भाग १२
ज्वालामुखीचा तो उद्रेक इतका मोठा होता कि, उपग्रहावरून देखील ते दृश्य स्पष्ट दिसत होते. सी.एन.एन., बी.बी.सी. सारख्या वाहिन्यांपासून ते जगातील प्रत्येक स्थानिक वृत्तवाहिन्यांवर त्या घटनेचे विश्लेषण केले जात होते. हा एक अपघात असावा असा सर्वांचा समाज होता. कारण त्या ज्वालामुखीच्या कुंडातून बाहेर आलेला अग्निपुत्र तो कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. जॉर्डन आणि डॉ.अभिजीत सह सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येते. तिथे असलेले लष्कर अधिकारी त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारतात.
"आता जे काही झालं, त्यामागे तुम्ही आहात का?" लष्कर अधिकारी विचारतात. जॉर्डन होकारार्थी मान हलवतो.
"तुम्ही जगाला कोणत्या संकटात लोटत आहात? तुमच्या एका चुकीमुळे आज संपूर्ण जगाला भूकंपाचा धक्का बसला आहे." अधिकारी चिडून म्हणतात.
"वेट... वेट... वेट... तुम्ही म्हणजे काय? आणि आम्ही जगाला कोणत्या संकटामध्ये लोटलं आहे? आम्हाला याची जरादेखील कल्पना नव्हती." जॉर्डन देखील चिडून म्हणतो.
"पण असं काम करायचंच का, ज्याची शिक्षा जगाला भोगावी लागेल? फुजीयामा हा इथला खूप मोठा आणि सर्वात पवित्र ज्वालामुखी पर्वत आहे. तिथे तुम्ही संशोधन करायला जाल असं मला वाटलं होतं. तिथे जाऊन तुम्ही जगाला मृत्युच्या जबड्यात नेत असाल तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल." अधिकारी म्हणतात.
"एक्स्क्यूज मी सर, तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे आम्ही संशोधक आहोत. बर्फाळ प्रदेशात, वाळवंटात, घनदाट जंगलात तहान-भूक विसरून आम्ही संशोधन करतो. आम्ही संशोधन करतो म्हणून जगाला अनेक गोष्टींची माहिती मिळते. कधी कधी अजाणतेपणाने आमच्याकडूनही चुका होतात, पण बऱ्याच वेळा आम्हाला स्वतःचा जीव देऊन त्याची किंमत मोजावी लागते." डॉ.अभिजीत बोलू लागतो.
"तुमच्या बोलण्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण जर जगावर संकट येत असेल तर ते थांबवणं हे आमचं काम आहे. आणि जरी तुम्ही ते काम अजाणतेपणाने करत असाल, तुम्हाला थांबवणं हे आमचं काम आहे." अधिकारी म्हणतो.
"मग आता आम्ही काय करायला हवं?" जॉर्डन म्हणतो.
"आपण जे काही करत असाल ते तत्काळ थांबवा. त्याने तुम्हाला आणि संपूर्ण जगाला धोका आहे. तुम्हाला हा देश सोडून जावं लागेल." अधिकारी म्हणतो. ही गोष्ट लगेचच मुख्य लष्कर अधिकाऱ्याकडे जाते. ते जॉर्डनला यासंबंधी जाब विचारतात. आपल्याला पुढे जाता येणार नाही हे जॉर्डनला कळून चुकले आणि त्याने मुख्य लष्कर अधिकाऱ्यांना सर्व हकीकत सांगितली. भारत आणि चीन यांच्यादरम्यान रेल्वे प्रस्तावित रेल्वेचे काम सुरु असताना रेल्वे अधिकाऱ्यांना मानवी सांगाडा सापडतो आणि ते त्याचा तपास घेण्याची जबाबदारी जॉर्डनवर सोपवतात. जॉर्डन आणि त्याच्या सहकाऱ्यांना शोध घेत असताना तिथे भलीमोठी मानवी कवटी सापडते जी काही वेळाने अदृश्य होते आणि त्या ठिकाणी डॉ.अभिजीतला एक आकृती सापडते जी त्यांना जपानला जाण्याचे संकेत देते. ही गोष्ट घडत असताना त्या ठिकाणी भूकंप होतो आणि त्याचे सहकारी रुग्णालयात दाखल होतात. पुढे मोहीम पूर्ण करण्यासाठी जॉर्जियामधून लिसा त्यांच्या मदतीला येते. अनेक तर्कवितर्कांनंतर जपानला येण्याचं नक्की होतं. ब्रुसच्या मदतीने इथल्या ज्वालामुखी पर्वतांची माहिती मिळते आणि अनेक गोष्टी पूर्णत्वास जातात. शेवटी फुजीयामा पर्वतावर दुर्घटना घडते.
"आपल्या कार्याची मी खरंच स्तुती करतो. पण कृपया हि कार्यवाही इथेच थांबवा. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या यासाठी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत ज्यांमुळे मनुष्य प्राण्याचा नाश होण्याची शक्यता आहे. भूकंपामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. सेवा जशी सुरळीत होईल तसे तुम्ही हा देश सोडून निघून जावे अशी मी आपणांस विनंती करतो." मुख्य लष्कर अधिकारी म्हणतात.
