बुद्धचरित्र (भाग दुसरा) 25
[७]
राजगृहाला आगमन
उरुवेलेच्या प्रदेशांत काही काल घालवून बुद्धगुरू आपल्या एक हजार शिष्यांसह राजगृहाला आला. तेथें भगवान् यष्टिवनामध्यें रहात होता. बुद्ध आपल्या नगरासमीप आला आहे, हें वर्तमान बिंबिसार राजाला समजतांच तो मोठ्या लवाजम्यानिशीं त्याच्या भेटीला गेला. त्याच्याबरोबर मगध देशांतील पुष्कळ ब्राह्मणहि होते. त्यांनां अशी शंका आली कीं, बुद्ध काश्यपाचा शिष्य आहे किंवा काश्यप बुद्धाचा शिष्य आहे.
त्यांच्या मनांतील विचार बुद्धानें जाणला आणि तो काश्यपाला म्हणाला “काश्यपा, तूं आपलें अग्निहोत्र कां सोडलेंस?”
काश्यप म्हणाला “भगवान्, स्वर्गलोकीं सर्वप्रकारें कामसुख मिळणें हेंच यज्ञाचें फळ असें समजतात. पण इहलोकींचे आणि स्वर्गलोकींचें कामसुख पापकारक आहें, असें जाणून मी अग्निहोत्रामध्यें किंवा यज्ञामध्यें रत झालों नाही¡”
“पण हे काश्यपा, जर कामसुखांत तुला आनंद वाटत नाही, तर तुझें मन कोणत्या ठिकाणी रत झालों. भगवन्, आपण माझे गुरू आहां आणि मी आपला शिष्य आहें.”
हें काश्यपाचें भाषण ऐकून त्या ब्राह्मणांचा संशय निरस्त झाला.
बुद्धानें बिंबिसारराजाला, त्याच्या सरदारांना आणि त्याजबरोबर आलेल्या ब्राह्मणांनां दानापासून फायदे, शीलाचें महत्त्व, स्वर्गलोकींचे सुख, कामसुखामध्यें दोष, आणि एकांतवासामुळें घडणारा सुपरिणाम इत्यादि गोष्टी समजावून सांगितल्या, व जेव्हां त्या सर्वांचें चित्त अज्ञानावरणापासून मुक्त होऊन मृदु आणि मुदित झालेलें पाहिलें, तेव्हां त्यानें त्यांनां चार आर्यसत्यें समजावून सांगितली. त्याच्या उपदेशामुळे सर्वांची ज्ञानदष्टि खुली झाली, व ते सर्व त्या दिवसापासून बुद्धोपासक झाले.
राजा बिंबिसार म्हणाला “भगवन्, आपण बुद्ध होऊन माझ्या राज्यांत धर्मप्रसारार्थ प्रथमत: यावें अशी माझी उत्कट इच्छा होती; ती आज सफल झाली. आपल्या धर्मामृतपानानें माझी प्रजा सुखी होईल यांत संशय नाहीं. भगवन्, उद्यां आपण आपल्या भिक्षुसंघासह माझ्या घरीं भिक्षा ग्रहण करावी.”
बुद्धानें कांहीएक उत्तर न देतां मुकाट्यानेंच राजाचें आमंत्रण स्वीकारल्याचें चिन्ह दाखविलें. राजानें त्या रात्रीं सर्व व्यवस्था करून दुसर्या दिवशी बुद्धाला निरोप पाठविला. माध्यान्हकालाच्या पूर्वी बुद्ध आणि त्याचे काश्यपादिक एक हजार भिक्षु राजवाड्यांत येऊन मांडलेल्या आसनावर बसले. बिंबिसार राजानें आपण स्वत: बुद्धाची आणि भिक्षुसंघाची भोजनाची व्यवस्था ठेविली. भोजनोत्तर बुद्धाला एका मोठ्या दिवाणखान्यांत बसवून राजा त्याच्या एका बाजूला बसला.
तेव्हां राजाच्या मनांत असा विचार आला, कीं “माझें वेणुवन उद्यान बुद्धाला आणि भिक्षुसंघाला रहाण्याला योग्य आहे. कांकी, तें शहरापासून फार दूर नाहीं, व फार जवळहि नाहीं. तेथें जाण्यायेण्याचा रस्ता चांगला असून भाविक मनुष्याला जाण्यायेण्याला तें सोयीवार आहे. तेथें दिवसाची फारशी गडबड नसते, व रात्रीं विशेष गलबला नसतो. एकांतवासाला तें योग्य आहे. तें बुद्धाला दान केलें, तर फार चांगलें होईल.”
बिंबिसारराजा आपल्या आसनावरून उठला, आणि हातांत पाण्यानें भरलेली सोन्याची झारी घेऊन बुद्धाजवळ जाऊन म्हणाला “भगवन् माझें वेणुवन उद्यान मी आपणाला आणि आपल्या भिक्षुसंघाला दान देत आहें; त्याचा आपण स्वीकार करावा.”