बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण (भाग तिसरा) 29
(२५)
सारग्रहण केलें पाहिजे
बुद्धगुरू राजगृहामध्यें गृध्रकूटपर्वतावर रहात होता. देवदत्तासंबंधानें बोलत असतां तो भिक्षूंला म्हणाला, "भिक्षुहो, एकादा कुलपुत्र श्रद्धापूर्वक गृहत्याग करून प्रवज्या घेतो. आपण संसारदु:खापासून मुक्त व्हावें, अशी त्याची इच्छा असते. परंतु भिक्षु झाल्यामुळें त्याला लोकांकडून लाभसत्कार मिळतो, व त्यायोगें तो आत्मस्तुति आणि परनिंदा करितो. जसा एकादा माणूस मोठ्या वृक्षाचे सार ग्रहण करण्यासाठीं जातो, व त्याच्या फांद्या आणि पाचोळा घेऊन तेंच सार आहे असें समजतो, त्याप्रमाणें, हा मनुष्य केवळ प्रव्रज्येलाच श्रामण्याचें सार असें समजून मोहित होतो.
"भिक्षुहो, दुसरा एकादा कुलपुत्र प्रव्रज्येनेंच संतुष्ट न होतां शीलवान् होतो; पण आपल्या शीलाचा गर्व वाटून तो आत्मस्तुति आणि परनिंदा करितो. मीच कायतो शीलवान्, दुसरे भिक्षु दु:शील, असें तो म्हणत असतो. जसा एकादा मनुष्य मोठ्या वृक्षाचें सार आणण्यासाठीं जातो, व त्या वृक्षाच्या सालीचा वरचा भाग घेऊन तेंच सार आहे असें समजून संतुष्ट होतो, त्याचप्रमाणें हा भिक्षु शीलच श्रामण्याचें सार आहे असें समजून मोहित होतो.
"तिसरा एकादा कुलपुत्र श्रद्धापूर्वक प्रव्रज्या घेऊन तेवढ्यानें संतुष्ट न होतां शीलवान् होतो, व समाधीचा अभ्यास करितो; पण समाधीचा लाभ झाल्यावर त्याला आपण कृतार्थ झालों असे वाटतें, आणि त्यामुळें तो आत्मस्तुति आणि परनिंदा करितो. जसा एकादा माणूस मोठ्या वृक्षाचें सार आणण्यासाठीं जातो आणि त्या वृक्षाची साल काढून तिलाच सार समजून संतुष्ट होतो, त्याप्रमाणें हा भिक्षु समाधिसुखालाच श्रामण्याचे सार समजून मोहित होतो.
"चवथा एकादा कुलपुत्र श्रद्धापूर्वक भिक्षु होऊन शील आणि समाधि यांहींकरून संतुष्ट न होतां प्रज्ञेचा अभ्यास करितो; परंतु प्रज्ञेंतच श्रामण्याचें सर्वस्व आहे असे वाटून तो आत्मस्तुति आणि परनिंदा करितो. मी प्रज्ञावान् आहें, व इतर भिक्षु दुष्प्रज्ञ आहेत, असें तो म्हणत असतो. जसा एकादा मनुष्य मोठ्या वृक्षाचे सार आणण्यासाठी जातो, आणि त्या वृक्षाची साल काढून तिच्या आंतील मऊ लांकडालाच सार समजून तें घेऊन संतुष्ट होतो, याप्रमाणे हा भिक्षु प्रज्ञेलाच श्रामण्याचें सार समजून मोहित होतो!
"पण पांचवा एकादा कुलपुत्र श्रद्धापूवर्क भिक्षु होऊन शील, समाधि आणि प्रज्ञा यांच्या लाभानें संतुष्ट न होतां निर्वाणाचा साक्षात्कार करून घेतो. तो या गुणांमुळें आत्मस्तुति किंवा परनिंदा करीत नाहीं. जसा एकादा मनुष्य मोठ्या वृक्षाचे सार आणण्यासठीं जातो व त्या वृक्षाची साल काढून तो आणि त्याचें मऊ लांकूड फोडून टाकून आंतील खरेंखुरें सार घेऊन जातो, त्याप्रमाणें हा भिक्षु श्रामण्याचें खरें सार जें निर्वाण तें मिळवितो.
"भिक्षुहो, हें ब्रह्मचर्य लाभसत्काराच्या फायद्यासाठीं नव्हें, शील संपत्तीच्या फायद्यासाठीं नव्हें, समाधिसंपत्तीच्या फायद्यासाठी नव्हे, किंवा प्रज्ञेच्या फायद्यासाठींहि नव्हे. हें ब्रह्मचर्य आत्यंतिक चित्तविमुक्तीसाठीं आहे, आत्यंतिक चित्तविमुक्ति (निर्वाण) हें ब्रह्मचर्याचें सार आहे, आणि हें ब्रह्मचर्याचे पर्यवसान आहे.