वानर आणि सुतार
काही सुतार एक मोठे लाकूड कापत होते व ती मौज पाहात एक वानर झाडावर बसले होते. दुपारी घरी जाण्याची वेळ होताच कापलेल्या लाकडात एक पाचर ठोकून सुतार आपल्या घरी गेले. इकडे ते वानर झाडावरून खाली उतरून त्या लाकडापाशी गेले व सुतारांनी मारून ठेवलेली पाचर उपटून काढली. त्याबरोबर ते लाकूड मिटले जाऊन त्या उपद्व्यापी वानराचे दोन्ही पाय त्यात अडकले. अशा प्रकारे तो तेथे अडकून पडला असता काही वेळाने सुतार आपल्या कामावर आले व त्यांनी त्या नसत्या उठाठेवी करणार्या वानरास ताबडतोब ठार मारून टाकले.
तात्पर्य
- कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचार न करता ती गोष्ट करायला जो एकाएकी प्रवृत्त होतो, तो बहुधा पश्चात्ताप पावतो.