Get it on Google Play
Download on the App Store

कर्मयोग 3

क्रान्तिकारक तत्त्वज्ञान

येथे हें लक्षांत ठेवलें पाहिजे की, गोतमाने गृहत्याग केला तो केवळ आत्मबोध करून घेऊन मोक्ष मिळविण्यासाठी नव्हे, आपल्या शेजार्‍यांवर शस्त्र उगारणें त्याला योग्य वाटलें नाही, शस्त्रावाचून परस्परांच्या सलोख्याने चालणारी अशी एक समाजरचना करतां येईल की काय यासंबंधाने त्याच्या मनांत सतत विचार चालू होते. तपश्चर्येने आणि तपस्वी लोकांच्या तत्वज्ञानाने मनुष्यजातीसाठी असा एखादा सरळ मार्ग काढंता येईल, असें वाटल्यामुळेच त्याने गृहत्याग करून तपश्चर्या आरंभिली, आणि तिच्यायोगें कांही निष्पन्न होत नाही असें जाणून त्याने ती सोडून दिली, व एक अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला.

आजकालच्या क्रांतिकारी लोकांना राजकारणी आणि धार्मिक लोक जसे विनाशक (nihilist) वगैरे विशेषणें लावतात, आणि त्यांचा अडाणीपणा समाजासमोर मांडतात, त्याप्रमाणें बुध्दाला तत्समकालीन टीकाकार अक्रियवादी म्हणत, आणि त्याच्या नवीन तत्त्वज्ञानाची निरर्थकता लोकांपुढे मांडीत, असें समजण्यास हरकत नाही.

दुश्चरितें व सुचरितें

येथे वर दिलेलीं दुश्चरितें आणि सुचरितें कोणतीं याचे थोडक्यांत विवेचन करणें योग्य वाटतें. भगवान् सालेय्यक ब्राह्मणांना म्हणतो, ''गृहस्थहो, कायेने घडणारें तीनं प्रकारचें अधर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य प्राणघात करतो, रूद्र, दारूण, लोहितपाणि आणि मारहाण करण्यामध्ये गुंतलेला असतो; अथवा चोरी करतो, जी वस्तु आपली नव्हे ती-गावांत किंवा अरण्यांत असो-मालकाला न विचारतां घेतो; किंवा व्यभिचार आचरतो, आई, बाप, भगिनी, पति किंवा आप्त यांनी रक्षण केलेल्या स्त्रीशीं व्यभिचार करतो. याप्रमाणें कायेने त्रिविध अधर्माचरण घडतें.

''आणि, गृहस्थहो, वाचेने घडणारें चार प्रकारचें अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य खोटें बोलतो. सभेत, परिषदेंत, आप्तमंडळांत किंवा राजद्वारीं गेला असतां त्याची साक्ष विचारतात, तुला जे माहित असेल तें सांग. तो जें जाणत नाही, तें मी जाणतों, जें पाहिलें नाही तें मी पाहिलें, असे सांगतो. ह्या प्रमाणें स्वत:साठी परक्यासाठी, किंवा थोडयाबहुत प्राप्तीसाठी जाणून बुजून खोटें बोलतो. अथवा तो चहाडी करतो ह्या लोकांचें ऐकून त्या लोकांत भेद पाडण्यासाठी कागाळया सांगतो, किंवा त्या लोकांचें ऐकून ह्या लोकांत विरोध उत्पन्न करण्यासाठी यांना येऊन सांगतो . याप्रमाणे एकोप्याने वागणार्‍यांत भेद पाडतो, किंवा भांडणार्‍यांना उत्तेजन देतो. भांडण वाढविण्यांत त्याला आनंद वाटतो, भांडण वाढविणारे वचनच तो बोलत असतो. अथवा तो शिवीगाळ करतो, दुष्टपणाने भरलेलें, कर्कश, कटू, वर्मी लागणारें, क्रोधयुक्त आणि समाधानाचा भंग करणारें वचन बोलतो. अथवा तो वृथा बडबड करतो, भलत्याच वेळीं बोलतो, न घडलेल्या गोष्टी रचून सांगतो, अधार्मिक, शिष्टाचाराविरूध्द, दुर्लक्ष करण्याला योग्य, प्रसंगाला न शोभणारे अकारण पाल्हाळीक आणि अनर्थक भाषण करतो. याप्रमाणे वाचेने चतुर्विध अधर्माचरण घडतें.

