Get it on Google Play
Download on the App Store

जातिभेद 3

भगवान म्हणाला,'' हे वासिष्ठा, तृण, वृक्ष इत्यादिक वनस्पती मध्ये भिन्नभिन्न जाती आढळतात. तशाच त्या किडे, मुंग्या वगैरे क्षुद्र प्राण्यांमध्ये ही आहेत. सर्पांच्या, श्वापदांच्या, पाण्यांत राहणार्‍या मत्स्यांच्या आणि आकाशांत उडणार्‍या पक्ष्यांच्या देखील अनेक जाति आहेत. त्यांच्या भिन्नात्वाचीं चिन्हें त्या त्या प्राणिसमुदायांत स्पष्ट दिसतात. पण मनुष्यांमध्ये भिन्नात्वाचें चिन्ह आढळत नाही. केस, कान, डोळे, तोंड, नाक, ओठ, भिवया, मान, पोट, पाठ, हात, पाय इत्यादिक अवयवांनी एक मनुष्य दुसर्‍या माणसाहून अगदीच भिन्न होऊं शकत नाही. अर्थात् पशुपक्ष्यादिकांत जशा आकारादिकांनी भिन्नभिन्न जाती आढळतात, तशा त्या मनुष्यप्राण्यांत नाहीत. सर्व माणसाचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरविता येत नाही. परंतु मनुष्याची जात कर्मावरून ठरविंता येणें शक्य आहे.

''एखादा ब्राह्मण गाई पाळून निर्वाह करीत असला, तर त्याला गवळी म्हणावें, ब्राह्मण म्हणूं नये. जो शिल्पकलेने उपजीविका करतो तो करागीर, जो व्यापार करतो तो वाणी, दूताचें काम करतो तो दूत, चोरीवर उपजीविका करतो तो चोर, युध्दकलेवर उपजीविका करतो तो योध्दा, यज्ञयागांवर उपजीविका करतो तो याजक, आणि जो राष्ट्रावर उपजीविका करतो तो राजा होय. परंतु यांपैकी कोणालाही जन्मामुळे ब्राह्मण म्हणतां यावयाचें नाही.

'' सगळीं संसारबंधनें छेदून जो कोणत्याही प्रापंचिक दु:खाला भीत नाही, कोणत्याही गोष्टीची ज्याला आसक्ति नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतों. इतरांनी दिलेल्या शिव्यागाळी, वधबन्ध इत्यादि जो सहन करतो, क्षमा हेंच ज्याचें बळ, त्याला मी ब्राह्मण म्हणतों. कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे जो इहलोकींच्या विषयसुखापासून अलिप्त राहतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो. ......

'' जन्मामुळे ब्राह्मण होत नाही, किंवा अब्राह्मण होत नाही. कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच अब्राह्मण होतो. शेतकरी कर्माने होतो, कारागीर कर्माने होतो, चोर कर्माने होतो, शिपाई कर्माने होतो, याजक कर्माने होतो, आणि राजा देखील कर्मानेच होतो. कर्मानेच हें सगळें जग चालत आहे. आसावर अवलंबून जसा रथ चालतो, तसे सर्व प्राणी आपल्या कर्मावर अवलंबून राहतात.''

हा बुध्दाचा उपदेश ऐकून वसिष्ठ आणि भारद्वाज त्याचे उपासक झाले.

ब्राह्मण आणि अब्राह्मण सारखेच!

वर दिलेल्या पुरूषसूक्ताच्या ऋचेच्या आधारें ब्राह्मण प्रतिपादन करीत असत की, ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाल्यामुळे चारी वर्णांत आपण श्रेष्ठ आहोंत. मज्झिमनिकायांतील अस्सलायनसुत्तांत यासंबंधीं बुध्द भगवंताच संवाद फारच बोधप्रद आहे. त्या सुत्ताचा सारांश असा:-

एके समयीं बुध्द भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळीं निरनिराळया देशांतून पांचशे ब्राह्मण कांही कारणास्तव श्रावस्तीला आले होते. त्या ब्राह्मणांमध्ये असा एक प्रश्न उपस्थित झाला की, हा श्रमण गोतम चारही वर्णांना मोक्ष मिळतो असें प्रतिपादन करतो. त्याजबरोबर वाद करून हें त्याचें म्हणणें कोण खोडून काढील? शेवटीं त्या कामीं आश्वलायन ब्राह्मणकुमाराची योजन करावी असे ठरलें.

आश्वलायन कुमाराचें अध्ययन नुकतेंच पुरें झालें होतें. निघंटु छंदशास्त्र इत्यादि वेदांगांसहवर्तमान त्याला चारही वेद तोंडपाठ येत असत. तथापि बुध्द भगवंताशीं वाद करणें सोपें नव्हे हें तो जाणून होता. बुध्दाशीं वाद करण्यास जेव्हा त्याची निवड झाली, तेव्हा तो त्या ब्राह्मणांना म्हणाला,'' भो, श्रमण गोतम धर्मवादी आहे, धर्मवादी लोंकाशी वाद करणें सोपें नाही. जरी मी वेदांमध्ये पारंगत असलों तरी गोतमाबरोबर वादविवाद करण्याला समर्थ नाही.''

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23