Get it on Google Play
Download on the App Store

भाग २७

"डॉ. अभिजीत, हे काय आहे?" संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष डॉ. अभिजीतला विचारतात.

"विश्वास ठेवा सर, मला देखील या सेनेबाबत काहीही कल्पना नव्हती." डॉ. अभिजीत म्हणतो.

"आता आपल्याला आपल्या पूर्वजांविरुद्ध लढावं लागेल?" जॉर्डन मध्येच बोलतो.

"वेळ आली तर ते सुद्धा करु, जो अग्निपुत्राच्या बाजूने आहे, तो मानवतेच्या विरुद्ध आहे." जॉन पुढे म्हणतो, "आपल्या युद्धप्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आपला उद्देश त्या सैन्याला पराजित करने नसून अग्निपुत्राला संपवून टाकने हा आहे. ठरल्याप्रमाने फक्त आफ्रिका आणि आशियाई देश युद्धात भाग घेतील, इराक, अफगानिस्तान येथील अमेरिकी सैन्य देखील युद्धात पूर्ण सहभाग घेईल. प्रत्येक देशात सैन्यदलापासून पोलिसांपर्यंत सर्वांनी सतर्क रहा. अग्निपुत्राचा छुपा हल्ला कुठेही होऊ शकतो..." जॉन सतत सुचना देत होता आणि दुसरीकडे दोन तास संपायला आले होते.

आफ्रिकेच्या मोठ्या परिसरात अग्निपुत्राचे सैन्य उभे होते, आणि त्यांच्यासमोर होते ते अल्पसंख्या असलेले आफ्रिकन, नायजेरियन, ब्राझिलीयन सैन्य, ज्यांची संख्या शत्रुपक्षपेक्षाही खुपच कमी होती. समोर असलेले तुलनेने दुबळे मनुष्य पाहून अग्निसूर्य विद्रूपपणे हसू लागतो.

"हाहाहा... हा... हा... हीच का तुमची दुबळी सेना? जी आमच्यासारख्या सर्वोत्कृष्ट योद्वांसोबत लढणार आहे?" अग्निसूर्य म्हणतो. त्याचं ते विद्रूप हास्य पाहून समोर उभे असलेले सैन्य पेटून उठते.

"अरे हिंस्त्र प्राण्या, तुझ्या शरीराला ना आकार ना उकार, आणि तू पृथ्वीवर राज्य करण्याची भाषा करतोस? १० जन्म घेतलेस तरी तुला ते शक्य नाही. लक्षात ठेव, तुझा सामना मनुष्य प्राण्याशी होत आहे. म्हणून सांगतो, जिंकण्याच स्वप्न रंगवु नकोस." आफ्रिकेचे सैन्यदल अधिकारी म्हणतात. त्यांचे शब्द ऐकून अग्निसूर्याच्या मस्तकाची शीर सनकते. आतापर्यंत त्याला इतक्या वाईट शब्दांत कोणीही सुनावले नव्हते.

"अपमान, घोर अपमान केला आहेस तू माझा, आता त्याचे परिणाम भोग..." असं म्हणत तो आपल्या सैन्याला हल्ला करण्याचा इशारा देतो. सर्व वाघ मोठ्याने डराकाळ्या फोडत मनुष्य सैन्याच्या दिशेने धावतात. त्यांच्या पाठीमागून अर्धसर्पानुष्य, आदिमानव सेना आणि महाकाय डायनोसोर वेगाने मनुष्याच्या दिशेने धावत जातात.

"तिन मिसाइल्स सोडा." आणि तिन मिसाइल्स बरोबर वाघांच्या पाठीमागे जाऊन विस्फोट करतात, ज्यात अनेक वाघ आणि बरीच सेना मृत्युमुखी पडते. पुढच सैन्य मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या मागून येणारे आणखी चवताळतात आणि आणखी वेगाने मनुष्याच्या दिशेने चाल करतात. "आपापली बंदूक तयार ठेवा. शत्रु ७०० मीटर अंतरावर आल्यावर गोळीबार सुरु करा." आफ्रिकेचे सैन्यदल अधिकारी म्हणतात.

अर्धसर्पानुष्य सेना अत्यंत वेगाने पुढे येत होती. सर्व वृत्तवाहिन्यांवरुन या युद्धाचे थेट प्रक्षेपण होत होते. मनुष्यप्राण्याचे पारडे जड होते.

"गोळीबार सुरु करा..." आफ्रिकन सैन्यदल अधिकारी मोठ्याने ओरडताच सर्व सैनिकांनी गोळीबार सुरु केला. अर्धसर्पानुष्य धडाधड मरून खाली पडत होते. काही क्षणातच सर्व अर्धसर्पानुष्य मृत्युमुखी पडले. अग्निसूर्य गप्प होता आणि अग्निपुत्र कुठेही दिसत नव्हता. कुणाचीही मदत न घेता शत्रु सैन्याचा फडशा पाडल्याने रणभूमीवर उभं सैन्य आणि वृत्तवाहिन्यांवरून युध्द पाहत असलेले सर्व जल्लोष करु लागतात. सर्वांचा धीर वाढला होता, आणि शत्रु कमकुवत असल्याने सगळे निश्चिंत झाले.

इतक्यात अर्धसर्पानुष्य सैन्याने समुद्रमार्गे सर्व देशांवर हल्ला सुरु केला. युद्धाचा प्रसंग सर्वांना माहित झाल्याने अतिसंहारक शस्त्रे न वापरता अर्धसर्पानुष्यांवर हल्ला सुरु झाला. जास्तीत जास्त २० मिनिटांत सर्व देशांच्या किनाऱ्यांवरून अर्धसर्पानुष्यांचा फडशा  पडला. आता संपूर्ण जग फक्त अग्निपुत्र समोर येण्याची वाट पाहत होतं.