जॉर्डन समोर दुसरा पर्याय नसतो. डॉ.अभिजीतकडे बघत तो होकारार्थी मान हलवतो. डॉ.अभिजीत आपल्या सहकाऱ्यांना फोन करून मोहीम थांबवायला सांगतो.
जॉर्डनची संपूर्ण टीम निराश होऊन तिथून निघते. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन हॉटेलमध्ये न जाता थेट विमानतळाच्या दिशेने जातात. ब्रूस त्यांना भेटायला तिथे आलेला असतो. जॉर्डनला पाहिल्यावर ब्रुसचे डोळे पाणावतात.
"तुझ्यासोबत बऱ्याच वर्षांनंतर काम करून खूप बरं वाटलं." ब्रुसच्या खांद्यावर हात ठेवत जॉर्डन म्हणतो.
"कशाला थट्टा करतोस? खरंच मी तुझ्या काही उपयोगी आलो नाही. मला माफ कर." ब्रूस म्हणतो.
"असं नको म्हणूस. आम्हाला जे जे काही हवं होतं ते ते तू आम्हाला वेळेअगोदर देत होतास. तू तुझ्या परीने आम्हाला पूर्ण मदत केलीस." जॉर्डन त्याचं सांत्वन करतो. जॉर्डन पाठोपाठ लिसा, अँजेलिना, डॉ.अभिजीत, डॉ.मार्को, डॉ.एरिक आणि इम्रान ब्रूसची भेट घेतात.
"तुमच्याबरोबर काम करून खरंच खूप बरं वाटलं. भविष्यात तुमच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल." डॉ.अभिजीत ब्रूसला म्हणतो.
"सर, तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या." अँजेलिना म्हणते.
"एकदा जॉर्जियाला नक्की या. तिथे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप काही आहे." लिसा म्हणते.
"हो, नक्की येईन. मग आता तुम्ही सगळे नक्की कुठे चालला आहात?" ब्रूस सर्वांना विचारतो.
"मी आणि डॉ.अभिजीत लीसाबरोबर जॉर्जियाला जात आहोत. अँजेलिना इम्रान बरोबर भारतात त्यांच्या कॉलेजला जातील आणि डॉ.मार्को हे डॉ.एरिकच्या कॅनडा येथील रिसर्च सेंटरमध्ये जातील." जॉर्डन म्हणतो. काही वेळाने विमानसेवा सुरळीत होते. जॉर्डन, डॉ.अभिजीत, डॉ.मार्को, डॉ.एरिक आणि लिसा अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसतात. विमान प्रक्षेपण करणार इतक्यात डॉ.अभिजीतचा फोन वाजतो. एयर होस्टेस त्याला मोबाईल बंद करायला सांगते. पण ब्रुसने फोन केला असल्याने नक्कीच काही महत्वाचं काम असेल अशी त्याची खात्री होते. एयर होस्टेसला विनंती करून तो फोन उचलतो.
"हा ब्रूस, बोल... काय झालं?" डॉ.अभिजीत फोनवर बोलतो.
"ताबडतोब विमानातून उतरा. निघण्यापूर्वी तुम्ही ज्या लष्कर प्रमुखाला भेटला होतात, त्यांची हत्या करण्यात आली आहे." ब्रूस एका श्वासात सगळं बोलतो.
"काय म्हणतोस? पण त्याचा आमच्याशी काय संबंध?" डॉ.अभिजीत आश्चर्याने विचारतो.
"संबंध आहे म्हणून तुम्हाला बोलावतोय. इथे विमानतळावर लष्कर अधिकारी आले आहेत. विमान नियंत्रण कक्षाला त्यांनी कळवलं आहे. तुम्हा सर्वांना विमानातून उतरावं लागेल." ब्रूस म्हणतो.
"ठीक आहे. आम्ही येतो." असं म्हणत तो जॉर्डनला म्हणतो. "आपल्याला विमानातून खाली उतरावं लागेल. आपण ज्या लष्कर प्रमुखांना भेटलो होतो त्यांची हत्या झाली आहे."
"काय बोलतोस? कसं झालं हे?" जॉर्डन विचारतो.
डॉ.अभिजीत काही बोलणार तेवढ्यात विमानात सूचना होते. 'जपान-यु.एस.ए. विमानाचे आगमन थांबविण्यात येत आहे. विमानातील संबंधित प्रवाशांनी कृपया लक्ष द्या. जॉर्डन, डॉ.अभिजीत, डॉ.एरिक, डॉ.मार्को आणि लिसा या प्रवाशांनी कृपया विमानातून खाली उतरावे. आपल्यासाठी जपान लष्करातर्फे तातडीचे बोलावणे आले आहे. धन्यवाद.' आणि सूचना संपते. सूचना ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं. डॉ.अभिजीत त्याच्या इतर सहकाऱ्यांना मूळ गोष्ट सांगतो आणि ते सर्व विमानातून खाली उतरतात.
(क्रमशः)