भजन ५१ ते ५५
भजन - ५१
कधी भेटशिल माय दयाळे ! दीन अभाग्यासी ?
बहु त्रासलो मन आवरता, ने अपुल्या पाशी ॥धृ॥
बहिर्सग हा भोवति पाहता, भय वाटे भारी ।
धीर न धरवे पहाडी राहता, चोरांची नगरी ॥१॥
भयाभीत हो उनी, नेत्र धावती तुझ्या पायी ।
या षड् रिपुचा मेळा पाहता, घाबरलो आई ! ॥२॥
नाहि योग-साधना समजली, वर नेऊ प्राणा ।
शिकावयाची नुरली इच्छा, सोडुनिया चरणा ॥३॥
भक्त-काम कल्पद्रुम तू गे ! घे करुणा माते ! ।
तुकड्यादासा प्रेम दावुनी, ने अपुल्या पंथे ॥४॥
भजन - ५२
का धरिशी मनि कोप दयाळा ! वद गिरिजा-रमणा ! ।
नको दुरावू दीन अभाग्या, घे अपुल्या चरणा ॥धृ॥
तात-मात-गणगीत तुझ्याविण, कोणि नसे वाली ।
का लोटियशी निष्ठुर हो उनि, कृपणा वनमाली ! ॥१॥
सोडुनिया तव चरण दयाळा । जाउ कुठे रानी ? ।
निर्बळासि भय दावुनि म्हणशी 'मजला नच मानी ' ॥२॥
नको मला हा प्रपंच-भारा, तुझ्या मायिकांचा ।
येउनिया दे भेट कृपाळा ! निश्चय अंतरिचा ॥३॥
भक्त-काम-कल्पद्रूम म्हणविशि, वेद-मुखेकरुनी ।
तुकड्याची ही आशा पुरवी, भव ने हा हरुनी ॥४॥
भजन - ५३
सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया ! ।
प्रारब्धाचा भोग चुकेना, भ्रमवी अवनी या ॥धृ॥
'सखा सहोदर पाहु कुठे तरि ? ' म्हणतो जिव माझा ।
जे भेटति ते स्वार्थी लोभी, कोणि न ये काजा ॥१॥
महाकाळ विक्राळ काम हा, भोवति घे घिरट्या ।
संतसंग किति करू कळेना, पळहि न ये वाट्या ॥२॥
जिकडे तिकडे 'मी मोठा, मी मोठा' ही वाणी ।
भक्तिवर्म ते न दिसे कोठे, दुःखाची खाणी ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, मग कोणी नाही ।
राख राख रे ब्रीद दयाळा ! आलो तव पायी ॥४॥
भजन - ५४
सोडशील का माया माझी ? श्रीपंढरीराया ! ।
कोण लाज राखिल ? देह हा जाइल गा ! वाया ॥धृ॥
काम-क्रोध मद-मत्सर सारे, जमले वळवाया ।
भक्ति-आड येऊनि, भाव तो नेती ओढुनिया ॥१॥
मन चंचल, कधि स्थिर राहिना, पहाते फसवाया ।
बुध्दीने वेष्टिला जीव हा, काय सांगु सखया ! ॥२॥
तूच गड्यारे ! गडी कोण मग येई ताराया ? ।
सगे-सोयरे पळती सारे, जमले ओढाया ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, कोणी मग नाही ।
पुरा जाणला विचार याचा, ने अपुल्या पायी ॥४॥
भजन - ५५
रक्षि रक्षि सद्गुरूमाय ! मज कोणि दुजा नाही ।
जाइल वाया तुजविण काया, फसलो भवडोही ॥धृ॥
त्रैतापाचा अग्नि लागला, पडलो त्यामाजी ।
काम-क्रोध-मद-मत्सर वैरी, खाती मज आजी ॥१॥
स्पर्श-रूप-गंधादिक जमले, शरिरी भय भारी ।
त्या माजी मन चंचल झाले, बुडवी भवधारी ॥२॥
आयुष्याची दोरी, यमाजी-उंदिर तोड करी ।
झुरणी पडले वय हे सारे, ये सखये ! तारी ॥३॥
ऎशा या पाशातुनि सुटका, कशि होइल माते ! ।
तुकड्यादासा मुक्त करी, ने पदपंकजपंथे ॥४॥