राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा
-
दशरथाचे वय होत चालले होते, तरीही त्याचा वंश सांभाळण्यासाठी त्याचा कोणीही पुत्रारूपी वंशज नव्हता. त्याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा एक मंत्री सुमंत याने त्याला सल्ला दिला की त्याने हा यज्ञ आपला जावई ऋष्यशृंग किंवा बोली भाषेत म्हणायचे झाल्यास शृंगि ऋषि यांच्याकडून करून घ्यावा. दशरथाचे कुलगुरू ब्रह्मर्षि वसिष्ठ हे होते. ते त्याचे धर्मगुरू देखील होते आणि धार्मिक मंत्री देखील. त्याच्या सर्व धार्मिक अनुष्ठानाचे कार्य करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच होता. त्यामुळे वासिष्ठांची आज्ञा घेऊन मग दशरथाने शृंगि ऋषि यांना यज्ञ करण्यासाठी आमंत्रित केले.
शृंगि ऋषिनि यज्ञ यथासांग पूर्ण केले. पुत्राकामेष्ठी यज्ञ सुरु असताना अग्निकुंडातून एक अलौकिक यज्ञ पुरुष प्रकट झाला आणि दशरथाला सुवर्णपात्रात नैवेद्याचा प्रसाद देऊन सांगितले की हा प्रसाद आपल्या पत्नींना खायला घालून तुला पुत्र प्राप्ती होईल. दशरथ या गोष्टीने अति प्रसन्न झाला आणि त्याने त्या प्रसादाचा अर्धा भाग आपली पट्ट राणी कौसल्येला खायला दिला. उरलेल्या अर्ध्या भागातला अर्धा भाग (पाव) दशरथाने आपली दुसरी राणी सुमित्रेला दिला. आणि उरलेल्या पाव भागातला अर्धा हिस्सा म्हणजेच एक अष्टमांश भाग कैकयीला दिला. काही विचार करून त्याने उरलेला एक अष्टमांश भाग पुन्हा सुमित्रेला खायला दिला. सुमित्रेने आपला आधीचा हिस्सा देखील खाल्ला नव्हता. जोपर्यंत राजा दशरथ कैकयीला तिचा हिस्सा देत नाहीत तोपर्यंत तिने आपला हिस्सा खाल्ला नव्हता. जेव्हा कैकयीने आपला हिस्सा खाल्ला, त्यानंतरच सुमित्रेने आपला हिस्सा खाल्ला. त्यामुळेच राम (कौसल्येपासून), भरत (कैकयी पासून) आणि लक्ष्मण व शत्रुघ्न (सुमित्रे पासून) यांचा जन्म झाला.