जातककथासंग्रह भाग ३ रा 27
१४१. एका पोपटाची देवघेव.
(सालिकेदारजातक नं. ४८४)
आमचा बोधिसत्त्व मगधराष्ट्रांत एका सावरीच्या अरण्यांत एका जन्मीं पोपट होऊन रहात असे. त्याचा बाप सर्व पोपटांचा राजा होता. परंतु वृद्धपणामुळें त्यानें सर्व राज्यकारभार बोधिसत्त्वाच्या स्वाधीन केला. बोधिसत्त्वहि मोठ्या उत्साहानें सर्व कारभार चालवून लौकरच शुकसमुदायाला अत्यंत प्रिय झाला. तथापि राज्यमदानें तो आपल्या मातापितरांना विसरला नाहीं. शुकसंघाला घेऊन चरावयाला गेला असतां तेथून येताना दाण्यांनीं भरलेलीं कणसें बरोबर आणून वृद्ध मातापितरांचें, पिलांचें आणि अंध पंगु इत्यादिकांचें तो यथायोग्य पालन करीत असे.
एके दिवशीं तो आपल्या शुक्रगणाला बरोबर घेऊन मगध देशांत एका भाताच्या शेतांत येऊन उतरला व तेथें यथेच्छ दाणे खाऊन कांहीं कणसें बरोबर घेऊन पुनः शाल्मलीवनांत आला. हा प्रकार दोन तीन दिवस सारखा चालला होता. तें शेत एका कौशिकगोत्री ब्राह्मणाचें होतें, व त्यानें कांहीं दाणे देण्याच्या करारानें एक माणूस तें राखण्यासाठी ठेविला होता. त्या माणसानें पोपटांना आरडाओरडीनें दगड वगैरे फेकून पळविण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण यश आलें नाहीं. तेव्हां ब्राह्मण आपणाकडून शेताचें पीक वसूल करून घेईल या भयानें तो त्याच्या घरीं गेला.
त्याला पाहिल्याबरोबर ब्राह्मण म्हणाला, ''कायरे बुवा ? शेताचें सर्व कांहीं ठीक चाललें आहे ?'' तो म्हणाला, ''इतर गोष्टींत सर्व बरें चाललें आहे. पण एकाच गोष्टीचें भय वाटत आहे. पुष्कळसे पोपट येऊन शेत खात आहेत आणि त्यांपैकीं सर्वांत सुंदर असा एक पोपट बरींच कणसें चोचींतून रोज पळवून नेत आहे.''
ब्राह्मण म्हणाला, ''एवढी गोष्ट मला सांगण्याला कां आलास ? पाश घालून त्यांपैकीं कांहीं पक्ष्यांला विशेषतः त्या सुंदर पक्ष्याला पकडून माझ्या जवळ घेऊन यावयाचें होतेंस कीं नाहीं !''
धन्याच्या या रागावण्यानें तो बिचारा गडी खजील झाला व दुसर्या दिवशीं त्यानें बोधिसत्त्वाच्या चरण्याच्या ठिकाणीं पाश मांडून ठेविला. कर्मधर्मसंयोगानें बोधिसत्त्व त्या जाळ्यांत सांपडला. इतर पक्ष्यांना त्यानें जवळ येऊं दिलें नाहीं. व दाणे खाऊन झाल्यावर त्यांना तेथून पळून जाण्याची इशारत दिली. त्या गड्यानें त्याला नेऊन ब्राह्मणाच्या हवाली केलें. तेव्हां कौशिकब्राह्मण म्हणाला, ''बा शुका, माझ्या शेतांतले दाणे खातोस, एवढेंच नव्हे तर कणसेंहि पळवून नेतो तें कां ? इतर पोपटांपेक्षां तुझें पोट तरी मोठें असलें पाहिजे किंवा मनुष्याप्रमाणें कोठेंतरी तूं धान्याचें कोठार केलें असलें पाहिजे. अथवा माझ्या वैरानें माझ्या कणसाची तूं विनाकारण नासाडी करीत आहेस असें म्हणावें लागेल.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''तुम्ही म्हणतां तसा मजकूर नाहीं. मी जी कणसें नेत असतों त्यांनीं माझी सर्व देवघेव चालते. म्हणजे कांहीं मी कर्जादाखल देत असतों. कांहीं कर्ज फेडण्याकडे लागतात व कांहींचें मूल्य माझ्या तिजोरींत जातें.''
पोपटाची ही देवघेव ऐकून कौशिक ब्राह्मण विस्मित झाला आणि म्हणाला, ''ही सगळी देवघेव कोणत्या प्राण्यांशीं चालते व तिजोरी कशा प्रकारची आहे हें मला सांग.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''ज्यांना पंख फुटले नाहींत अशीं माझी पिलें आहेत त्यांस मी कांहीं दाणे देत असतों व यालाच मी ॠण असें म्हणतों. कां कीं, माझ्या वृद्धापकाळीं माझे तरुण पुत्र हें ॠण फेडतील अशी मला आशा आहे. माझ्या वृद्ध आईबापांला जे मी दाणे देत असतों त्यालाच कर्जाची फेड असें म्हणतों. आणि जे अंध, पंगू वगैरे दुर्बल पोपट आहेत त्यांच्या निर्वाहार्थ शिल्लक राहिलेले दाणे मी लावीत असतों. त्यांची किंमत माझ्या पुण्यसंचयरूपी तिजोरींत जात असते. म्हणजे या कृत्यानें माझें सुकृतकर्म वाढत असतें. यालाच मी माझी तिजोरी असें म्हणतों.
पोपटाची बुद्धिमत्ता पाहून ब्राह्मण अतिशय खूश झाला आणि म्हणाला, ''माझ्या शेताचा अर्धा हिस्सा मी तुला देऊन टाकतों. त्याचा यथेच्छ उपभोग घे व वेळोवेळीं मला भेटत जाऊन चांगला उपदेश कर.''
पण बोधिसत्त्वानें शेतांपैकी कांहीं बिघे स्वीकारले. व आपल्या अनुयायांना तेवढ्यावरच तृप्ति करण्याची आज्ञा केली. इतस्ततः नासाडी न झाल्यामुळें ब्राह्मणालाहि त्या शेतांत चांगलें पीक मिळालें.