भाग ११
ठरल्याप्रमाणे सकाळी लवकरच अँजेलिना, डॉ.मार्को आणि इम्रान माउंट ओंकटो येथे जाण्यासाठी, त्यांच्या पाठोपाठ लिसा, डॉ.एरिक आणि ब्रूस साकुजीमा येथे तर जॉर्डन आणि डॉ.अभिजीत फुजियामा येथे जाण्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांमधून निघतात.
"जपानमध्ये ज्वालामुखीचा खूप मोठा इतिहास आहे ना! ज्वालामुखीबद्दल इथल्या लोकांमध्ये काय समाज आहेत?" लिसा ब्रूसला विचारते.
"इथल्या लोकांना ज्वालामुखीची सवय झाली आहे. इथे आजपर्यंत अनेक वेळा ज्वालामुखींचे उद्रेक झालेले आहेत. या देशात ज्वालामुखींचा एक पट्टा समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर गेला असून दुसरा पट्टा फूजियामा पर्वतापासून ओगासावारा बेटापर्यंत गेलेला आहे. या दोन पट्ट्यांत जागृत व मृत अशी एकूण २६५ ज्वालामुखे आहेत. त्यांपैकी ऐतिहासिक काळात ३० मुखांतून स्फोट झाल्यांची नोंद आहे. गेल्या शतकात २० ज्वालामुखांतून स्फोट झाला होता. आपण जात आहोत त्या पट्ट्यांत निरनिराळ्या प्रकारची व आकाराची ज्वालामुखे व त्यांमुळे तयार झालेले शंक्वाकृती पर्वत आहेत. या ज्वालामुखांभोवती लाव्हारसाचे व राखेचे मोठमोठाले ढीग साचलेले आहेत. कुणाला याचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी लष्कर सुरक्षा ठेवण्यात आली आहे." ब्रूस पुढे म्हणतात.
"इथे बरेचसे ज्वालामुखी हे देशाच्या आतल्या भागातील पर्वतप्रदेशात आढळतात. मध्य होन्शूमध्ये फोसा मॅग्नाजवळच अनेक लहानमोठी ज्वालामुखी आहेत. जॉर्डन आणि डॉ.अभिजीत ज्या ठिकाणी जात आहेत त्या फूजियामा पर्वताला इथले लोक खूप पवित्र मानतात आणि तो पर्वत सुद्धा जपानच्या आतल्या ठिकाणी आहे. त्याची उंची ३,७७६ मी. आहे आणि जपानमधील सर्वांत उंच पर्वतशिखर तेच आहे. ओंटाके , नोरीकूरा, हाकसान अशी महत्त्वाची ज्वालामुखे पर्वतांतच तयार झाली असून यात्सुगातके आणि तैसेन सारखी काही ज्वालामुखे मोकळ्या भागात तयार झाली आहेत. इथे गरम पाण्याचे अनेक झरेही आहेत. जपानमध्ये खनिज पाण्याचे एकूण १,२०० झरे असून त्यांपैकी ७०० गरम पाण्याचे आहेत." ब्रूसचं बोलणं संपेपर्यंत ते तिघेही साकुजीमा इथे पोहोचतात देखील.
माउंट ओंकटो, साकुजीमा आणि फुजीयामा या तिन्ही ठिकाणी लष्कर पातळीवर सुरक्षा रक्षा असते. जपान सरकारतर्फे मोहिमेसाठी दिले गेलेले पत्र ते तिथल्या लष्कर अधिकाऱ्यांना दाखविले जाते. लष्करातर्फे प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबरोबर ४ सैनिकांना सुरक्षेच्या कारणास्तव पाठविले जाते. डॉ.एरिक, ब्रूस आणि लिसा यांना माउंट ओंकटो येथे कोणतेही पुरावे मिळत नाही. जे काही अवशेष तिथे होते, त्यांचं संशोधन आधीच झालं होतं. त्यांच्या कामी येतील असे कोणतेही पुरावे त्यांना मिळत नाही. हीच अवस्था डॉ.मार्को, अँजेलिना आणि इम्रानची देखील असते. तरीही दोन्ही ठिकाणी ज्वालामुखीच्या शिखरापर्यंत त्यांचं संशोधन सुरु असतं. त्यांच्या तुलनेत जॉर्डन आणि डॉ.अभिजीत यांना मोठ्या पर्वतावर जावं लागत असल्याने त्यांच्या संशोधनाला सुरुवात देखील झाली नव्हती. पूर्ण दिवस असाच निघून जातो. माउंट ओंकटो आणि साकुजीमा या ज्वालामुखी पर्वतांवर गेलेले गट रात्री पुन्हा घरी येतात.
"आजचा दिवस कसा होता?" अँजेलिना लिसाला विचारते.
"आपल्या उपयोगी येतील अशा कोणत्याही गोष्टी नाही मिळाल्या. तुमचा दिवस कसा गेला?" लिसा म्हणते.
"जॉर्डन आणि डॉ.अभिजीत?" इम्रान त्या दोघींना विचारतो.
"त्या दोघांना अजून एक दिवस लागेल. अजून त्यांची पर्वतावर अर्धी चढाई देखील झाली नसेल." ब्रूस म्हणतो.
"इतका मोठा आहे का तो पर्वत?" इम्रान विचारतो.
