Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ९

डी'सिल्वा आणि त्याचे सहकारी सुरक्षीत होते खरे, परंतु ते एस्केप ट्रंकपासून अद्यापही दूरच होते ! त्याशिवाय त्यांच्या पायाखाली असलेल्या डेकखालीच पाणबुडीच्या एकशेवीस बॅटरी होत्या. एकाही बॅटरीत पाणी जाण्याचा अवकाश, बॅटरीतून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली असती ! क्लोरीनच्या तडाख्यात ते सापडले तर फुफ्फुसं फाटून घुसमटून तडफडत येणारा मृत्यू ठरलेला होता ! डी'सिल्वासह सुमारे वीस नौसेनीक त्या जिवंत बॉम्बवर उभे होते !

पहिल्या महायुध्दात १९१५ साली यू-५७ या जर्मन पाणबुडीतील नौसेनीका क्लोरीनच्या भयानक अनुभवातून बचावलेले होते. एका पाणसुरूंगाला धडकल्यामुळे पाणबुडीत पाणी भरलं होतं. सगळ्या पाणबुडीत क्लोरीन वायू पसरला होता. नौसेनीकांचे कानाचे पडदे क्लोरीन वायूच्या दाबामुळे फाटू लागले ! फुफ्फुसांत क्लोरीनच्या वाफा गेल्यावर श्वास घेणं जवळपास अशक्यं झालं. वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर दोघांनी सरळ कानाला रिव्हॉल्वर लावून चाप ओढला ! सुदैवाने चार नौसेनीकांना ऑक्सीजनचे मास्क मिळाले आणि ही हकीकत सांगण्यासाठी ते जिवंत राहीले होते !

" आपल्याला कंट्रोल रुमचा दरवाजा उघडावा लागेल ! पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे ! इथे राहीलो तर क्लोरीन आपला जीव घेईल हे निश्चीत !" डी'सिल्वा उद्गारला.

दरम्यान पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये दहाजण जमा झालेले होते. टँगमधून बाहेर पडण्याचे दोनच मार्ग होते. एस्केप ट्रंक किंवा टॉर्पेडोच्या ट्यूब !

टॉर्पेडो ट्यूबमधून निसटणं कठीण असलं तरी अशक्यं नव्हतं. १९२१ मध्ये एका सरावादरम्यान झालेल्या अपघातात एस-४८ या पाणबुडीतील ४१ नौसेनीकांपैकी एकूण एक माणूस टॉर्पेडो ट्यूबमधून बाहेर पडला होता !

त्याचवेळी जपानी बोटींनी सोडलेल्या डेप्थ चार्जेसचा आवाज येऊ लागला. त्यापाठोपाठ काही वेळातच टँगचा पुढचा भाग पाण्याखाली जात असल्याचंही त्यांना जाणवलं. क्ले डेक्करच्या इमर्जन्सी हायड्रॉलीक सिस्टीमचा तो प्रताप होता याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती. पाण्याखाली पाणबुडी स्थिरावताच टॉर्पेडो ट्यूबमधून बाहेर पडणं हवेत विरुन गेलं.

आता सुटकेचा एकच मार्ग होता ! एस्केप ट्रंक !

जेसी डी'सिल्वा आणि इतरांनी कंट्रोल रुमचं दार उघडण्याची तयारी केली. कंट्रोल रुममध्ये पाणी भरलेलं दिसत असलं तरीही तिथे मोकळी हवा आहे हे त्यांच्या ध्यानात आलं होतं. अर्थात मधलं दार उघडताच पाणी वेगाने त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसणार होतं, परंतु हा धोका पत्करणं आवश्यक होतं !

कंट्रोल रुमचं दार उघडताच पाण्याचा लोंढा त्या कंपार्टमेंटमध्ये शिरला, परंतु लवकरच पाणी एका पातळीत स्थिरावलं. डी'सिल्वा आणि सुमारे डझनभर नौसेनीक कंट्रोल रुममध्ये शिरले.

