भाग १४
जपानमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. अनेक लोक मारले जातात. सैन्यदलाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या सर्व गोष्टींची माहिती जॉर्डन आणि त्याच्या टीमला मिळत असते. समुद्रमार्गे सर्वजण चीनमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यावर जपानमधून ब्रुसच्या मृत्युच्या बातमीला देखील दुजोरा मिळतो. आता मात्र जॉर्डन पूर्णपणे कोसळला होता, कारण हट्टामुळे त्याने आपला जवळचा मित्र गमावला होता. ब्रूसबरोबर केलेलं काम, त्याने लावलेले शोध, संशोधकांमध्ये त्याचं विशेष स्थान आणि माणूस म्हणून असलेला ब्रूस असे त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जॉर्डनने जवळून बघितले होते.
"जॉर्डन, शुद्धीवर ये." डॉ.अभिजीत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.
"मला पोलिसांना आत्मसमर्पण करायचं आहे." जॉर्डन म्हणतो.
"आत्मसमर्पण? वेडा झालास का तू? आत्मसमर्पण करायला काय केलंस तू?" डॉ.अभिजीत म्हणतो.
"तो राक्षस दिसत नाही का तुला? तुझ्यासमोर उभ्या असलेल्या राक्षसामुळे तो राक्षस जन्माला आला आहे. चल, आपण आत्मसमर्पण करूया." जॉर्डन डॉ.अभिजीतचा हात खेचत म्हणतो. डॉ.अभिजीत हात झटकतो.
"आवर स्वतःला... इथे परिस्थिती काय आहे याची तुला कल्पना आहे ना? त्या राक्षसाला मरणासाठी पाऊल उचलायचं कि असं रडगाणं गात बसायचं? आणि आमचा लीडर आहेस ना तू?" डॉ.अभिजीत म्हणतो.
"अभिजीत, मला प्लीज एकट सोड. आतापासून तू सगळी जबाबदारी घे. मी काहीही बोलण्याच्या किंवा व्यक्त होण्याच्या मन:स्थितीत नाहीये. मला माहितीये तू सगळं व्यवस्थित सांभाळू शकतोस. तू करू शकतोस." जॉर्डन विचित्रपणे बोलत असतो.
"सर, मला वाटतं त्यांना ब्रूसच्या मृत्यूचा धक्का बसला आहे. त्यांना आरामाची गरज आहे. आता तुम्ही सूत्र हाती घ्या सर." अँजेलिना डॉ.अभिजीतला म्हणते. तो इतरांकडे बघतो. सगळे होकारार्थी मान हलवतात. चीनमधील अधिकाऱ्यांशी बोलून डॉ.अभिजीत जॉर्डनची रवानगी जर्मनीला त्याच्या राहत्या घरी करतो. संध्याकाळच्या विमानाने तो जर्मनीसाठी रवाना होतो. सोबत डॉ.अभिजीतने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन नर्सेस पाठविलेल्या असतात.
ब्रुसचा मृत्यू आणि जॉर्डनच्या मध्येच निघून जाण्याने आता डॉ.अभिजीत, डॉ.मार्को, डॉ.एरिक, लिसा, अँजेलिना आणि इम्रान असे सहाजन शिल्लक असतात. डॉ.अभिजीत त्यांना बोलावतो आणि नव्या मोहिमेबद्दल सांगतो.
"सध्या काय परिस्थिती आहे याचा तुम्लाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल." सगळे होकारार्थी मान हलवतात.
