Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 2

प्रथम ४/५ महिने बेंजामिन यास चांगला पगार मिळाला. परंतु पुढें मालक कुरकुर करूं लागला. एक दिवस अल्पसें कारण घटलें व बेंजामिन यानें नोकरीवर लाथ मारली. तें क्षुल्लक कारण म्हणाल तर पुढें देतों. मालकसाहेब रस्त्यांतून जात होते. या वेळेस बेंजामिन सहज खिडकींतून बाहेर डोकावत होता. मालकानें वर पाहिलें. तों बेंजामिन बाहेर पाहतो आहे. झालें, कारण शोधणा-यास कारण मिळालें; निमित्तवरच टेंकलेल्या मालकास बेंजामिन यास काढून टाकण्यास निमित्त सांपडलें. ''आपलें काम करा, असें बाहेर बघत राहून वेळ गमावूं नका ''असें खालूनच रस्त्यांतून मालक साहेब ओरडले. ओरडूनच फक्त थांबले. नाहींत तर वरती येऊन बेंजामिन यास उध्दटपणें उपशब्द पण बोलले. बेंजामिनचा स्वाभिमान मेला नव्हता. ' तुमच्या सारख्या नालायक मालकाची नोकरी करणें मला योग्य व चांगलें दिसत नाही, हा पहा मी चाललों ' असें बाणेदार उत्तर देऊन बेंजामिन निघून गेला. त्या तरूण व स्वाभिमानी युवकाची ही तेजस्वी वृत्ति पाहून मालक साहेब मेल्यासारखे झाले.

पुनरपि भविष्यकाळ भीषण रीतीनें बेंजामिनच्या समोर उभा राहिला. बोस्टन येथें जावें व तेथें कांही तरी करावें असें बेंजामिन मनांत योजीत होता. एक दिवस बेंजामिन विचारमग्न असा बसला होता. ज्या छापखान्यांत बेंजामिन काम करावयास हाता, त्या छापखान्यांतील मेरिडिथ याच्या मनांत कित्येक दिवस निराळेच विचर घोळत होते. बेंजामिनवर छापखान्यांतील सर्वाचें प्रेम होतें. बेंजामिन निघून गेल्यावर हे नोकर सुध्दां संधी सापडली तर निघून जाण्यास तयार होते. मेरिडिथच्या बापाच्या मनांत असें होतें कीं आपल्या मुलानें स्वातंत्र धंदा करावा. मेरिडिथच्या मनांत असा विचार आला कीं बेंजामिन यास साथीदार घेऊन आपण एक नवीन छापखाना काढावा. बेंजामिन व अशा रीतीनें त्या घमेंडखोर व उध्दट मालाकाचा छापखाना बसेल. मेरिडिथच्या मनांत असें मनोराज्य चाललें होतें. आज त्यानें येऊन हे सर्व विचार बेंजामिन यास कळविलें. बेंजामिन म्हणाला ''तुझे वडील पैसे देणार नाहींत; आधीं त्यांना विचारून पहा. ''

मेरिडिथ यानें योग्य संधी पाहून आपल्या वडिलांजवळ ही गोष्ट काढली. बेंजामिन सहकार्य करण्यास, साथींदार होण्यास कबूल आहे हें ऐकतांच वडिलांनीं कांहीं एक शंका मनांत न आणतां पैसे देण्याचे कबूल केलें. पहा. बेंजामिनच्या नांवाला कशी किंमत आली होती ! बेंजामिन म्हणजे मूर्तिमंत उद्योग, मूर्तिमंत व्यवस्थितपणा बेंजामिन जेथें असेल तेथें सिध्दि येणारच असें सर्व विचारी माणसांस वाटूं लागलें होतें.

मेरिडिथनें ही गोष्ट बेंजामिन यास कळविली. परंतु यंत्रसामुग्री इंग्लंडहून मागवावयाची. ती येईपर्यंत ती बोस्टनला जातों असें बेंजामिन मेरिडिथला म्हणाला. परंतु मेरिडिथ यानें दुसरीच गोष्ट, दुसराच विचार बेंजामिनसमोर ठेविला. यावेळेस अमेरिकन सरकारास नवीन नोटा तयार करावयाच्या होत्या. हें काम करण्यास लायक असा इसम म्हणजे बेंजामिन हा होता. हें काम करण्यास लायक असा इसम म्हणजे बेंजामिन हा होता. तेव्हां बेंजामिन यास जास्त पगार देऊन पुनरपि कामावर घेण्यास तो जुना मालक तयार होता. ''आपण ही जागा पुन्हां स्वीकारा ''असें मेरिडिथ बेंजामिनला म्हणाला. परंतु बेंजामिन - स्वाभिमानी बेंजामिन या गोष्टीस तयार होईना.

बेंजामिन फ्रँकलिन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रस्तावना 1 थोडा पूर्व इतिहास 1 जन्म -बालपण 1 जन्म -बालपण 2 जन्म -बालपण 3 आरंभीचे उद्योग 1 आरंभीचे उद्योग 2 आरंभीचे उद्योग 3 आरंभीचे उद्योग 4 फिलाडेल्फिया येथील हकीगत 1 फिलाडेल्फिया येथील हकीगत 2 फिलाडेल्फिया येथील हकीगत 3 फिलाडेल्फिया येथील हकीगत 4 इंग्लंडला प्रयाण 1 इंग्लंडला प्रयाण 2 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 1 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 2 स्वदेशास प्रत्यागमन व नवीन उद्योगधंदे 3 प्रयत्नांत यश:सिद्धि 1 प्रयत्नांत यश:सिद्धि 2 सार्वजनिक कामगिरी 1 सार्वजनिक कामगिरी 2 शास्त्रीय कामगिरी 1 शास्त्रीय कामगिरी 2 राजकीय कामगिरी 1 राजकीय कामगिरी 2 * अंत व उपसंहार 1 * अंत व उपसंहार 2