Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ६

आतापर्यंतच्या बावीस टॉर्पेडोंनी अचूक कामगीरी बजावली होती. हे दोन टॉर्पेडो सोडल्यावर ओ'केन पर्ल हार्बरला परतण्यास मोकळा होता.

सहा नॉटच्या वेगाने टँग पुढे सरकत होती. समोरच भर समुद्रात अडकून पडलेली ती विमानवाहू नौका दिसत होती. एकही एस्कॉर्ट दृष्टीपथात नव्हती.

कोनींग टॉवरमध्ये फ्लॉईड कॅव्हर्लीने आपल्या रडारकडे नजर टाकली.

" रेंज पंधराशे यार्ड !"
टँग हळूहळू पुढे सरकत होती. लक्ष्यापासून नऊशे यार्डांवर आल्यावर ओ'केनने हल्ल्याची तयारी केली. कदाचीत हा त्याचा शेवटचा टॉर्पेडो हल्ला ठरणार होता. या मोहीमेवरून परतल्यावर सबमरीन स्कूलमध्ये प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती होण्याची शक्यता होती.

" स्टँड बाय बिलो !" ओ'केन.
" रेडी बिलो, कॅप्टन !" स्प्रिंगर उत्तरला.
" फायर !"

पाणबुडीला एक लहानसा धक्का जाणवला. हिस्स् SS असा आवाज होऊन टॉर्पेडो पाणबुडीपासून मोकळा झाला आणि आपल्या लक्ष्याकडे झेपावला.

ब्रिजवर लेबॉल्ड आणि ओ'केन दुर्बीणीच्या सहाय्याने सुटलेल्या टॉर्पेडोचं निरीक्षण करत होतो. टॉर्पेडो सरसरत विमानवाहू नौकेच्या दिशेने निघाला होता.

" रनिंग हॉट, स्ट्रेट अ‍ॅन्ड नॉर्मल !" लेबॉल्ड उद्गारला.

आता एकच टॉर्पेडो उरला होता. तो सोडल्यावर टँग परत फिरण्यास मोकळी होती. आतापर्यंतच्या सर्व मोहीमांत टँगची ही मोहीम सर्वात विध्वंसक ठरणार होती.

२५ ऑक्टोबर १९४४, पहाटेचे २.३० वाजले होते.

" सेट !" ओ'केनने आज्ञा दिली.

कोनींग टॉवरमध्ये लॅरी सॅव्ह्डकीनने टॉर्पेडोच्या कॉम्प्युटरला आवश्यक फायरींग अँगल आणि इतर माहीती पुरवली.

" फायर !" ओ'केनचा आवाज घुमला.

फ्रँक स्पिंजरने टॉर्पेडो सोडण्याचा खटका दाबला. शेवटचा टॉर्पेडो हिस्स् SS आवाज करत पाणबुडीतून बाहेर पडला.

पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये पीट नेरॉवन्स्की टॉर्पेडोवर नजर ठेवून होता.

" हॉट डॉग ! कोर्स झीरो नाईन झीरो ! गोल्डन गेटच्या दिशेने !" तो उद्गारला
" आपण परत जाण्यास मोकळे !" कोणीतरी त्याला उत्तर दिलं.

एव्हाना तेवीसावा टॉर्पेडो अचूकपणे आपल्या लक्ष्यावर आदळला होता ! ६९५७ टनांच्या एबारु मारूच्या चिंधड्या उडाल्या !

डिक ओ'केनच्या अठरा महिन्यांतील पाचव्या मोहीमेतील हा तेहतीसावा बळी होता !

टँगच्या ब्रिजवर बिल लेबॉल्ड आणि ओ'केन शेजारी उभे होते. अचानकपणे त्यांना एक अनपेक्षीत दृष्य दिसलं.

टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडो आपल्या नियोजीत मार्गापासून पार भरकटला होता ! काही क्षण गोलगोल फिरुन तो डाव्या बाजूला वळला....

" शेवटचा टॉर्पेडो भरकटला आहे !" ओ'केन उद्गारला.

ओ'केनचं वाक्यं पुर्ण होण्यापूर्वीच तो टोर्पेडो भर वेगात वळला आणि थेट टँगच्या दिशेने येऊ लागला !

भस्मासुराप्रमाणे परत फिरलेला टॉर्पेडो काय रंग दाखवणार होता ?

टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता !

काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं !

" इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !"

इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला ! पाणबुडी टॉर्पेडोच्या मार्गातून दूर होण्यावर सर्वांचे प्राण अवलंबून होते.

ब्रिजवर उभे असलेले ओ'केन आणि लेबॉल्ड खिळल्यासारखे उलटलेल्या टॉर्पेडोकडे पाहत होते. नेम धरुन सोडल्यासारखा तो थेट पाणबुडीच्या दिशेने येत होता. टँग सहा नॉट वेगाने वळत होती. टॉर्पेडोचा वेग पाणबुडीच्या वेगाच्या चौपट होता !

पाणबुडीच्या डाव्या बाजूने येणारा टॉर्पेडो पाहून बिल लेबॉल्डच्या मनात आलं,

 ' कदाचित तो दुस-या दिशेला वळेल.. पुन्हा भरकटण्यास सुरवात होईल.. शेवटच्या क्षणी पाणबुडी त्याच्या मार्गातून दूर होईल !'

कोनींग टॉवरमध्ये फ्लॉईड कॅव्हर्ली टँगच्या दिशेने येणा-या टॉर्पेडोवर नजर ठेवून होता.

 ' टँग टॉर्पेडोच्या मार्गातून दूर जाऊ शकेल का ? पाणबुडीला फक्त काही मीटर सरकण्यापुरता वेग पकड्णं आवश्यक आहे ! एखाद्या स्पीडबोटप्रमाणे झटकन बाजूला झालं की सुटका !' कॅव्हर्लीच्या मनात आलं.

अर्थात टँग काही स्पीडबोट नव्हती. बाजूला होणं किंवा वेगाने निसटणं तिला शक्यं नव्हतं !

 ... आणि टॉर्पेडो टँगवर येऊन धडकला !

पाणबुडीच्या मागील बाजूला नॅव्हीगेशन रुम आणि टॉर्पेडो रुमच्या मध्ये तो टॉर्पेडो आदळला होता !