"ब्रूस हा जॉर्डनचा खूप चांगला मित्र होता. त्याच्या जाण्याचं दुःख जॉर्डन नक्कीच सहन करू शकत नाही. पण प्रश्न त्याच्या जाण्याचा नाहीये. प्रश्न हा आहे कि तुम्हा सर्वांची भूमिका सध्या काय आहे? आतापर्यंत आपण फक्त संशोधक होतो. पण आता आपल्याला एका राक्षसाशी सामना करायचा आहे. तो कसा आहे, काय आहे त्याचा मृत्यू कसा होईल, त्याचे हेतू काय आहे या सर्वांचा नव्याने अभ्यास करायचा आहे. आता तर ब्रूस मृत्युमुखी पडला आहे ते ही युद्धात न उतरता. पुढे आणखी कुणाला आपल्या प्राणांना मुकावे लागेल हे सांगणे अवघड आहे. आणि कोण कोण शेवटपर्यंत जिवंत राहू शकेल याची देखील मी शाश्वती देऊ शकत नाही. एव्हान माझी सुद्धा... तर कोण कोण माझ्यासोबत आहे?" डॉ.अभिजीत म्हणतो.
अपेक्षेप्रमाणे अँजेलिना, डॉ.मार्को आणि डॉ.एरिक हात वर करतात. डॉ.अभिजीत लिसा आणि इम्रानकडे बघतो.
"मी तुम्हा दोघांना जबरदस्ती करणार नाही. तुमचा निर्णय मी समजू शकतो. या मोहिमेमध्ये खरोखरच खूप धोका आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.
"तसं नाही. मी सोबत येऊ शकले असते. पण खरंच हे सर्व इथपर्यंत येईल याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. आणि मी अशा परिस्थितीला सामोरे नाही जाऊ शकत. तुम्हा सर्वांना असं मध्येच सोडून जाणे मला खूप अवघड वाटतंय." लिसा म्हणते.
"ठीक आहे. मी समजू शकतो." डॉ.अभिजीत म्हणतो.
"पण मी एक करू शकते. जरी मी प्रत्यक्षपणे तुमच्याबरोबर नसले तरी जॉर्जियामधून संशोधनाच्या बाबतीत नक्कीच मदत करू शकते." लिसा म्हणते.
"अरे वा... हे तर उत्तमच झालं." डॉ.एरिक म्हणतात.
"तर मग ठरलं... आपल्याला जे काही शोध लागतील त्यांची माहिती आपण लिसाला द्यायची आणि ती जॉर्जियामधून आपल्याला मार्गदर्शन करेल." डॉ.अभिजीत म्हणतो.
इम्रान काही न बोलता तिथून निघतो. तो कॉलेज सोडून फक्त पैसे कमावण्यासाठी त्यांचासोबत आला होता. पैसे मिळतील आणि बाहेरच्या देशात फिरायला मिळेल म्हणून तो त्यांच्याबरोबर होता. डॉ.अभिजीतला हे सर्व आधीपासून ठाऊक असल्याने तो इम्रानला जाण्यापासून अडवत नाही.
"सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर आहोत." अँजेलिना म्हणते.
"हो अँजेलिना, मला पूर्ण खात्री आहे. खरं तर मला इम्रानवर आधीपासूनच शंका होती. लिसाचं मी समजू शकतो. मी तिला आधी पासून ओळखत होतो. ती आपल्याबरोबर जपानला आली हेच माझ्यासाठी खूप होतं." डॉ.अभिजीत म्हणतो.
"ओके. मग सर आता आपण काय करायला हवं." अँजेलिना विचारते.
"सुरुवात हिमालयामध्ये झाली होती ना! शेवट पण हिमालयातच होईल. आपल्याला भारतात जायला हवं. तिथेच आपल्याला काही सुगावे मिळतील." डॉ.अभिजीत म्हणतो.
डॉ.अभिजीतच्या बोलण्यात तथ्य असतं. तिघेही त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवतात. त्याची टीम चीनमधील लष्कर अधिकारी आणि काही वैज्ञानिकांच्या समूहाची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचा अंदाज देते. त्यानंतर चीन लष्कराच्या मदतीने ते भारत सरकारला परिस्थितीची माहिती देतात. सर्वोतपरी मदत मिळत असल्याने डॉ.अभिजीत अँजेलिना, डॉ.मार्को आणि डॉ.एरिक यांच्यासह भारतात जातात.
(क्रमशः)