आरंभीचे उद्योग 4
आपण कविताही करून पहावी असें बेंजामिन यास आतां वाटूं लागलें. त्यानें एक कविता केली व ती आपल्या भावास दाखविली, भावास ती कविता आवडली. त्यानें ती कविता प्रसिध्द करण्यास परवानगी दिली. बेंजामिन यानें ती कविता ७ वर्षाचा बेंजामिन छपली व रस्त्यांत मोठमोठयानें ओरडून ती विकली व पुष्कळ खपली. परंतु ज्या वेळीं बेंजामिनच्या बापास ही गोष्ट कळली तेव्हां त्यानें मुलाची चांगलीच कानउघाडणी केली. 'तुझ्यांत जिवंत काव्यशक्ति नाहीं; असल्या भलत्या फंदांत पडूं नको. हा अव्यापारेपु व्यापार आहे ' वगैरे जोशिया कठोर बोलला. बेंजामिनच्या वडिलांनीं मुलाच्या प्रयत्नांचें लेखनप्रयत्नांचें कधीं कौतुक केलें नाही व उत्तेजन दिलें नाहीं. बेंजामिन यानें कविता करण्याचें सोडून दिलें, परंतु कविता करण्याच्या प्रयत्नानें शब्दसंचय वाढतो म्हणून तो आपल्या स्वत:शींच कविता करी.
आतां एक महत्वाची गोष्ट घडून आली. करंट पत्रांतील कांही मजकुराबद्दल जेम्स यास शिक्षा झाली. जेम्सनें आपली बाजू स्पष्टपणें पुढें मांडली. तथापि त्यास कारागृहांत जाणें भाग होतें. आपणांस शिक्षा होणार व वर्तमानपत्र आतां बंद पडणार यामुळें जेम्स यास वाईट वाटलें. बेंजामिन यास संपादक केलें तर - असा त्याच्या मनांत विचार आला व तसेंच करण्याचें त्यानें ठरविलें. परंतु बेंजामिन यास संपादक करणें म्हणजे उमेदवारीच्या करारांतून त्यास मुक्त केलें पाहिजे होतें. बेंजामिन यास बाह्यत: करारमुक्त तर केलें, परंतु बेंजामिननें या संधीचा फायदा घेऊन, कोठें पळून जावयाचें नाही असें ठरले होतें. सरकारास दाखविण्यासाठीं मात्र करारमुक्तता खरी नव्हें.
१७ वर्षाचा बेंजामिन वर्तमानपत्राचा संपादक झाला. सतरासुध्दां नव्हे, पंधराच वर्षाचें वय ! परंतु बेंजामिन यानें किती तरी तयारी आजपर्यंत केली हाती. त्याच्या लेखांत विनोद, चातुर्य, खोंचदारपणा सर्व कांहीं दिसून येई. उगीच नव्हतीं ऍडिसनच्या लेखांचीं पारायणे त्यानें केलीं ती. जो तो बेंजामिनची स्तुती करूं लागला व त्याचे लेख वाचून मान डोलवूं लागला. जगांत इतक्या बालवयांत इतका यशस्वी संपादक दुसरा कोणी झालेला आमच्या तरी ऐकिवांत नाहीं.
जेम्स शिक्षा भोगून आतां मोकळा झाला. आपल्या भावाची स्तुतिस्तोत्रें त्यास विषमय वाटूं लागलीं. बेंजामिनचा बोलबाला ऐकून जेम्स हा त्याला छळूं लागला. तो आधींच त्या निम्मे पैसे देई, खरें पाहिलें तर बेंजामिन जरी शाकाहारी झाला तरी जेम्सनें त्यास सर्व पैसे देणं रास्त होतें. जेम्स बेंजामिन यास टाकून घालून पाडून बोलूं लागला, अलीकडे तर तो जास्तच क्रूरता दाखवूं लागला, कधीं कधीं मारहाणीपर्यत पाळी येई. जेम्स यानें बेंजामिनला फटकेही मारले ! सहनशीलतेलाही सीमा असते, ती सीमा आतां संपली !
बेंजामिन याचा स्वाभिमान आतां जागृत झाला. बेंजामिनचीं स्वतंत्र धार्मिक मतें ही गोष्ट जेम्सच्या पथ्यावर पडली. त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो त्याची नालस्ती करूं लागला. बेंजामिन यांस दुसरीकडे नोकरीस जावें असें वाटूं लागलें. यासाठी तो गुप्त करारनाम्याची मदत घेणार होता. त्याच्या भावानें त्यास जाहीररीत्या तरी मुक्त केलें होतें. बेंजामिननें या खोटया गोष्टीचा फायदा घ्यावयाचा नाहीं, असें कबूल केलें होतें. परंतु भाऊ जेव्हां फार त्रास देतो असें बेननें पाहिलें तेव्हां तो एक दिवस जेम्सला म्हणाला ''हा मुक्ततेचा करारनामा माझ्या हातांत आहे; मी तुझ्या येथून निघून कोठें तरी अन्यत्र जाणार. ''परंतु जेम्स मोठा दुष्ट होता. बेंजामिन यास घेऊ नका, तो वाईट आहे; नास्तिक आहे असें सांगून जेंम्सनें बोस्टन येथील सर्व छापखानेवाल्यांचें कान बेंजामिनच्याविरुध्द विषानें भरून ठेविले. ही गोष्ट बेंजामिन यांस कळली. त्याने जेम्सला याबद्दल निक्षून विचारिलें व दोघांची चांगलीच जुंपली. बेंजामिन यानें बढाईखोर भावास व बोस्टन शहरास रामराम ठोण्याचें ठरविलें व तो तयार करूं लागला.