"डॉ. अभिजीत, हे तुम्हाला चमत्कारिक नाही वाटत का? म्हणजे दिड तासातच युध्द संपलं?" जॉन अभिजीतला विचारतो.

"मला सुद्धा यामागे काहीतरी गडबड वाटत आहे. हा त्यांचा एक डाव आहे असंच काहीतरी वाटतंय. हा राक्षस इतक्या सहज हरू शकत नाही. मनुष्याला संपवून संपूर्ण जगावर राज्य मिळविण्यासाठी तो अशी कमकुवत सेना नाही निवडणार." डॉ. अभिजीत म्हणतो.

"काही महिन्यांपूर्वी त्याने एकट्याने ३ लाखांच्या आसपास सैन्य एकट्यानेच संपवले होते. त्यामुळे त्याला आपण कमकुवत वाटले असू." जॉर्डन मध्येच बोलतो.

"इतक्यात कोणत्याही निष्कर्षाला जाने योग्य नाही." डॉ.अभिजीत म्हणतो.

"अग्निपुत्राने पुढील चाल चालण्याआधीच आपण काहीतरी योजना बनवायला हवी." अभिजीत म्हणतो.

"योजना?" जॉन आणि जॉर्डन एकत्रच बोलतात.

"हो, योजना. तुम्ही दोघांनी एक गोष्ट नोटीस केली आहे का? आपण तेच करतोय जे अग्निपुत्र आपल्याला करायला भाग पडतोय. आपण आपल्या पद्धतीने काही करतच नाहीये. जे करतोय ते फक्त अग्निपुत्राच्या मनासारखंच..." अभिजीत म्हणतो.

"हो, माझं या गोष्टीकडे लक्षच नव्हतं गेलं." जॉर्डन म्हणतो.

"बघा, माझ्याकडे एक योजना आहे..." असं म्हणत अभिजीत त्या दोघांना योजना सांगू लागतो. डायरेक्ट मल्टीपल कॉल कनेक्ट कॅमेराद्वारे तो अमेरिकी सेना अधिकारी, भारतीय सेना अधिकारी, डॉ.मार्को, डॉ.एरिक, अँजेलिना आणि लिसा या सर्वांना त्या योजनेमध्ये सामील करतो. "...आणि हे फक्त आपल्यामध्येच राहिलं पाहिजे. योजनेमध्ये कोणताही बदल होणार नाही."

"यात जॉन, जॉर्डन आणि तुझ्या जीवाला धोका आहे." अँजेलिना म्हणते.

"सगळं व्यवस्थित पार पडलं तर काही होणार नाही, मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. थोडी जोखीम घ्यावी लागेलच." अभिजीत म्हणतो. डायरेक्ट मल्टीपल कॉल कनेक्ट कॅमेरा बंद होऊन सगळे योजनेच्या तयारीला लागतात.

जगभर जल्लोष चालू असतो, अगदी युध्द झालं त्या ठिकाणी सुद्धा. एवढ्यात एका सैनिकाला मृतांमध्ये काही हालचाल होताना दिसते. त्यांच्या जवळच पडलेलं अर्धसर्पानुष्याचं बोट हलत होतं, नंतर त्याच्या बाजूला असलेलं मस्तक हलू लागतं. हळूहळू सगळे मृत हलू लागतात. अगदी अगदी त्यांचे तुकडे झालेले भागसुद्धा हलू लागले.

"सर, इथे मृतांमध्ये हालचाल होत आहे." आफ्रिकेतुन जॉर्डनला रिपोर्ट येतो. १०-१५ सेकंदांच्या अंतराने वेगवेगळ्या देशांमधुन रिपोर्ट यायला सुरुवात होते.

अभिजीत आणि जॉन काही प्रतिक्रिया देतील तेच समोर स्क्रीनवर बातमी दिसू लागते, "अर्धसर्पानुष्याचे जितके तुकडे झाले त्याच्या चौपट अर्धसर्पानुष्य नव्याने तयार झाले. जगभरात अंदाजे १२,००,००० अर्धसर्पानुष्य असल्याचे आकडे आमच्याकडे होते, आता त्यांची संख्या ५०,००,००० वर गेली आहे. त्यांना मारलं तर चार नविन तयार होत आहेत." आणि स्क्रीन आपोआप बंद पडते. त्यांच्या इमारतीचा वीजपुरवठा खंडीत होतो.

"डॉ. अभिजीत... जॉन... जॉर्डन... ताबडतोब इमारतीच्या वरच्या मजल्यावर चला... अग्निपुत्राच्या सैन्याने इमारतीमध्ये प्रवेश केला आहे..." अमेरिकी सेनाध्यक्ष ओरडत आतमध्ये येतात. त्यांच्यासोबत बरेच सैन्य असते. अभिजीत आपली तलवार कशीबशी सोबत घेतो. जॉन आणि जॉर्डनसह सगळे वरच्या मजल्यावर धावत जातात. सुदैवाने त्यांच्यासाठी एयर फोर्सचे हेलीकॉप्टर उभे असते. सगळे त्यात चढतात. हेलीकॉप्टर सुरु होताच संपूर्ण इमारत कोसळते. हवेत ते हेलोकॉप्टर मात्र तरंगत राहतं. जमिनीवरुन ते सैन्य मोठ्याने ओरडू लागतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन हेलीकॉप्टर मॅनहॅटनच्या दिशेने रवाना होतं.

(क्रमशः)