रश्न केला पण व्यर्थ !
कोनींग टॉवरमध्ये असलेल्या कॅव्हर्लीला ओ'केनचा आवाज ऐकू येत होता, परंतु कॅव्हर्लीचं उत्तर ओ'केनपर्यंत पोहोचत नव्हतं. टॉर्पेडो आदळल्यानंतरच्या स्फोटामुळे ब्रिजवरील फोनचा रिसीव्हर कामातून गेला होता. अर्थात याची कॅव्हर्ली आणि ओ'केन दोघांनाही कल्पना नव्हती.
" रडार !" ओ'केन गरजला, " सर्वात जवळची जपानी डिस्ट्रॉयर कुठे आहे ? कोणत्या दिशेने जात आहे ?"
" रडारची पूर्ण वाट लागली आहे !" कॅव्हर्ली उद्गारला, " नो बेअरींग, नो रेंज !"
" रडार !" ओ'केन पुन्हा ओरडला, " मला ताबडतोब ही माहीती द्या !"
कॅव्हर्लीने टँगची शेवटची पोझीशन सांगीतली, परंतु ओ'केनला अर्थातच ते ऐकू येत नव्हतं.
" रडार ! आय् रिपीट ! रडार !" ओ'केन
फ्रँक स्प्रिंगरने कॅव्हर्लीची कंबर पकडली आणि त्याला सरळ वरच्या हॅचमधून बाहेर ढकलण्यास सुरवात केली. ओ'केनला संदेश मिळत नसल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं.
" वर जा आणि कॅप्टनशी बोल !" कॅव्हर्लीला हॅचमधून वर ढकलत स्प्रिंगर उद्गारला.
कॅव्हर्लीने ब्रिजच्या दिशेने जाणारी शिडी गाठली. नेमका त्याचवेळी त्याला एक टेहळ्या दिसून आला. रेडीओमन चार्ल्स अॅन्डीलो ! डेकवरील एका रेलींगला घट्ट पकडून तो कसाबसा उभा होता. त्याच्या चेह-यावर प्रेतकळा पसरली होती. कॅव्हर्लीला पाहताच त्याने एक धक्कादायक बातमी सांगीतली,
" मला खूप भीती वाटते आहे ! मला पोहता येत नाही !"
कॅव्हर्ली ब्रिजवर पोहोचला. बिल लेबॉल्ड कॅव्हर्लीला पाहून चकीत झाला. कॅव्हर्लीने सर्व परिस्थीती थोडक्यात ओ'केनच्या कानावर घातली.
एव्हाना ब्रिजच्या दिशेने पाणी येण्यास सुरवात झाली होती.
" हॅच !" ओ'केन ओरडला, " हॅच बंद करा !"
पण त्याला उशीर झाला होता ! उघड्या हॅचमधून धो धो पाणी कोनींग टॉवरमध्ये शिरत होतं ! टँग बुडणार होती हे स्पष्ट दिसत होतं !
लेबॉल्डला अद्यापही डेकच्या रेलींगला चिकटून असलेला अॅन्डीलो दिसला. टँगच्या चार टेहळ्यांपैकी एक ! काही क्षणांत तो पाण्यात दिसेनासा झाला ! कोणालाही पुन्हा न दिसण्यासाठीच !
आपला जीव वाचवणं हे आता सर्वात महत्वाचं होतं !
' खड्ड्यात गेले ते जपानी आणि त्यांच्या बोटी !' कॅव्हर्लीच्या मनात आलं.
कॅव्हर्लीने पाणबुडीचा लाकडी डेक गाठला. अचानक पाणबुडी डाव्या हाताला कलली, परंतु सुदैवाने काही क्षणांतच पुन्हा सरळ झाली. डेकवर साचत असलेलं पाणी काहीसं ओसरलं होतं.
' कदाचीत सर्व काही ठीक होईल !'
परंतु काही वेळातच पाणबुडीची मागची बाजू पाण्याखाली नाहीशी होऊ लागली. कॅव्हर्लीने ब्रिजच्या रेलींगचा आधार घेतला. आपल्या मांड्यांपर्यंत पाणी येताच त्याने पोहण्यास सुरवात केली. काहीही झालं तरी पाण्यात बुडणा-या पाणबुडीखाली सापडायचं नाही हा निश्चय त्याने केला होता.
