भाग १७
"अनेक संकटांचा सामना करत आम्ही आमच्या अनुयायांसमावेत ज्वालामुखी पर्वतावर पोहोचलो. लावारस गोठला होता म्हणून आम्हाला उष्णता जाणवत नव्हती. त्याच ठिकाणी यज्ञ करत आम्ही मंत्रोच्चारास सुरुवात केली. प्रत्येक मंत्रासह एक एक शव ज्वालामुखी कुंडात फेकले जात होते. जसजसे शव ज्वालामुखी कुंडात पडू लागले तसतसा गोठलेला ज्वालामुखी भडकू लागला. लावारस बाहेर येऊ लागला. गोठलेला भाग खाली जात लावारस मोठ्या प्रमाणात वर येऊ लागला. ज्वालामुखी कुंडामध्ये शव टाकणे सुरूच होते. सर्व शव संपल्यानंतर आम्ही ज्वालामुखी कुंडाकडे बघत म्हणालो,
‘हे अग्निदेवता... हे ज्वालादेवता... मनुष्य जातीच्या रक्षणासाठी आम्ही आपल्यासाठी अर्ध्यावर सोडलेला यज्ञ आज पूर्ण करत आहोत. आपल्याला १०० मनुष्यांचा बळी द्यावयाचा होता. आम्ही यज्ञ पूर्ण केला आहे, आमच्या रक्षणासाठी आता अग्निपुत्राला या पृथ्वीतलावर येऊ दे...’
आतमधून ज्वाला मोठ्याने बाहेर आल्या आणि त्यातून एक ध्वनी आला,
‘रुद्रा, तुला वाटतंय तू तुझा यज्ञ पूर्ण केला आहेस, पण ते साफ चुकीचे आहे. तू फक्त ९७ मनुष्यांचा बळी दिला आहेस. मनुष्याच्या हितासाठी अग्निपुत्राने जन्म घ्यावयाचा असेल तर १०० मनुष्यांचा बळी देणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी असेल तर अग्निपुत्र दुबळा असेल आणि जास्त असेल तर हाच पुत्रच मनुष्याचा संहार करेल. मला तुझ्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी तीन बळींसाठी तुला एक संधी देत आहे.’
अग्नीदेवतेचे ते बोलणे ऐकून तेव्हा मला आश्चर्य वाटले, पण त्यांनी संधी दिल्याने मला दिलासा मिळाला. मी माझ्या अनुयायांकडे बघितले आणि विचारले,
‘आपणा सर्वांनी सर्वकाही ऐकले आहे. आपल्यापैकी कोण तिघे पुढे येणार आहे?’ आणि हा प्रश्न म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुक होय. मी प्रश्न विचारताच माझे सर्व अनुयायी पुढे सरसावले. मी त्या सर्वांना समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला, फक्त तिघांनी पुढे यावयाचे आहे. पण कुणीही माझे ऐकले नाही. प्रत्येक जन पुढे पुढे करत होता. मी सगळ्यांना शांत करत होतो, पण...’’ एवढं बोलून स्वामी एकदम गप्प बसतात.
पुढील घटना प्रत्यक्षात दाखवण्यासाठी ते त्या सर्वांना भुतकाळातील ती गोष्ट सर्वांसमोर आणतात. ज्यात डाॅ.अभिजीत, त्याची पुर्ण टीम आणि सैनिक त्या पवित्र ज्वालामुखीच्या माथ्याशी उभे आहेत आणि सर्व नाट्य त्यांच्या डोळ्यासमोर घडत आहे.
स्वामींच्या सेवेसाठी कुणीही त्यांचेच ऐकत नव्हते आणि बघता बघता एका अनुयायाने कुणाचेही न ऐकता ज्वालामुखी कुंडात उडी मारली. सर्व अनुयायी त्याच्याकडे बघू लागले. आता पुढे काय होईल हे रुद्रस्वमींना लक्षात आले आणि सर्व अनुयायी मुर्खाप्रमाणे ज्वालामुखी कुंडात उडी मारू लागले. अग्नीदेवतेला देखील याचे आश्चर्य वाटले. पण नियमानुसार मनुष्याचा संहार करणाऱ्या अग्निपुत्राचे शरीर आकार घेऊ लागले. संपूर्ण जमीन हलू लागली, अग्निदेवता अदृश्य झाले, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी भेगा पडू लागल्या, समुद्र खवळू लागले, सोसाट्याने वारा वाहू लागला, पृथ्वीचा कायापालट होत होत एका युगाचा संहार होत होता.