कंट्रोल रुममध्ये अद्यापही कोनींग टॉवरच्या हॅचमधून पाणी झिरपत होतं ! जेसी डी'सिल्वाचं लक्षं मेल एनॉसकडे गेलं. एनॉसच्या कपाळातून अद्यापही रक्त ठिबकत होतं, परंतु तो पूर्ण सावध होता. डी'सिल्वा आणि त्याच्याबरोबरचे लोक दिसताच तो म्हणाला,

" पाणबुडीतील कागदपत्रं जपान्यांच्या हाती पडण्यापूर्वी नष्ट करणं आवश्यक आहे !"

एनॉसने सर्वांना कागदपत्रं, अत्यंत गोपनीय असे अल्ट्रा संदेश टेबलावरच्या कच-याच्या बास्केटमध्ये एकत्र करण्याची सूचना केली. पाणबुडीच्या दोन्ही तिजो-यांतील झाडून सारी कागदपत्रं जमा झाल्यावर त्याने त्यांना काडी लावली ! पाण्याखाली १८० फूट पाणबुडीत आधीच ऑक्सीजन कमी असताना हे खरंतर आत्मघातकी होतं, परंतु एनॉसला त्याची पर्वा नव्हती !

पॉल लार्सनच्या नेतृत्वाखाली इतरांनी जखमी नौसेनीकांना पुढच्या भागात नेण्यास सुरवात केली होती.

" आपल्याला पुढच्या टॉर्पेडो रुममध्ये जावं लागेल ! तिथूनच एस्केप ट्रंक गाठता येईल !" डी'सिल्वा म्हणाला.

कंट्रोल रुममधून अधिका-यांच्या आराम करण्याच्या कंपार्टमेंटमध्ये प्रवेश करतानाच जेसी डी'सिल्वाला हवेने पूर्ण भरलेला प्रेशर टँक दिसला ! किमान दोन तास पुरेल इतकी हवा मिळणार होती !.

शुध्द हवेचा कण न कण त्यांच्या दृष्टीने आवश्यक होता. डिझेलचा धूर आणि प्रत्येक श्वासाबरोबर बाहेर टाकला जाणारा कार्बन डाय ऑक्साईड यामुळे हवा दुषीत होत चालली होती. त्यातच १८० फूट खोलीवर हवेवर असलेल्या दाबामुळेतर कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण वाढतच जाणार होतं. शुद्ध हवेअभावी स्वतःच्या उच्छ्वासातून बाहेर टाकलेला कार्बन डाय ऑ़क्साईड अखेर घातक ठरणार होता ! त्यापूर्वी पाणबुडीतून सुटका करून घेणं अत्यावश्यक होतं !

पुढे सरकत असलेल्या डी'सिल्वाला खोली दर्शवणा-या यंत्रात पाणबुडी १८० फूट खोलीवर असल्याची जाणीव झाली. सुटका अगदीच अशक्यं नव्हती. पाणबुडी शेकडो फूट खोल पाण्यात अडकल्यास घुसमटून मृत्यू अथवा गोळी झाडून घेऊन आत्महत्या करणं एवढंच शिल्लक राहीलं असतं !

क्लेटन डेक्कर आणि बिल बॅलींजरही पुढील टॉर्पेडो रूमच्या दिशेने निघालेले होते. अधिका-यांच्या मेसमध्ये येताच अद्यापही कागदपत्रं जाळत असलेला एनॉस त्यांच्या नजरेस पडला !

" स्टॉप इट एनॉस !" डेक्कर तीक्ष्ण सुरात उद्गारला, " आग विझव ! ताबडतोब ! आपल्याला आहे तेवढा सगळा ऑक्सीजन आवश्यक आहे !"

एनॉसने आग विझवली. डेक्कर आणि बॅलींजरने उरलेली सर्व कागदपत्रं एकत्रं केली आणि बॅटरी कंपार्टमेंटमधील बॅटरीच्या अ‍ॅसीडमध्ये टाकून दिली !

पहाटे २.४५ वाजेलेले होते. पाणबुडीवर टॉर्पेडो आदळल्याला पंधरा मिनीटं झाली होती !

सुमारे वीसेक जण पुढच्या टॉर्पेडो रुमच्या बंद दारापाशी पोहोचले होते. मेल एनॉस, क्लेटन डेक्कर, बिल बॅलींजर, पॉल लार्सन, हँक फ्लॅगनन, जेसी डि'सील्वा यांचा त्यात समावेश होता.

