प्रस्तावना 1
प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासांत महनीय व वंद्य अशा व्यक्ति होऊन गेलेल्या असतात. त्यांच्या चरित्रक्रमाचें पारायण करणें, तदनुरुप आपल्या आयुष्यास स्वत:च्या सामर्थ्यानुसार वळण देण्याचा प्रयत्न करणें हें प्रत्येंक माणसाचें कर्तव्य आहे. थोरामोठयांचीं चरित्रें वाचावीं; त्यांचें मनन करावें, जेणेंकरुन मन पावन होतें, ह्दय उदार हातें, दृष्टि निर्मळ होते; चांगले व वाईट नीट समजूं लागते; मोह कसा आंवरावा, पापांपासून कसें दूर राहावें, अज्ञाननाशार्थ कसे सतत प्रयत्न करावे लागतात, संकटांशीं सहस्त्र टकरा कशा माराव्या लागतात, वगैरे गोष्टी आणांस येथें नीट समजतात.
आपल्या देशांत अनेक थोर पुरुष होऊन गेले आहेत व सध्या हयात आहेत. थोर पुरुष निरनिराळया प्रकारचे, निरनिराळया वैशिष्टयानें युक्त असें असतात. अशोकासारखें राजे; शिवाजी बाजीसारखे राष्ट्रवीर, तानाजीसारखे कर्तव्यनिष्ठ, स्वामिनिष्ठ, रामदास तुकारामासारखे साधुसंत महंत भास्कराचार्यासारखें गणिति, कालिदासासारखे कवि, रानडे, विद्यासागर, आगरकर यांसारखे समाज व धर्मसुधारक जमशेटजी जिजीभाई, चुनीलाल सरय्या यांसारखें जगद्विख्यांत व्यापारी, टिळक, गोखले यांसारखे राजकारणी देशभक्त, असे अनेक प्रकारचे थोर लोक आपणांस आढळतात; परंतु प्रत्येकास आपापल्या प्रांतांत, आपापल्या कर्तव्यक्षेत्रांत थोर पद प्राप्त करुन घेण्यास उद्योग, अभ्यास, श्रम, चिकाटी या सर्वाची सारखीच जरुरी होती. 'A hero is a hero at all points’ मोठया माणसांत मोठेपणा प्राप्त करुन घेण्यासाठीं सारखेच गुण दिसून येतात.
इटालीच्या देशांत ज्याप्रमाणें गॅरिबाल्डी, काव्हर, मॅझिनी, व्हिक्टर-इ-मॅन्युअल हा मोत्यांचा चौकडा शोभतो, त्याप्रमाणें अमेरिकन संयुक्त संस्थानाच्या इतिहासांतहि जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रॅकलिन, जेम्स गार्फील्ड, व ऍब्राहम लिंकन हा पण मोत्यांचा चौकडा ह्दयास आल्हादवितो. या चौघांपैकीं वॉशिंग्टन व बेंजामिन हे बरोबरीचे व समकालीन. दोघांनींही इंग्लंडबरोबर अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांचे जेव्हां स्वातंत्र्यार्थ युध्द झाले, त्या वेळेस देशाची सेवा केली आहे. या अद्वितीय जोडींतील एका पुरुषाचें चरित्र मी एका इंग्रजी चरित्राच्या आधारानें आज देणार आहे. ती व्यक्ति म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन ही होय.