Get it on Google Play
Download on the App Store

कोल्हा, लांडगा व घोडा

एका कोल्ह्याने शेतात चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.

घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्‍याने पाहणार्‍या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्‌गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्‍याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.' ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !'

तात्पर्य

- स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्‍याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

इसापनीती कथा १५१ ते २००

इसाप
Chapters
लांडगा, कोल्हा व वानर लांडगा आणि घोडा लांडगा आणि बकरा कुत्रा आणि घंटा कोळी व मासा कोळी व रेशमाचा किडा कोल्हा व मुखवटा कोल्हा आणि लांडगा कोल्हा कावळा आणि सुरई हरिणी व तिचे पाडस हंस व बगळे घार व कबुतरे गरूड पक्षी व बाण चित्ता आणि कोल्हा स्वार आणि त्याचा घोडा खूप मित्र असलेला ससा कुत्रा व सुसर पारवा व कावळा वानर आणि कोल्हा घोडा आणि गाढव कोकीळ, पोपट व घार लांडगा आणि करडू मांजर व वटवाघूळ वानर आणि सुतार वाघ आणि चिचुंद्री सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा सापाचे शेपूट वेडावणारा पक्षी म्हातारा सिंह मेंढी व धनगर मत्सरी काजवा माणूस आणि दगड मांजर आणि चिमण्या माकड आणि मधमाशी कोल्हा आणि म्हातारी कोल्हा, लांडगा व घोडा करढोक आणि मासे हरिण आणि द्राक्षाचा वेल घुबडे, वटवाघुळे आणि सूर्य घार आणि शेतकरी दोन घोरपडी बोकड आणि काटेझाड बेडकी आणि तिचे पोर टोळ आणि मुंग्या सोन्याची अंडी देणारी हंसी सिंह, अस्वल, माकड व कोल्हा सिंहाची गुणज्ञता