Get it on Google Play
Download on the App Store

शेवटी ब्रम्हास्त्राचा प्रयोग


अठराव्या दिवशी कौरवांचे केवळ ३ योद्धे उरले होते - अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा. याच दिवशी अश्वत्थामाने पांडवांच्या वधाची शपथ घेतली. परंतु त्याच्या लक्षात येईना की त्यांना कसे मारावे. एकदा रात्री एक घुबड कावळ्यांवर हल्ला करून सगळ्या कावळ्यांना मारून टाकते, अशी घटना बघून अश्वत्थामाच्या मनात देखील तसाच विचार आला. तो गडद रात्री कृपाचार्य आणि कृतवर्माच्या मदतीने पांडवांच्या शिबिरात गेला. आणि पांडव समजून तिथे झोपलेल्या अवस्थेतील ५ पांडव पुत्रांचे मस्तक छाटले. या घटनेमुळे धृष्टद्युम्न जागा झाला, तर अश्वत्थामाने त्याचा देखील वध केला.
अश्वत्थामाच्या या कुकर्माची सर्वांनी निंदा केली. आपल्या पुत्रांची हत्या झाल्यामुळे द्रौपदी विलाप करू लागली. तिचे दुःख पाहून अर्जुनाने शपथ घेतली की त्या नीच, खुनी ब्राम्हण पुत्र अश्वत्थामाचे मस्तक छाटून टाकेन. अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून अश्वत्थामा तिथून पळून गेला, तेव्हा श्रीकृष्णाला आपला सारथी बनवून आणि आपले गांडीव धनुष्य घेउन अर्जुन त्याचा पाठलाग करू लागला. अश्वत्थामाला कुठेही संरक्षण मिळाले नाही तेव्हा भीतीपोटी त्याने अर्जुनावर ब्रम्हास्त्राचा प्रयोग केला.
त्यामुळे नाईलाजाने अर्जुनालाही ब्रम्हास्त्र चालवावे लागले. ऋषींनी प्रार्थना केल्यामुळे अर्जुनाने आपले ब्रम्हास्त्र तर मागे घेतले, परंतु अश्वत्थामाने आपले ब्रम्हास्त्र अभिमन्यूची विधवा पत्नी उत्तरा हिच्या गर्भाच्या दिशेने वळवले. कृष्णाने आपल्या शक्तीने उत्तराचा गर्भ वाचवला. शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की, धर्मात्मा, झोपलेला, बेसावध, वेडा, नशेत असलेल्या, अज्ञानी, रथहीन, स्त्री आणि बालक यांना मारणे धर्मानुसार वर्ज्य आहे. याने धर्माच्या विरुद्ध आचरण केले आहे, झोपेत असलेल्या निरपराध बालकांची हत्या केली आहे. जिवंत राहिला तर पुन्हा पापच करेल. तेव्हा त्वरित याचा वध कर आणि त्याचे छाटलेले मस्तक द्रौपदीच्या समोर ठेऊन आपली प्रतिज्ञा पूर्ण कर.



श्रीकृष्णाचे हे बोल ऐकूनही अर्जुनाला आपल्या गुरुपुत्राची दया आली आणि त्याने अश्वत्थामाला जिवंत आपल्या शिबिरात नेऊन द्रौपदीसमोर उभे केले. एखाद्या पशु प्रमाणे बांधून आणलेल्या गुरुपुत्राला पाहून द्रौपदी अर्जुनाला म्हणाली, की हा गुरुपुत्र आणि ब्राम्हण आहे. ब्राम्हण हा नेहमीच पूजनीय असतो. आणि त्याची हत्या करणे हे पाप आहे. तुम्ही यांच्या वडिलांकडून अपूर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले आहे. पुत्राच्या रुपात आचार्य द्रोणच आपल्या समोर बंदी म्हणून उभे आहेत. याचा वध केल्यास याची माता कृपी माझ्याप्रमाणेच पुत्राच्या वियोगाने दुःख करेल. पुत्रावर विशेष माया असल्यामुळेच ती द्रोणाचार्य यांच्या बरोबर सती गेली नाही. कृपीचा आत्मा कायम मला दोष देईल. याचा वध केल्याने माझे पुत्र काही परत येणार नाहीत, तेव्हा आपण याला सोडून द्यावे.
द्रौपदीचे हे धर्मयुक्त बोलणे ऐकून सर्वांनी तिची प्रशंसा केली. यावर कृष्ण म्हणाला, "अर्जुना, शास्त्रांच्या अनुसार पतित ब्राम्हणाची हत्या देखील पापच आहे आणि गुन्हेगाराला दंड न करणे हे देखील पाप आहे. तेव्हा तू तेच कर जे योग्य आहे.
त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून अर्जुनाने आपल्या तलवारीने अश्वत्थामाच्या डोक्यावरील केस कापले आणि त्याच्या मास्ताकावारील मणी काढून घेतला. मणी काढून घेतल्यामुळे तो श्रीहीन बनला. नंतर श्रीकृष्णाने अश्वत्थामाला ६००० वर्ष भटकत राहण्याचा शाप दिला. शेवटी अर्जुनाने त्याला तशाच अपमानित अवस्थेत शिबिरातून बाहेर काढले.