कोल्हा
एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'
तात्पर्य
- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.