''आणि गृहस्थहो, तीन प्रकारचें मानसिक अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य दुसर्‍याच्या द्रव्याचें चिंतन करतो, दुसर्‍याच्या संपत्तीचीं साधनें आपणाला मिळावीं, असे इच्छितो. अथवा तो द्वेषबुध्दी असतो; हे प्राणी मारले जावोत, नाश पावोत, असा विचार करतो. अथवा तो मिथ्यादृष्टि होतो, दान नाही, धर्म नाही सुकृतदुष्कृत कर्मांचें फळ नाही, हा लोक नाही, परलोक नाही अशा प्रकारचे नास्तिक विचार बाळगतो. याप्रमाणें मनाने त्रिविध अर्धाचरण घडतें.

''गृहस्थहो, तीन प्रकारचें कायेने घडणारे धर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य प्राणघात करीत नाही, तो इतरांवर शस्त्र उगारीत नाही, त्याला हत्या करण्यास लाज वाटते, सर्व प्राणिमात्राविषयीं त्याचें आचरण दयामय असतें. तो चोरी करीत नाही, गावांत किंवा अरण्यांत दुसर्‍याची वस्तु दिल्याशिवाय घेत नसतो. तो व्यभिचार करीत नाही; आई, बाप, बहीण, भाऊ, पति, आप्त इत्यादिकांनी रक्षिलेल्या स्त्रियांशीं संबंध ठेवीत नाही. याप्रमाणें कायेने त्रिविध धर्माचरण घडतें.

भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

धर्मानंद कोसंबी
Chapters
आत्मवाद 1 आत्मवाद 2 आत्मवाद 3 आत्मवाद 4 आत्मवाद 5 आत्मवाद 6 आत्मवाद 7 आत्मवाद 8 आत्मवाद 9 आत्मवाद 10 आत्मवाद 11 आत्मवाद 12 कर्मयोग 1 कर्मयोग 2 कर्मयोग 3 कर्मयोग 4 कर्मयोग 5 कर्मयोग 6 कर्मयोग 7 कर्मयोग 8 कर्मयोग 9 कर्मयोग 10 कर्मयोग 11 यज्ञयाग 1 यज्ञयाग 2 यज्ञयाग 3 यज्ञयाग 4 यज्ञयाग 5 यज्ञयाग 6 यज्ञयाग 7 यज्ञयाग 8 यज्ञयाग 9 यज्ञयाग 10 यज्ञयाग 11 यज्ञयाग 12 यज्ञयाग 13 जातिभेद 1 जातिभेद 2 जातिभेद 3 जातिभेद 4 जातिभेद 5 जातिभेद 6 जातिभेद 7 जातिभेद 8 जातिभेद 9 जातिभेद 10 जातिभेद 11 जातिभेद 12 जातिभेद 13 जातिभेद 14 जातिभेद 15 मांसाहार 1 मांसाहार 2 मांसाहार 3 मांसाहार 4 मांसाहार 5 मांसाहार 6 मांसाहार 7 मांसाहार 8 मांसाहार 9 मांसाहार 10 दिनचर्या 1 दिनचर्या 2 दिनचर्या 3 दिनचर्या 4 दिनचर्या 5 दिनचर्या 6 दिनचर्या 7 दिनचर्या 8 दिनचर्या 9 दिनचर्या 10 दिनचर्या 11 दिनचर्या 12 *परिशिष्ट 1 *परिशिष्ट 2 *परिशिष्ट 3 *परिशिष्ट 4 *परिशिष्ट 5 *परिशिष्ट 6 *परिशिष्ट 7 *परिशिष्ट 8 *परिशिष्ट 9 *परिशिष्ट 10 *परिशिष्ट 11 *परिशिष्ट 12 *परिशिष्ट 13 *परिशिष्ट 14 *परिशिष्ट 15 *परिशिष्ट 16 *परिशिष्ट 17 *परिशिष्ट 18 *परिशिष्ट 19 *परिशिष्ट 20 *परिशिष्ट 21 *परिशिष्ट 22 *परिशिष्ट 23