जातककथासंग्रह भाग १ ला 124
९३. दुर्मुख राजा.
(उलुकजातक नं. २७०)
प्रथम कल्पांतील मनुष्यांनीं आपणासाठीं एक सुंदर आणि हुषार राजा निवडला; मत्स्यांनीं आनंद नांवाच्या मोठ्या माशाला आपला राजा केलें; आणि चतुष्पादांनीं सिंह राजा निवडला. तेव्हां सर्व पक्षी हिमालयावरील एका मोठ्या शिलातलावर एकत्र जमले आणि आपणांमध्यें एक पक्षिराजा असावा असा त्यांनीं ठराव पास केला. परंतु राजा कोणत्या पक्ष्याला करावें याचा बराच वेळ निकाल लागेना. शेवटीं भवति न भवति होऊन कांहीं पुढार्यांनीं घुबडाला राजा निवडण्याचा विचार केला, आणि त्यांतील एकजण पुढें होऊन म्हणाला, ''पक्षिगणहो, या पक्ष्याला आम्हीं आपला राजा निवडीत आहों. जर याच्या विरुद्ध कोणास बोलावयाचें असेल तर त्यानें आगाऊच बोलावें. मी आतां हा आमचा राजा आहे असें त्रिवार उच्चारीन, आणि दरम्यान जर कोणी कांहीं बोलला नाहीं तर सर्वांना याची निवडणुक मान्य आहे असें गृहीत धरण्यांत येईल.''
इतक्यांत एक तरुण कावळा पुढें सरसावून म्हणाला, ''बांधवहो, आपण सर्वांनीं घुबडाची निवडणूक केली आहे. परंतु ती पुरी होण्यापूर्वीच मला या संबंधानें थोडें बोलावें असें वाटतें. जर आपणा सर्वांची परवानगी असेल तर मी या प्रसंगीं चार शब्द बोलतों.''
तेव्हां तेथील कांहीं प्रमुख पक्षी म्हणाले, ''सोम्य, तुला जें कांहीं बोलावयाचें असेल तें मोकळ्या मनानें बोल. आम्हां सर्वांची तुला परवानगी आहे. तूं जरी तरुण आहेस तरी तरुण पक्षी देखील हुशार असूं शकतात हें तत्त्व आम्हांला मान्य आहे. तेव्हां तुला बोलण्याला आम्हीं आनंदानें परवानगी देतों.''
कावळा म्हणाला, ''बांधवहो, तुमचें कल्याण होवो ! पण आजचे हें तुमचें कृत्य मला आवडत नाहीं. कां कीं, या शुभमंगल प्रसंगीं देखील या घुबडाचें तोंड कसें वेडें वाकडें दिसतें पहा ! आणि जर पुढें मागें त्याच्या हातीं सत्ता जाऊन दुसर्यावर रागावण्याचा याला प्रसंग आला, तर याचें तोंड किती चमत्कारीक होईल, याची निव्वळ कल्पनाच केली पाहिजे ! म्हणून असा हा दुर्मुखलेला राजा मला मुळींच आवडत नाहीं !''
कावळ्याचें भाषण ऐकून सभेंत एकच गोंधळ उडाला, घुबडाला अभिषेक करूं नये, असेंच बहुतेकांचें मत झालें. तेव्हां घुबड क्रोधाविष्ट होऊन त्या तरुण कावळ्याच्या मागें लागला पण कावळा त्याला सांपडला नाहीं. असें सांगतात कीं, त्या दिवसांपासून कावळ्याचें आणि घुबडांचें वितुष्ट पडलें.