भाग २४
सहा महिने निघून जातात, पण अग्निपुत्राची कोणतीही हालचाल समोर येत नाही. अनेक माध्यमं अग्निपुत्र मृत्यू पावल्याचं सांगत होते तर, तज्ज्ञ मंडळी तो पुन्हा येणार असं भाकित करत होते. डॉ.अभिजीतला आणि त्याच्या तलवारीला सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत गोपनीय ठिकाणी ठेवण्यात येतं. अंटाक्टिका खंडामध्ये अनेक ठिकाणी सॅटेलाईटद्वारे शोधून देखील अग्निपुत्र न सापडल्याने आता धोका टळला असल्याचं सर्वांकडून बोललं जातं आणि याच निमित्ताने अमेरिकेतील मॅनहॅटन शहारामध्ये अमेरिकी लष्करातर्फे छोटासा समारंभ आयोजित करण्यात येतो, ज्यामध्ये अनेक देशांचे प्रतिनिधी, लष्कर अधिकारी, नामवंत व्यक्तीमत्व, सिनेकलाकार, उद्योगपती आणि अग्निपुत्राविरोधात असलेल्या मोहिमेतील सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतं, ज्यामध्ये जॉर्डन, डॉ.मार्को, डॉ.एरिक, अॅंजेलिना, लिसा, जॉन यांचा समावेश असतो.
"आज आपण त्या सर्वांचं स्मरण करणार आहोत ज्यांना अग्निपुत्राविरोधात असलेल्या लढाईमध्ये वीरमरण प्राप्त झाले आहेत. या लढ्यामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या प्रत्येकाच्या प्राणाचं मोल अमुल्य आहे. कुणाचंही बलिदान वाया गेलं नाही. जगावर संकट आल्यावर सर्व देशांनी आपापसांतील वैर विसरून एकत्र येऊन लढा दिल्याने अग्निपुत्र नावाच्या दानवाला कळून चुकलं असेल की त्याचा सामना तोडीस तोड असलेल्या मानवप्राण्याशी झाला आहे. "अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे शब्द ऐकताच संपुर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होतो.
"मी आपणा सर्वांसमोर डॉ.अभिजीत, जॉर्डन, जॉन, डॉ.मार्को, डॉ.एरिक, अॅंजेलिना आणि लिसा यांना आमंत्रित करू इच्छितो." सर्व मान्यवर उभे राहतात आणि सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो.
डॉ.अभिजीतची टीम रेड कार्पेटवरून तिथे चालत येते, त्या सर्वांच्या पुढे असतो डॉ.अभिजीत आणि त्याच्या हातामध्ये ती दैव्यशक्ती असलेली तलवार असते.
"अग्निपुत्राला पळवून लावण्यामध्ये आपले योगदान मोलाचे आहे. कृपया आपला अनुभव इथे व्यक्त करावा." अमेरिकेचे राष्ट्रपती डॉ.अभिजीतला मंचावर बोलावतात. तलवार हातातच ठेवत डॉ.अभिजीत भाषणाला सुरूवात करतो.
"सर्वप्रथम मी आपणा सर्वांची माफी मागतो. माफी यासाठी की संशोधन करत असताना, नाविन्याचा शोध घेत असताना आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्ही जगाला संकटामध्ये लोटत आहोत. या मोहिमेमध्ये आम्ही उत्कृष्ट सहकारी गमवले आहेत, ज्यांची पोकळी न भरून येण्यासारखी आहे. यावरून कल्पकता आणि नाविण्याचा शोध घेत असताना कोणत्या थरावर किंमत मोजवी लागते याचा प्रत्यक्ष अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे..." एवढं बोलून अभिजीत थोडा गप्प होतो. अमेरिकेचे राष्ट्रपती त्याच्या जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवतात.
"हा शोधाचा एक भाग होता. वैज्ञानिक आणि संशोधक यांचे संपूर्ण मानवजातीवर खुप मोठे योगदान आहे. शोध घेत असताना समस्या उद्भवली, पण हात न झटकता तुम्हीं त्यावर तोडगा काढला. आणि हेच तुम्हा सर्वांचे मोठे यश आहे." अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणाले.
