बोधिसत्त्वाच्या कथा (भाग पहिला) 1
[१]
सुमेधकथा
लाखों वर्षांपूर्वी या जम्बुद्वीपामध्यें अमर नांवाच्या संपन्न नगरात सुमेध नांवाचा एक कोट्यधीश ब्राह्मण राहत असे. तो जरी थोर कुलामध्यें जन्मला होता, तरी आयत्या पिठावर रेघा ओढणार्या आळशी मनुष्याप्रमाणें त्यानें आपलें तारुण्य व्यर्थ न घालवितां वेद आणि शास्त्रें यांमध्यें पारंगतता संपादिली होती. सुमेध ब्राह्मणाला कोणत्याहि प्रकारें प्रपंचामध्ये कमतरता नव्हती. वडिलोपार्जित धनदौलतीचा तो उपभोग घेत होता; आणि विद्वत्तेसंबंधानें सर्व लोकांत त्याची ख्याति झाली होती. तथापि जन्म, जरा, व्याधि इत्यादि नैसर्गिक दु:खांच्या चिंतनानें संसारामध्यें त्याचें चित्त रमेनासें झालें. “माझ्या संपत्तीपैकीं माझ्याबरोबर येणारें काय आहे? माझी कीर्ति माझ्याबरोबर येईल काय?”इत्यादि विचारांनीं सुमेधाच्या मनामध्यें काहूर माजवून दिलें. तेव्हां तो आपणाशींच उद्गारला “या अत्यंत दु:खदायक प्रपंचापासून मुक्त अशी एक सुखकारक अवस्था असलीच पाहिजे, कीं, ज्या स्थितीप्रत गेला असतां प्राणी जन्म, जरा आणि मरण यांपासून मुक्त होईल.”
याप्रमाणे विचार करून सुमेधानें मुक्तीचा मार्ग शोधण्याचा निश्चय केला.
त्या काळच्या वहिवाटीप्रमाणें सुमेधानें आपली सर्व मालमत्ता याचकांनां वांटून दिली, व तो हिमालयपर्वतावर निघून गेला. तेथें धम्मक नांवाच्या एका टेंकडीवर त्यानें आपली पर्णशाला बांधून त्या पर्णशालेजवळ एक सुंदर चक्रम* केला. या ठिकाणीं कांहीं काळ घालविल्यावर सुमेधतापसाचें वैराग्य इतकें तीव्र झालें, कीं, त्याला या पर्णकुटिकेचा देखील कंटाळा आला. तो त्या पर्णकुटिकेचा त्याग करून एका झाडाखालीं राहूं लागला, व कंद-मूल-फलादिकांच्या आहारावर उपजीविका करून त्यानें खडतर तपश्चर्या आरंभिली. वैराग्याच्या आणि अभ्यासाच्या जोरावर सुमेधपंडितानें योगाच्या सर्व पायर्या आक्रमण केल्या. तो समाधिसुखामध्यें निमग्न होऊन गेला.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(चंक्रम म्हणजे चालण्याची जागा. बौद्धभिक्षु विहारामध्यें एकाग्रतेनें इकडूनतिकडे फिरण्यासाठीं जी जागा तयार करितात, तिला चंक्रम असं म्हणतात. जमीन खालींवर असणें, मधुनमधून झाडी असणें, आसपास जंगल असणें, आकुंचितता, आणि अत्यंत विशालता हे चंक्रमाचे पांच दोष होत. सुमेध तापसाच्या चंक्रमांत हे दोष नव्हते; म्हणून त्याला सुंदर चंक्रम असें म्हटलें आहे.)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्या समयीं जम्बुद्वीपामध्यें दीपंकर नांवाचा बुद्ध उत्पन्न झाला. तो जिकडेतिकडे आपल्या धर्माचा प्रसार करूं लागला. ध्यानसुखामध्यें गढून गेल्यामुळें सुमेधाला हिमालयपर्वतावर दीपंकरबुद्धाच्या धर्माची वार्तादेखील ऐकूं आली नाहीं. एके दिवशीं योगबलानें आकाशांतून संचार करीत असतां हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या रम्मनगरामधील लोक अत्यंत उत्सुकतेनें जिकडेतिकडे रस्ते साफ करीत असलेले, आणि ध्वजपताकादिकांनी सर्व नगर सुशोभित करीत असलेले त्यानें पाहिले. तेव्हां त्याला मोठें कौतुक वाटून तो आकाशांतून खालीं उतरला, आणि एवढी तयारी कशासाठीं चालली आहे याची त्यानें चौकशी केली. त्या लोकांपैकीं एकजण म्हणाला “वा:! तापसमहाराज, तुम्ही या प्रदेशांत रहात असून दीपंकरबुद्धांची तुम्हाला माहिती नसावी, हें मोठें विचित्र होय! दीपंकरबुद्ध आपल्या भिक्षुवर्गासह आमच्या शहराच्या नजीक येऊन ठेपले आहेत, व आज दुपारीं भिक्षाग्रहण करण्यासाठीं ते या शहरांत येणार आहेत. त्यांचा बहुमान करण्यासाठीं ही सर्व तयारी चालली आहे.”
हें ऐकून सुमेध म्हणाला “या जगतामध्यें बुद्ध हा शब्द देखील ऐकूं येणें कठीण आहे! मग प्रत्यक्ष बुद्धाचें दर्शन होणें किती कठिण आहे, हें सांगावयालाच नको! जन हो, तुम्ही हा जो रस्ता साफ करीत आहां, त्यापैकीं कांहीं भाग माझ्या स्वाधीन करा. मीहि बुद्धाच्या सेवेचा वांटेकरी होऊं इच्छितों.”