कॅव्हर्लीने पोहताना सहज मागे नजर टाकली. सरावादरम्यान बुडी मारावी तशी टँग मागच्या बाजूने हळूहळू पाण्यात अदृष्यं होत होती. मात्रं काही क्षणांनी ती बुडणं अचानक थांबलं होतं. तिच्या पुढचा सुमारे सहा फूट भाग अद्यापही पाण्याबाहेर होता !
टँग बुडाली त्या परिसरातील पाण्याची खोली सुमारे १८० फूट होती. पाठचा भाग सागरतळाशी पोहोचल्यावरही ३१५ फूट लांबीची पाणबुडी तिरक्या अवस्थेतील बाटलीप्रमाणे पाण्यात बुडाली होती. अर्थात पाणबुडीच्या पुढील भागात अजूनही पाण्यावर राहण्याइतकी हवा शिल्लक होती.
नशीबाने टँग अटलांटीक महासागरात बुडालेली नव्हती. अटलांटीकच्या बर्फासारख्या गार पाण्यात कॅव्हर्ली जेमतेम काही मिनीटेच तग धरू शकला असता ! अर्थात चीनच्या पूर्वेला असलेल्या पॅसीफीकमधील पाण्याचं तापमान अटलांटीक इतकं थंडगार नसलं तरी अगदी गरमही नव्हतं !
कॅव्हर्ली टँगपासून जरा दूर पोहोचला. पाणबुडीतील कोणी अद्याप जीवंत होतं का याची त्याला काहीच कल्पना नव्हती. आकाशात नजर टाकताच त्याला चांदण्या चमकत असलेल्या दिसल्या. पहाटेचे अडीच वाजून गेले असावे. ओ'केनने टॉर्पेडो झाडण्याचा हुकूम देण्यापूर्वी कॅव्हर्लीने घड्याळात वेळ पाहीली होती.
' मी इंटरनॅशनल डेट लाईनच्या नक्की कोणत्या बाजूला आहे ?' त्या परिस्थीतीतही त्याच्या मनात आलं, ' जपानच्या बाजूला असलो तर २५ ऑक्टोबर ! माझ्या लग्नाचा वाढदिवस ! पुन्हा मी बायको आणि दोन वर्षांच्या मुलाला पाहू शकेन का ?'
कॅव्हर्लीपासून काही अंतरावरच पॅसीफीकच्या पाण्यात टँगचा कमांडर डिक ओ'केनही पोहत होता ! अर्थात दोघांनाही एकमेकांच्या अस्तीत्वाची कल्पना नव्हती. पाण्याखाली टँगमध्ये असलेल्या आपल्या सहका-यांचा विचार मनात येताच ओ'केनला वाईट वाटलं. दुर्दैवाने त्यांच्या मदतीसाठी तो काही करु शकत नव्हता !
पाणबुडी ४५ अंशाच्या कोनात कलली होती. पुढच्या टॉर्पेडो ट्यूब पाण्याखाली होत्या. अर्थात त्यातून सुटका होण्याची शक्यता नव्हती. आपल्या सहका-यांचा विचार मनात येताच ओ'केनने पाणबुडीच्या दिशेने पोहण्यास सुरवात केली !
ब्रिजवर असलेला बिल लेबॉल्ड पाणबुडीबरोबरच खाली गेला होता. त्याने कशाचाही आधार घेतला नव्हता. खिळल्यासारखा तो आपल्या जागी उभा होता. काही फूट बुडाल्यावर आपण कोणत्या परिस्थीतीत सापडलो आहोत याची त्याला जाणिव झाली ! सर्व शक्ती एकवटून हात-पाय मारत तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला !
लेबॉल्डला जवळच चीफ क्वार्टरमास्टर सिडने जोन्स आणि गनर डॅरील रेक्टरच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याचवेळी आपण पाण्याखालील तीव्र ओढीच्या प्रवाहात ( करंट ) मध्ये सापडल्याची त्याला जाणिव झाली. जीव खाउन पोहत तो प्रवाहातून बाजूला झाला.
" आपण सर्व एकत्रं राहू !" जोन्स आणि रेक्टरला आवाज देत तो ओरडला.
जोन्स आणि रेक्टरचा आवाज कमी कमी होत जात ऐकू येईनासा झाला ! दोघांपैकी कोणाचं नखही पुन्हा दृष्टीस पडलं नाही.