दरम्यान अनेक देश आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी डॉ. अभिजीत आणि त्याच्या टीमवर कडाडून टीका केली होती. त्या टिककराणां गप्प करण्यासाठी राष्ट्रपतींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राष्ट्रपतींच्या बोलण्याला उपस्थित सर्वजन सहमती दर्शवतात. या सर्वांमुळे डॉ. अभिजीत आणि त्याच्या टीमला काही प्रमाणात समाधान वाटते. पुढील कार्यक्रम सुरळीत पार पडतो.
कार्यक्रम संपल्यानंतर, जॉर्डन आणि डॉ. अभिजीत मोकळ्या ठिकाणी बंदोबस्तात एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारतात. दोघे मित्र खुप दिवसानंतर एकमेकांना भेटले होते. खरं तर जॉर्डनला वेगळच काहीतरी विचारायच असतं, पण विषय कसा सुरु करु, असं त्याला वाटत होतं. न राहवुन शेवटी तो विचारतोच.
"तुला काय वाटतं, अग्निपुत्र खरंच मेला असेल?" जॉर्डन आपली शंका उपस्थित करतो.
"खरं सांगायच तर अजुन देखील मला रात्रीची झोप येत नाही. असं वाटतं तो कुठेतरी लपून बसला आहे आणि खुप मोठं कारस्थान रचतो आहे. इतकं मोठं की, आपण त्याच्यापुढे हतबल होऊ." डॉ. अभिजीत म्हणतो.
"मग? तू सैन्यदलाशी याबाबत बोललास की नाही?" जॉर्डन विचारतो.
"आमचं दररोज बोलन होतं. अंटार्टिका मध्ये जीपीएस लावून सुद्धा त्याचा शोध घेता येत नाहिये. अशा वेळी वाटतं तो मेला असावा, पण मन हे मानत नाही. मनातल्या मनात असं वाटतं की तो जिवंत आहे, आणि लवकरच परत येणार आहे." डॉ. अभिजीत म्हणतो.
"हम्म... तुला काय वाटतं, तुझ्याकडे ती तलवार आहे म्हणून तर तो लपून बसला नसेल!" जॉर्डन विचारतो.
"होय, माझा देखील हाच तर्क आहे. तलवार आपल्याकडे आहे म्हणूनच तो बाहेर येत नाहिये." डॉ. अभिजीत म्हणतो.
"याचा अर्थ आपल्याला ती तलवार कडेकोट सुरक्षेतच ठेवावी लागेल. आणि ती तुझ्याकडेच जास्त सुरक्षित आहे." जॉर्डन म्हणतो.
"तसं बघायला गेलं तर तुझं बोलणं मला पूर्णपणे पटतंय. बघू पुढे काय घडतय." डॉ. अभिजीत म्हणतो.
मनातील शंकेच पूर्ण समाधान न करत ते दोघेही तिथून निघतात. जॉर्डन त्याच्या गाडीमध्ये बसल्यानंतर डॉ. अभिजीत तलवार आपल्या सोबत घेत बंदोबस्तात तिथून निघू लागतो. तो गाडीमध्ये बसल्यावर गाडी सुरु होणार तोच, समोर असलेला उंचच्या उंच विजेचा खांब रस्त्यावर पडतो. सर्व सुरक्षारक्षकांच लक्ष तिथे जातं. त्या खांबच्या जवळून कोणीतरी धावत जाताना त्यांना दिसतं. बंदोबस्तात असलेले काही शिपाई त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागतात. अमेरिकेतील सर्व सुरक्षा यंत्रणांना सूचित करण्यात येतं. त्या ठिकाणी सगळीकडे सीसीटीव्ही कैमेरे असल्याने ती व्यक्ती जास्त दूर जाऊ शकत नव्हती. पोलिस त्या संपूर्ण भागाला घेराव घालतात. ती व्यक्ती एका बंद दुकानाचं दार तोडते आणि आत जाऊन लपते. पोलिस त्या दुकानाभोवताल जमा होतात. डॉ. अभिजीत, जॉर्डन आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील तिथे पोहोचतात, सुरक्षा रक्षक त्या सर्वांना तिथून जरा दूर उभं राहावयास सांगतात.. बाहेरून पोलिस त्या व्यक्तीला आत्मसमर्पण करण्यास सांगतात. मात्र आतमधून कोणतीही हालचाल होत नाही.
१५-२० पोलिस आत जाण्यासाठी थोडं पुढे सरसावतात तोच त्या दुकानामध्ये भलमोट्ठा स्फोट होतो.
(क्रमशः)