जातककथासंग्रह भाग २ रा 29
१२५. परपुष्ट कावळा आणि स्वतंत्र लावा.
(वत्तकजातक नं. ३९४)
बोधिसत्त्व एका जन्मीं लावापक्षी होऊन अरण्यामध्यें यथेच्छ संचार करीत असे. एके दिवशीं तो उडत उडत वाराणसीला आला. तेथें एक परपुष्ट कावळा त्याला पाहून म्हणाला, ''बा पक्ष्या, तूं येथें कोठून आला आहेस ?''
बोधिसत्त्व म्हणाला, ''मी अरण्यवासी लावापक्षी आहे. सहज उडत उडत या नगराजवळ येऊन ठेपलों आहे. पण कावळेदादा, मी तुम्हाला असें विचारतों कीं, येथें झाडें वगैरे फारशीं दिसत नाहींत. मग तुमचा निर्वाह कशावर चालतो बरें ?''
कावळा म्हणाला, ''अरे लाव्या, तूं तर अगदी मूर्ख दिसतोस. येथें आमची यथेच्छ चैन चालते. आज कोणाच्या घरीं पिंडप्रदान तर कोणाच्या घरीं ब्राह्मणभोजन असें येथें चाललेलें असतें. आणि जेव्हां अशी मेजवानी मिळत नसते, तेव्हां हळूच कोणाच्या तरी घरांत शिरून मत्स्यमांसादिक पदार्थ पळवून नेण्यास आम्ही कमी करीत नसतों,''
लावा म्हणाला, ''पण कावळेदादा, इतकी तुमची चैन चालली असून तुम्ही असे रोड कां दिसतां बरे ?''
कावळा म्हणाला, ''हा वेड्या, हें काय विचारतोस ? आम्हांला जरी खावयास यथेच्छ मिळतें तरी राजाच्या दरबारांतील मनुष्यांप्रमाणें आमची वृत्ति सदोदित साशंकित असते. एखाद्यानें पिंडप्रदान करून पिंड टाकून दिले असले तथापि ते खाण्यास आम्हाला फार भीति वाटते. न जाणो, एखादा द्वाड पोरगा दगड घेऊन आम्हांस मारण्यासाठीं बसला असला तर ! मग आम्ही लोकांच्या घरांत शिरतों त्यावेळी आमचें चित्त किती उद्विग्न असतें याची नुसती कल्पना केली पाहिजे ! अशा परिस्थितींत आमच्या अंगावर मांस कसें यावें ? पण मी तुला असें विचारतों कीं, जंगलांतील झाडपाल्यावर निर्वाह करणारा तूं इतका लठ्ठ कसा दिसतोस ?''
लावा म्हणाला, ''याचें कारण हेंच कीं, आम्हीं स्वतंत्रपणें रहातों. परपिंडावर किंवा दुसर्याच्या घरांत शिरून निर्वाह करण्याची आम्हाला संवय नाहीं. जें कांहीं भोजनसमयीं मिळेल त्यावर आम्ही तृप्त असतों. दुसर्याच्या वस्तूवर कृदृष्टि आम्ही कधी ठेवीत नसतों. अर्थात आम्ही निर्भयपणें रहातों, व त्यायोगें आमचें अंतःकरण सदोदित शांत असतें. खाल्लेलें अन्न अंगास लागल्यामुळें आमचें शरीर स्थूल होणें साहजिकच आहे.''
कावळा म्हणाला, ''तुम्ही लावे खरोखरच धन्य आहां. परंतु आम्हांला परपिंडावर पोसण्याची लागलेली संवय सुटून तुमच्या सारखें स्वतंत्र रहातां कसें येईल ?''
हें कावळ्याचें भाषण ऐकून लावा ''तुमचें सुग्रास अन्न तुम्हांलाच शाश्वत होवो'' असें म्हणून अरण्यांत उडून गेला.