माकड आणि मधमाशी
मधमाशीचे पोळे पाहून एका माकडास मध खाण्याची इच्छा झाली. परंतु मधमाशीच्या नांगीचे दुःख केवढे असते याचा त्याला चांगलाच अनुभव असल्याने त्या पोळयास हात लावण्याचे धैर्य त्यास होईना. तेव्हा ते विचार करीत बोलू लागले, 'ज्या मधमाशीपासून इतका गोड आणि रुचकर मध उत्पन्न होतो त्याच मधमाशीच्या नांगीत भयंकर विष भरलेले असावे, हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे !' ते ऐकून एक मधमाशी त्याला म्हणाली, 'अरे, अगदी खरं बोललास. माझा मध जितका मधुर असतो, तितकाच माझ्या नांगीचा दंश भयंकर असतो.'
तात्पर्य
- देवाने एकाच ठिकाणी जसे काही गुण ठेवलेले असतात तसेच दोषही ठेवलेले असतात. हे लक्षात घेऊन त्या त्या वस्तूच्या गुणाचा उपयोग करून घ्यावा व दोष प्रकट न होतील अशी खबरदार घ्यावी हे चांगले.