फिलाडेल्फिया येथील हकीगत 1
बेंजामिननें आपण बोस्टन सोडून जाणार ही गोष्ट कोणासही कळविली नाही; फक्त आपल्या एका स्नेहास त्यानें ही गुप्त गोष्ट सांगितली होती. बेंजामिनचा बाप नेहमीं या वडील भावाची म्हणजे जेम्सचीच बाजू घेई व बेंजामिन यासच तो रागें भरे. लहानपणी बेंजामिन यास वाटे कीं आपण नामांकित खलाशी व्हावें, नानादेश पहावें, नाना प्रकारच्या लोकांच्या चालीरीती पहाव्या, समुद्र व वारे यांची मजा पहावी, धाडस व पराक्रम अंगीं आणावीं; इत्यादि विचार बेंजामिनच्या मनांत लहानपणीं वरचेवर येत. परंतु बेंजामिनचा आणखी एक वडील भाऊ या दर्यावर्दीपणाच्याच नादानें १२ वर्षे नाहीसा झालेला होता; ही ह्दयविदारक गोष्ट स्पष्ट डोळयांसमोर असल्यामुळें समुद्रावरचा मुशाफर होण्याच्या नादांत कधीं पडूं नको; असला विचार स्वप्नांतही मनांत आणू नको. 'परंतु बेंजामिन आतां पुनरपि समुद्रप्रवासासच निघणार होता. बंदारांत एक गलबत आलें होतें. त्या गलबतावरील कप्तानाची व बेंजामिनच्या मित्राची चांगली ओळख होती, त्यामुळें बेंजामिनच्या गुप्तपणें जाण्याची व्यवस्था नीट लागली व बेंजामिननें बोस्टनला रामराम ठोकला.
बेंजामिन हा फलाहारी झाला होता हें मागें सांगितलेंच आहे. परंतु गलबतांत असतां त्यास फलाहार सोडून देणें प्राप्त झालें. गलबतांत त्यास मत्स्याहारी, मांसाहारी बनावें लागलें. बेंजामिन न्यू यार्क येथें उतरला व तेथें उतरल्यावर नौकरीसाठीं तो चौकशी करूं लागला. एक गृहस्थ म्हणाला ''माझा मुलगा फिलाडेल्फिया येथें आहे, त्याच्या छापखान्यांतील एक कामकरी मनुष्य मेल्यामुळें त्याला एका नोकराची जरूरी आहे; तरी तुम्ही त्याच्याकडे जा. ''
बेंजामिन फिलाडेल्फिया येथं जाण्यास तयार झाला. तो प्रथम अभाय येथें उतरला. येथें जात असतां गलबतांतील एक डच मनुष्य दारू पिऊन समुद्रांत पडला, त्यास बेंजामिननें वांचिवलें, वाटेंत जातांना मोठें वादळ झालें. बेंजामिन यास ताप आला. परंतु ताप आला म्हणजे पुष्कळ थंड पाणी प्यावें असें बेंजामिननें वाचलें होतें त्या वाचनाचा प्रयोग करून पाहिला व तो पाणी खूप प्याला. बेंजामिन यास पुष्कळ घाम आला व सुदैवाने तो बरा झाला.
ऍभाय येथें एका म्हाता-या बाईकडे बेंजामिन उतरला होता, त्या बाईकडे त्यानें सोडालेमन वगैरे घेतलें ऍंभाय येथून फिलाडेल्फिया येथें एक गलबत त्याच दिवशीं निघून गेलें होतें. त्यामुळे दुसरें गलबत येईपर्यंत बेंजामिन यास त्या बाईकडे रहाणें प्राप्त होतें. दुस-यास दिवशीं एक गलबत अकस्मात् फिलाडेल्फिया येथें जाण्यास तयार झाले. बेंजामिननें त्या गलबताच्या अधिका-यास ' मला घेता का ? 'अशी परवानगी विचरिली, गलबत अगदीं निघण्याच्या तयारींत होतें. त्यामुळें त्या म्हाता-या बाईचा निरोप घेण्यांसही त्यास वेळ नव्हता. तो तसाच गलबतांत बसला. त्याजवळ सामानसुमान कांही विशेष नव्हतें. कारण स्वत:ची कपडयांची पेटी त्यानें आधींच न्यूयार्कहून पाठवून दिली होती.
गलबतांत बसल्यावर इतराप्रमाणें बेंजामिन यानेंही वल्हविण्याचें काम केलें. त्यानें त्यांतील लोकांच्या बरोबरीनें काम केलें. बेंजामिनचें शहाणपण, युक्ति, शक्ति, कार्यानिपुणता हें सर्व पहून ते सर्व खलाशी त्याच्यावर संतुष्ट होते. शेवटीं एकदांचें फिलाडेल्फिया आलें, बेंजामिन खालीं उतरला व त्यास अत्यानंद झाला. बेंजामिन त्या गलबताच्या मुख्यांस कांहीं पैसे देत होता पण त्यानें ते पैसे घेतले नाहीं. तो बेंजामिन यांस म्हणाला ' इतरांप्रमाणें तूंही काम वगैरे केलेंस, तरी पैसे वगैरे मी घेणार नाहीं. ''