स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 3
एक दिवस बेंजामिन सर्व गोष्टींचा विचार करीत होता. सर्व गत आयुष्याचें चित्र तो डोळयांसमोर आणीत होता. केवळ कष्ट करण्यासाठींच परमेश्वरानें मला निर्माण केलें असें तो स्वत:शी म्हणत होता. त्या दिवशीं बेंजामिन यास त्याच्या जुन्या मालकाकडून एक पत्र आलें त्या पत्रांत आपल्या पूर्वीच्या उद्ध्ट व मगरूर वर्तनाचा त्या गृहस्थानें क्षमा मागितली होती. व पुनरपि बेंजामिन यास छापखान्यांत कामावर येण्यास विनंती केली होती. अयोग्य माणसाची सेवा करणें, चाकरी करणें हें बेंजामिन यास पापमूलक व स्वाभिमानकारक वाटे. परंतु मेरिडिथ म्हणाला ''तुम्हांस चांगला पगार मिळून तुमच्याजवळ चार पैसे जमतील. शिवाय तुमच्या हाताखालीं काम करावयास शिकून मी पण चांगला तयार होईल नाहीं तरी तुम्ही रिकामेच बसणार ना ? शिवाय मालकानें आपण होऊन क्षमा मागितली आहे. मग तेथें जाण्यांत अपमानास्पद काय आहे ? मेरिडिथच्या या पोक्त विचारसरणीनें बेंजामिनचा बेत न जाण्याचा बेत पालटला. तो मालकाकडे गेला व पुनरपि कामावर बेंजामिन रूजू झाला.
नोटा तयार करण्याचें नवीन काम करण्यासाठीं मालकानें बेंजामिन यांस ठेविलें होतें. या सरकारी कामाचा मक्ता घेऊन या छापखानेवाल्यास पैसे मिळवायाचे होते. म्हणून तर ती क्षमायाचना. पैशासाठीं मनुष्य कसा लाचार होतो, कसें वाटेंल तेथें माघार घेण्याचें धोरण स्वीकारतो तें पहा. ज्यानें गर्वभरानें बेंजामिन यास काढून टाकलें तोच बेंजामिनची मनधरीणी करूं लागला. या द्रव्या, तुझा पराक्रम सर्वाहून अलौकिक आहे.
हें नियुक्त नूतन काम पार पाडण्यासाठीं बेंजामिननें नवीन ठसे वगैरे जुळविले. नवीन यंत्र तयार केले. या कमांत बेंजामिनची मोठ मोठया सरकारी हुद्देदारांजवळ ओळख झाली. बेंजामिनच्या मालकास कोणीच विचारीना. सेवकाच्या अंगच्या गुणामुळें सेवकासच मान मिळाला. गुण हे कधी लपत नाहींत. बेंजामिन याच्या कामगिरीने मालक खूष होता, कारण त्यास पैसे मिळत होते.
परंतु आतां लौकरच इंग्लंडमधून मागवलेली यंत्रसामुग्री येणार होती. ही वार्ता अद्याप गुपत होती; पटकर्णी झाली नव्हती. सामान आलें. मेरिडिथ व बेंजामिन यांनीं जुळवाजुळव केली, त्यांनीं आतां आपल्या कामाचा राजीनामा दिला. एक दिवस सकाळीं फिलॅडेल्फिया शहरांत ' मेरिडिथ आणि फ्रँकलिन ' अशी पाटी लटकली.
लोक चर्चा करूं लागले. ते म्हणूं लागले, ''या लहान शहरांत तीन छापखाने कसे काय चालणार ? ''परंतु एक गृहस्थ म्हणाला, ''तो बेंजामिन ज्या ठिकाणीं असेल, तेथें अपयश येणार नाहीं. तो सर्वास मागें टाकील. तो शहाणा, हुशार व उद्योगी आहे. ''या सदगृहस्थाचें हें म्हणणें यथार्थ होतें. बेंजामिन रात्रंदिवस खपूं लागला. त्याच्या गरजा थोडया; काटकसर चांगली खबरदारीची; यामुळें छापखाना चांगला चालेल असें वाटूं लागलें.
--------