त्यांच्यापुढे आता नवीन समस्या उभी राहीली होती.

पुढील टॉर्पेडो रुम आणि ते उभे असलेल्या कंपार्टमेंटमधील हवेच्या दाबात निश्चीतच फरक असणार होता ! दोन्ही कंपार्टमेंटमधील हवेचा दाब साधारण सारखा होण्यापूर्वी दार उघडलं गेल्यास हवेचा झोतामुळे ते फेकले जाणार होते ! भरीस भर म्हणून दोन्ही कंपार्टमेंटमधील इंटरकॉम बंद पडला होता !

दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेल्यांचा आता खाणाखुणांनी संवाद सुरू झाला ! परंतु दोन्ही बाजूच्या लोकांना दारापलीकडील आपले सहकारी काय सांगत आहेत हे कळत नव्हतं. त्यातच दरवाजावर धडका मारणं म्हणजे सोनारला कान लावून बसलेल्या जपानी डिस्ट्रॉयर्सना टँगची नेमकी जागा दाखवण्यासारखं होतं !

टॉर्पेडो रुममध्ये असलेल्या हेस ट्रकला हवेच्या दाबातील फरकातील बदल ध्यानात आला होता. जेसी डी'सिल्वाला हळूहळू दार उघडण्यासाठी तो खुणेने बजावत होता. मात्रं याचा नेमका उलटा परिणाम झाला ! डि'सील्वाच्या सहका-यांची ट्रक आणि इतरजण आपल्याला आत येण्यापासून परावृत्त करत असल्याची समजूत झाली ! आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांनी दार ढकलण्यासा प्रारंभ केला !

अखेर जी गोष्ट टाळण्याचा ट्रकचा प्रयत्न होता तेच नेमकं झालं होतं !

तुफान वेगात आलेला हवेचा झोत हॉवर्ड वॉकरच्या अंगावर आदळला ! किरकोळ शरिरयष्टीच्या वॉकरच्या तोंडावर कंपार्टमेंटचं दार आपटलं ! वॉकरच्या नाकाचा घोळणा फुटला आणि रक्ताची धार लागली !

सर्वजण पुढच्या टॉर्पेडो रूममध्ये पोहोचले होते.
सुमारे चाळीसेक माणसांची तिथे दाटी झाली होती !
तापमान शंभर फॅरनहीटवर गेलं होतं. सेकंदागणिक मोकळ्या हवेच्या अभावाने ते वाढणार होतं !
श्वास घेणं पूर्वीइतकंच कठीण झालं होतं !

क्लेटन डेक्करचा जवळचा मित्र जॉर्ज झॉफ्कीन टॉर्पेडो रुममध्ये पोहोचलेला पाहून डेक्कर चकीत झाला होता. डेक्करने त्याच्याच ताब्यात पाणबुडीचा कंट्रोल दिला होता. डेक्करच्या हिशोबाने तो मागच्या इंजिनरुम मध्ये असायला हवा होता !

शेवटचा टॉर्पेडो झाडल्यावर कॉफी घेण्यासाठी म्हणून झॉफ्कीन पुढच्या भागातील मेसमध्ये आला होता. टॉर्पेडो आदळताच त्याने मेसमध्ये येणारं दार बंद करून घेतलं होतं !

डेक्कर आणि झॉफ्कीन जवळचे मित्र होते. दोघं पाणबुडीवर असताना त्यांची बायकामुलं एकत्र राहत होती. आपल्या कुटुंबियांसंबंधी नेहमी त्यांची चर्चा चालत असे.

जपानी बोटींनी डेप्थ चार्जेस टाकण्यास सुरवात केली. पाणबुडीत सर्वजण हादरले. पण काही वेळाने डेप्थ चार्जेसचा मारा बंद झाला !

