Get it on Google Play
Download on the App Store

भाग २ रा 6

तेरा संघादिशेष

५. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं आयुष्मान् सेय्यसक ब्रह्मचर्य आचरण्यांत असंतुष्ट होता; व त्यायोगें अत्यंत कृश आणि कुरूप दिसत होता. त्याला पाहून उदायी म्हणाला, “तूं असा कृश व दुर्वर्ण कां दिसतोस? तूं ब्रह्मचर्य आचरण्यांत असंतुष्ट आहेस काय?” सेय्यसकानें होय असें उत्तर दिलें. तेव्हां उदायी म्हणाला, “असें जर आहे तर तूं यथेच्छ भोजन कर, यथेच्छ नीज व यथेच्छ स्नान कर; आणि जेव्हां तुझ्या मनांत कामविकार उत्पन्न होईल तेव्हां हातानें वीर्यपात कार.” सेय्यसक म्हणाला, “पण असें करणें योग्य आहे काय?” उदायी म्हाणाला, “होय, मी देखील असेंच करतों.” तेव्हांपासून सेय्यसक यथेच्छ जेवूं लागला, यथेच्छ निजूं लागला, यथेच्छ स्नान करूं लागला; व जेव्हां जेव्हां कामविकारानें पीडित होत असे तेव्हां हातानें वीर्यपात करूं लागला. त्यायोगें पुन्हां तो धष्टपुष्ट दिसूं लागला. भिक्षूंनीं, तो कोणत्या औषधानें बरा झाला व पूर्वस्थितीवर आला असें त्यास विचारलें. तेव्हां त्यानें आपण औषधानें बरा झालों नसून ‘अशा अशा उपायानें बरा झालों’ हें वर्तमान त्यांस   सांगितलें. ते म्हणाले, “हे सेय्यसका, ज्या हातानें श्रद्धापूर्वक दिलेलें अन्न तूं जेवतोस, त्याच हातानें वीर्यपात करतोस काय?” ह्या बाबतींत त्यांनीं सेय्यसकाची फार निंदा केली. भगवंतानेंहि त्याची निंदा केली; व भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:- “चेतनायुक्त वीर्यपात संघादिशेष होतो.”

त्या काळीं भिक्षु उत्तम जेवणें जेवून निष्काळजीपणें निजत असत; व त्यायोगें स्वप्नांत वीर्यपात होत असे. तेव्हां संघादिशेष आपत्ति हातून घडली अशी त्यांस शंका आली. पण स्वप्नांत घडलेलें कर्म पूर्णपणें चेतनायुक्त म्हणतां येत नाहीं, असें म्हणून भगवंतानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

स्वप्नावस्थेंत झालेल्या वीर्यपातावांचून चेतनायुक्त वीर्यपात संघादिशेष होतो।।१।।

६. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उदायी अरण्यांत रहात असे. त्याचा विहार दर्शनीय व सुंदर होता. मध्ये बैठकीची जागा व चारी बाजूला पडवी, आसनें वगैरे व्यवस्थितपणें मांडलेलीं, पिण्याचें पाणी व उपयोगाचें पाणी योग्य ठिकाणीं ठेवलेलें, व जागा साफसुफ, अशी तेथें व्यवस्था असे. उदायीचा विहार पहाण्यासाठीं पुष्कल लोक येत असत. एक ब्राह्मणहि आपल्या बायकोला बरोबर घेऊन उदायीचा विहार पहाण्यासाठीं आला. ब्राह्मण इकडे तिकडे विहार पहाण्यांत गुंतला असतां त्याची बायको मागें रहिली होती. तिला उदायीनें पकडलें, विहार पाहून झाल्यावर ब्राह्मण आनंदीत होऊन म्हणाला, “खरोखर शाक्यपुत्रीय श्रमण धन्य आहेत, जे अशा सुंदर अरण्यांत रहातात. भवान् उदायीहि धन्य आहे, जो अशा ठिकाणीं रहातो. “तेव्हां ती ब्राह्मणी म्हणाली, ‘हा धन्य कसला? ह्यानें मला (तुमचा डोळा चुकवून) पकडलें.” तेव्हां त्या ब्राह्मणानें भिक्षूंची फार निंदा चालविली. होतां होतां ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां उदायीची निंदा करून त्यानें भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो कामासक्त भिक्षु विकृतचित्तानें स्त्रीचा हात, वेणी किंवा दुसरा कोणताहि अवयव पकडील, त्याला संघादिशेष होतो. ।।२।।

७. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उदायी अरण्यांत रहात असे. त्याचा सुंदर विहार पहाण्यासाठीं पुष्कळ बायका तेथें आल्या. त्यांना आपला विहार दाखवून उदायी त्यांच्याशीं अश्लील भाषण करूं लागला. त्यांत ज्या निर्लज्ज बायका होत्या, त्या उलट उदायीची थट्टा करूं लागल्या. पण ज्या सभ्य होत्या त्या निंदा करूं लागल्या. ही गोष्ट भिक्षूंला समजली, व त्यांनीं ती भगवंताला सांगितली, भगवंतानें उदायीची निंदा करून नियम घालून दिला तो असा:-

जसा एखादा तरुण तरुणीशीं मैथुनविषयक भाषण करतो, तसा एखादा भिक्षु कामासक्त होऊन विकृत चित्तानें स्त्रीशीं अश्लील भाषण करील, त्याला संघादिशेष होतो ।।३।।