ज्वालामुखीचा प्रचंड मोठा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकातून अग्निपुत्र बाहेर आला. संपूर्ण नीळ शरीर असलेला, लाल डोळे आणि मोठ्या जटा असलेला तो रूद्रस्वामींच्या दिशेने चालून येत असताना त्या पर्वताला मोठा तडाखा बसला आणि अग्निपुत्रासह सर्वजण त्या ज्वालामुखी कुंडात पडले. त्यांच्यावर दरड कोसळून सर्वजण ढिगार्याखाली गाडले गेले पृथ्वीवरील एक संपूर्ण युग संपले. सर्वजण भूतकाळातून बाहेर आले.
"बाप रे! भूतकाळात इतक्या भयानक गोष्टी घडल्या होत्या?" डॉ.मार्को म्हणतात.
"याहीपेक्षा भयानक गोष्टी घडल्या असत्या, जर त्या वेळी पर्वताला तडा गेला नसता." रुद्रस्वामी म्हणतात.
"म्हणजे त्या वेळी पर्वताला तडा गेला म्हणून अग्निपुत्र सक्रीय नव्हता?" अॅंजेलिना विचारते.
"हो, अगदी बरोबर." रुद्रस्वामी म्हणतात.
"एक मिनिट... जर तो सक्रीय नव्हता तर आमच्याकडून त्याला का सक्रीय केलं गेलं?" डॉ.अभिजीत म्हणतो. रुद्रस्वामी स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवतात.
"अभिजीत, मी तुझ्यासमोर सर्व भूतकाळ मांडत असताना पृथ्वीखाली असलेल्या अग्निपुत्राला याची चाहूल लागली अन त्याने भूकंप घडवून आणला." रुद्रस्वामी म्हणाले.
"पण हे सगळं मला का दाखवलं? माझ्याबरोबर जॉर्डन देखील होता. हे सर्व तुम्ही त्याला सुद्धा दाखवू शकला असता. मी पळवाट नाही काढत, पण मीच का? हा प्रश्न सध्या माझ्या डोक्यात आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.
"तुझा प्रश्न योग्य आहे. गेल्या ४,००० वर्षांमध्ये फक्त तूच एक आहेस तो गुहेतील या पोकळीमध्ये सर्वप्रथम आला होतास आणि अग्निपुत्राला तीच व्यक्ती पुन्हा सक्रीय करू शकते जी माझा अंश असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम येईल. म्हणून तो तुला मदत करत होता आणि मी सावध करत होतो. ही गोष्ट ना तुला समजू शकली ना जॉर्डन ला. आणि त्याने जे करायचे ते केलेच." रुद्रस्वामी म्हणाले.
"आता त्याला नक्की काय साध्य करायचे आहे?" डॉ.एरिक विचारतात.
"त्याला या पृथ्वीतलावरून मनुष्याचा समूळ नाश करायचा आहे." रुद्रस्वामी हे वाक्य म्हणताच उपस्थित असलेल्या सर्वांच्या भुवया उंचावतात.
"रुद्रस्वामी जी, यातून मार्ग दाखवा." डॉ.मार्को म्हणतात.
"अग्निपुत्राला स्वतः अग्निदेवतेचा आशीर्वाद आहे. पृथ्वीतलावर अशी कोणतीही जागा नाही ज्या ठिकाणी त्याचा वध होऊ शकेल, असं कोणतही हत्यार नाही जे त्याच्यावर वार करू शकेल, असा कोणतही प्राणी नाही जो त्याचा नाश करू शकेल. अग्निपुत्राला फक्त तीच व्यक्ती मारू शकते ज्या व्यक्तीचा बळी त्याच्या निर्माणासाठी दिला गेला आहे." रुद्रस्वामी म्हणतात.
"पण त्या सर्वांना जाऊन तर ४.००० वर्षे झाली आहेत, मग त्याला कोण मारणार?" अॅंजेलिना विचारते.
"अगदी चूक. त्याला फक्त अभिजीत मारू शकतो आणि म्हणूनच त्याचं पहिलं काम अभिजीतला संपवायचं आहे. म्हणून तो जपानमधून चीन आणि आता भारताच्या दिशेने येत आहे." रुद्रस्वामी म्हणाले.
"माझ्या हातून त्याचा नाश होणार आहे? ४,००० वर्षांपूर्वी माझा सुद्धा बळी दिला होता का? हा माझा पुर्नजन्म आहे का?" डॉ.अभिजीत विचारतो.
"तुला माहित नाही तूच अग्निपुत्राला जिवंत केलं आहेस." रुद्रस्वामी म्हणाले.
"मी अग्निपुत्राला कसं जिवंत करू शकतो? आणि अग्निपुत्राला माझा बळी केव्हा दिला होता?" डॉ.अभिजीत विचारतो आणि सर्वांचे सर्वांचे कान रुद्रस्वामी काय म्हणतील याकडे लागले.
(क्रमशः)