टॉर्पेडो रुममध्ये लेलँड वीकलीने शिडीवरुन वर असलेली हॅच गाठली होती. हॅच उघडून त्याने एस्केप ट्रंकमध्ये नजर टाकली. खाली असलेल्यांपैकी ब-याच जणांनी कंपार्टमेंटमध्ये सुरक्षीत ठेवलेलं ' मॉमसेन लंग्ज ' हे सुटकेसाठीचं खास उपकरण बाहेर काढलं. पाणबुडीवर अशी अनेक मॉमसेन लंग्ज साठवण्यात आलेली होती.

अमेरिकन नौदलातील अधिकारी चार्ल्स मॉमसेन याच्या संशोधनातून मॉमसेन लंग्जचा शोध लागला होता. खोल पाण्यात बुडालेल्या बोटीतून सुरक्षीतरित्या पाण्याच्या पृष्ठभागावर येईपर्यंत नौसेनीकांना ऑक्सीजन पुरवण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आलेली होती. उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड मॉमसेन लंगच्या पिशवीत असलेल्या सोडालाईम ( चुनकळी ) मधून खेळवला जात असे. सोडालाईम कार्बन शोषून त्यातून ऑक्सीजन सुटा करत असे. हा ऑक्सीजन पुन्हा नळीद्वारे श्वसनासाठी उपलब्ध होत असे. दोन नळ्यांना एकमेकापासून वेगळं करणारी एक झडप याला जोडलेली होती.

टॉर्पेडो रुममध्ये सर्वांनी मॉमसेन लंग्ज मोकळी करून त्याच्या नळ्या आपल्या चेह-यावर बसवण्यास सुरवात केली. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी याचं प्रात्यक्षीक केलं होतं, परंतु कसोटीच्या या क्षणी मात्रं अनेकांना ते नुसतं योग्य बसवणंही जमत नव्हतं !

पाणबुड्यांच्या इतिहासात आतापर्यंत एकही माणूस बाहेरील मदतीविना सुरक्षीतपणे बाहेर पडू शकलेला नव्हता !

मॉमसेन लंग्जचा यशस्वी आणि योग्य वापर केल्यासच त्यांना बाहेर पडण्याची आशा होती !

टँगमधील नौसेनीकांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं होतं ?

टँगची पुढची टॉर्पेडो रूम अर्धवर्तुळाकार होती. नौसेनीक मॉमसेन लंग्ज चढवत असतानाच पॉल लार्सन आपल्या जखमी सहका-यांवर उपचार करण्यात मग्न होता. सुदैवाने टॉर्पेडो रुममध्ये त्याला जास्तीचं मेडीकल किट सापडलं होतं.

पाणबुडीतील हवा झपाट्याने दुषीत होत होती. दृष्यमानताही काही फूट अंतरापर्यंतच उरली होती. बॅट-यांमध्ये हळूहळू पाणी झिरपू लागलं होतं. इमर्जन्सी दिवेही मध्येच बंद पडू लागले होते.

लेफ्टनंट मेल एनॉसच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकली. कंट्रोल रूममध्ये पाणबुडीच्या तोफेकडे जाणारी हॅच उघडता आली तर बाहेर पडणं शक्यं होतं. एनॉसच्या या योजनेत सहभागी होण्यास टॉर्पेडो रूममधील सहा नौसेनीक तयार झाले.

एनॉसने कंट्रोल रुममध्ये जाणारं दार उघडलं मात्रं...

 .. तुफान जोराने रबर जळल्याचा वास येणारा काळा धूर टॉर्पेडो रूममध्ये घुसला !

पाणबुडीच्या मागील भागात कुठेतरी नक्कीच आग लागली होती. घाईघाईतच एनॉसने दार बंद केलं, पण तोपर्यंत धुराने टॉर्पेडो रुम भरुन गेली होती ! आत आलेल्या धुराने आधीच दुषीत वातावरणात आणखीनच भर घातली होती. नौसेनीकांपैकी काही जणांना धूर असह्य झाल्याने त्यांनी जोरदार उलट्या केल्या होत्या ! काहींनी धुरामुळे गुदमरणं टाळाण्यासाठी मॉमसेन लंग्जच्या सहाय्याने श्वास घेण्यास सुरवात केली. मधलं दार उघडण्याचा निर्णय अधिकच घातकी ठरला होता.