"हो. शिझुओका आणि यामानाशी या दोन राज्यांच्या सीमेवर हा ज्वालामुखी पर्वत आहे. त्याला पाच सरोवरांनी वेढलं आहे. १७०७ साली त्याचा शेवटचा उद्रेक झाला होता. काही जणांच्या मते तो निद्रीस्त ज्वालामुखी आहे तर काही जण त्याला जागृत ज्वालामुखींमध्ये गणतात. साधारणपणे वर्षातून जुलै म्हणजे हा महिना आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या काळातच जपानमधील या सर्वात उंच पर्वतावर चढाई करता येते. इतर दिवसांमध्ये तो बर्फानं वेढला असल्यामुळं प्रशिक्षित गिर्यारोहकांशिवाय तिथं जाण्याचं धाडस सहसा कुणी करत नाही. पण या दोन महिन्यांत साधारण ३-५ लाख पर्यटक फुजीयामावर चढाई करतात. ३७७६ मी. उंचीच्या या पर्वताचे चढण्याच्या सोयीसाठी दहा टप्पे पाडले आहेत. त्यावर चार वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करता येते. चारी मार्गांवर साधारण २००० मी. उंचीच्या पाचव्या टप्प्यापर्यंत वाहनाने जाता येतं. पाचव्या टप्प्यापासून चढाईला सुरुवात करता येते. अगदीच हौशी गिर्यारोहकांना पायथ्यापासूनही चढाई करता येते. सर्वच मार्गांच्या प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी जागा आणि एक छोटंसं उपहारगृह आहे. आठव्या टप्प्यावर राहण्यासाठी एक लॉजची व्यवस्था आहे. फुजीसानवर चढून ‘गोराइको’ म्हणजे सूर्योदय पाहणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. पाचव्या टप्प्यापासून संध्याकाळी चढायला सुरुवात करुन विश्रांती न घेता थेट सूर्योदयाच्या सुमारास माथ्यावर पोचता येतं. पण बहुतांश लोक दुपारी चढायला सुरुवात करुन संध्याकाळी आठव्या टप्प्यावरील लॉजवर पोचतात. संध्याकाळचं जेवण आटोपून पाच-सहा तास लॉजमध्ये विश्रांती घेवून मध्यरात्री पुन्हा चढायला सुरुवात करुन सूर्योदयाच्या आधी थोडावेळ माथ्यावर पोचतात. जॉर्डन आणि डॉ.अभिजीत विश्रांती न घेता चढाई करतील अशी माझी खात्री आहे." ब्रूस म्हणतो.
शिस्त असलेले जॉर्डन आणि डॉ.अभिजीत नसल्याने ते सहाजण रात्री गप्पा मारतात आणि थोडी धमाल करतात. तसं पाहता मध्यरात्री जॉर्डनचा त्यांना फोन येतो. तो सर्वांची विचारपूस करतो आणि संशोधनाबद्दल देखील विचारतो. त्यांच्याकडे संशोधनासाठी काही विशेष पुरावे नसल्याने फुजीयामा इथेच आपल्याला पुरावे मिळतील याची जॉर्डनला खात्री होते. तो आणि डॉ.अभिजीत लगेच पुढच्या चढाईला सुरुवात करतात. पहाटेपर्यंत ते दोघेही फुजीयामा ज्वालामुखीच्या टोकाला पोहोचतात. सूर्योदय होत असतो. सूर्याची किरणे जॉर्डन आणि डॉ.अभिजीत यांच्यावर पडतात. आभाळावरून ते दृश्य खूप नेत्रदीपक दिसत होतं. उजाडल्यानंतर ते दोघेही कामाला लागतात. तिथे अनेक पर्यटक आलेले असतात. त्यांच्या समोर त्या दोघांना संशोधन करणे जरा कठीणच जात होते. अगदी ज्वालामुखी कुंडापर्यंत देखील त्या दोघांना म्हणावे तसे पुरावे मिळत नव्हते. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही म्हणून सैनिक त्यांना पुन्हा खाली उतरण्यासाठी विनंती करतात.
जॉर्डन आणि डॉ.अभिजीत तेथून निराश होऊन निघू लागतात तोच तिथे असलेल्या एका काटेरी वृक्षाला अभिजीतचा हात लागतो आणि त्याच्या हातून रक्त येऊ लागतं. तेच रक्त ज्वालामुखी कुंडामध्ये पडतं. फुजीयामा पर्वतावर आधी कोणीही जात नसल्याने तिथे कुणाचं रक्त पडलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा माणसं तिथे जाऊ लागली तेव्हा खूप दक्षता घेतली जात असल्याने देखील असा प्रसंग कधी आला नव्हता. त्यामुळे रुद्रस्वामींच्या यज्ञानंतर तब्बल ४,००० वर्षांनी त्या पर्वतावर मानवी रक्ताचे थेंब पडले आणि तो पर्वत हलू लागला.
पायथ्याशी असलेले लष्कर लगेचच पर्वताच्या दिशेने हेलिकॉप्टर पाठवते. पर्वतावरील सर्व पर्यटक सैरवैर धावू लागतात. शक्य तितक्या लवकर पर्वतावरून सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतं. पर्वतावर आणखी मोठ्याने हालचाल सुरु होते. फक्त जपानच नाही, तर संपूर्ण जगाला भूकंपाचा सौम्य धक्का बसतो आणि खूप मोठ्या कालावधीनंतर पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक होतो. फुजीयामा ज्वालामुखी कुंडातून थोड्या प्रमाणात ज्वालामुखी बाहेर येतो आणि त्यातूनच बाहेर निघतो अग्निपुत्र.
(क्रमशः)