८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेत वनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उदायी श्रावस्तींतील पुष्कळ गृहस्थांच्या घरीं जात असे. तेथें एक विधवा स्त्री अत्यंत सुरूप होती. उदायी तिच्या घरीं गेला, व तिला त्यानें चांगला धर्मोपदेश केला. तेव्हां ती म्हणाली, “भदंत, तुम्हांला जें काय लागेल तें मला सांगा. चीवर, भिक्षा वगैरे पदार्थांचा आम्ही तुम्हांस पुरवठा करूं.” उदायी म्हणाला, “भगिनी हे पदार्थ आम्हांला दुर्मिळ नाहींत. आम्हांला जें दुर्मिळ तें तूं दे.” ती:- “तें कोणतें!” उदायी:- “मैथुन.” ती:- “तुम्हांला जरूर आहे काय?” उदायी:- “होय, भगिनी.” तर मग या असें म्हणून खोलीचें दार उघडून ती आंत शिरली, व साडी खालीं टाकून मंचकावर निजली. उदायीहि तिच्या मागोमाग आंत गेला, व असल्या ह्या दुर्गंधी पदार्थाला कोण स्पर्श करतो असे म्हणून जमिनीवर थुंकला व तेथून निघून गेला. त्यायोगें त्या स्त्रीनें शाक्यपुत्रीयांची फार निंदा चालविली. होतां होतां ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हा त्यानें उदायीचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

जो कामासक्त भिक्षु विकृत चित्तानें स्त्रीपाशीं आपली सेवा करण्याची स्तुति करील, माझ्यासारख्या शीलवान्, साधु ब्रह्मचार्‍याची मैथुनविषयानें केलेली सेवा सर्वश्रेष्ठ सेवा म्हणेल, त्याला संघादिशेष होतो।।४।।

बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी
Chapters
बौद्धसंघाचा परिचय 1 बौद्धसंघाचा परिचय 2 बौद्धसंघाचा परिचय 3 भाग १ ला 1 भाग १ ला 2 भाग १ ला 3 भाग १ ला 4 भाग १ ला 5 भाग १ ला 6 भाग १ ला 7 भाग १ ला 8 भाग १ ला 9 भाग १ ला 10 भाग १ ला 11 भाग १ ला 12 भाग १ ला 13 भाग १ ला 14 भाग १ ला 15 भाग १ ला 16 भाग १ ला 17 भाग १ ला 18 भाग १ ला 19 भाग १ ला 20 भाग १ ला 21 भाग १ ला 22 भाग १ ला 23 भाग १ ला 24 भाग १ ला 25 भाग १ ला 26 भाग २ रा 1 भाग २ रा 2 भाग २ रा 3 भाग २ रा 4 भाग २ रा 5 भाग २ रा 6 भाग २ रा 7 भाग २ रा 8 भाग २ रा 9 भाग २ रा 10 भाग २ रा 11 भाग २ रा 12 भाग २ रा 13 भाग २ रा 14 भाग २ रा 15 भाग २ रा 16 भाग २ रा 17 भाग २ रा 18 भाग २ रा 19 भाग २ रा 20 भाग २ रा 21 भाग २ रा 22 भाग २ रा 23 भाग २ रा 24 भाग २ रा 25 भाग २ रा 26 भाग २ रा 27 भाग २ रा 28 भाग २ रा 29 भाग २ रा 30 भाग २ रा 31 भाग २ रा 32 भाग २ रा 33 भाग २ रा 34 भाग २ रा 35 भाग २ रा 36 भाग २ रा 37 भाग २ रा 38 भाग २ रा 39 भाग २ रा 40 भाग २ रा 41 भाग २ रा 42 भाग २ रा 43 भाग २ रा 44 भाग २ रा 45 भाग २ रा 46 भाग २ रा 47 भाग ३ रा 1 भाग ३ रा 2 भाग ३ रा 3 भाग ३ रा 4 भाग ३ रा 5 भाग ३ रा 6 भाग ३ रा 7 भाग ३ रा 8 भाग ३ रा 9 भाग ३ रा 10 भाग ३ रा 11 भाग ३ रा 12 भाग ३ रा 13 भाग ३ रा 14 भाग ३ रा 15 भाग ३ रा 16 भाग ३ रा 17 भाग ३ रा 18 भाग ३ रा 19 भाग ३ रा 20 भाग ३ रा 21 भाग ३ रा 22 भाग ३ रा 23 भाग ३ रा 24 भाग ३ रा 25 भाग ३ रा 26 भाग ३ रा 27 भाग ३ रा 28 भाग ३ रा 29 भाग ३ रा 30 भाग ३ रा 31 भाग ३ रा 32 भाग ३ रा 33 भाग ३ रा 34 भाग ३ रा 35 भाग ३ रा 36 भाग ३ रा 37 भाग ३ रा 38 भाग ३ रा 39 भाग ३ रा 40 भाग ३ रा 41 भाग ३ रा 42 भाग ३ रा 43 भाग ३ रा 44 भाग ३ रा 45 भाग ३ रा 46 भाग ३ रा 47 भाग ३ रा 48 भाग ३ रा 49 भाग ३ रा 50 भाग ३ रा 51 भाग ३ रा 52 भाग ३ रा 53 भाग ३ रा 54 भाग ३ रा 55 भाग ३ रा 56 भाग ३ रा 57 भाग ३ रा 58 भाग ३ रा 59 भाग ३ रा 60 भाग ३ रा 61 भाग ३ रा 62 भाग ३ रा 63 भाग ३ रा 64 भाग ३ रा 65 भाग ३ रा 66 भाग ३ रा 67 भाग ३ रा 68 भाग ३ रा 69 भाग ३ रा 70 भाग ३ रा 71 भाग ३ रा 72 भाग ३ रा 73 भाग ३ रा 74 भाग ३ रा 75 भाग ३ रा 76 भाग ३ रा 77 भाग ३ रा 78 भाग ३ रा 79 भाग ३ रा 80