भजन ४६ ते ५०
भजन - ४६
अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥धृ॥
किति धनिक तुझे कुल होते, तुज भानचि याचे नव्हते ।
ही विघ्ने कुठुनी आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥१॥
तव गोत ऋषींनी भरले, क्षत्रिये द्वार रक्षीले ।
का अघटित चिंता व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥२॥
अति कलावान तव स्नेही, ज्या पहातचि परके राही ।
भिक्षेची वेळ ही आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥३॥
या एकचि कारण झाले, तव घरी ऎक्य ना उरले ।
घरभेदी दिवटी व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥४॥
तुकड्याची भोळी वाणी, घेशिल का थोडी कानी ? ।
तू दुजा भीक ना घाली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥५॥
भजन - ४७
पावना सख्या श्रीरामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥धृ॥
मशि भेट एकदा वाटे, हा जीव जरा ना कंठे ।
ये मुनिजन-मन-विश्रामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥१॥
नर-जन्माचे सार्थक हे, तव रूप पाहणे सुख हे ।
मग कोणि न येति कामा, मनमोहन मेघश्यामा ! ॥२॥
अनुभवी सांगतो ऎसे, तू जीवाचा सुखराशी ।
तुकड्याचा पुरवी प्रेमा, मनमोहन मेधश्यामा ! ॥३॥
भजन - ४८
रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया ।
रामेश्वर लिंगाचे दर्शन, झाले नेत्रा या ॥धृ॥
अती पुरातन भव्य स्थान हे, हेमाडी बांधी ।
नखशिखांत कोरुनी बसविला, सामोरी नंदी ॥१॥
सुंदर मनकर्णिका जलाने, भरली अति गोड ।
गमे जणू ही काशिच दुसरी, कोरियला पहाड ॥२॥
रूप मनोहर सांळुकेवरि, रामेश्वर लिंग ।
वेद-गर्जना, धार जलाची चालतसे चांग ॥३॥
सदा सोवळा हा शिए भोळा, अलंकार यासी ।
काशीमध्ये भस्म लावतो, उलट रीत इथची ॥४॥
उष्ण जले अभ्यंग स्नाने, बघली मी त्याची ।
अति श्रृंगार चढे अंगावर, शोभा बहु साची ॥५॥
घननन घननन वाजति घंटे, गर्जतसे भेरी ।
द्वारि चौघडा वाजंत्रेही, वाजे अति प्यारी ॥६॥
तल्लिन मन झाले बघताना, कृतार्थ जिव झाला ।
तुकड्यादास म्हणे दर्शनि हा, तारी सकलाला ॥७॥
भजन - ४९
अनुभव-योगी सद्गुरु माझा, एकांती बोले ।
स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोबिशि अपुले ॥धृ॥
शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता ।
मायावी हे त्रिगुण जाणुनि, नच जा या पंथा ॥१॥
चिन्मयरूपा पाहि स्वरूपा, कां भुलला बापा !
सहजासनि बैसुनी सोडवी, चौर्यांशी खेपा ॥२॥
चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल ।
अधो-ऊर्ध्व त्या शुन्य-महाशून्यात असे बाळ ॥३॥
नाद-बिंदु साधुनी, ध्वनीला अंतर्गत ठेवी ।
ध्यानी ध्याता साक्षी होशी, मग अमृत सेवी ॥४॥
नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा ।
तुकड्यादास म्हणे स्वानंदी, पावे भव भंगा ॥५॥
भजन - ५०
आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई ! ।
जाइल वाया ही नरकाया, वेळ बरी नाही ॥धृ॥
बाळपणापासुनी व्यर्थ ही, तनु गेली वाया ।
कोठवरी दुःखाचे डोंगर, सोसु शरिरी या ? ॥१॥
'हे माझे ते माझे' म्हणता, नच निवती डोळे ।
विषयसुखाच्या गरळी माते ! रात-दिवस खेळे ॥२॥
सुख नाही क्षण-मात्र जिवाला, गति श्वानावाणी ।
पोटाच्या कारणे धडपडी, सुकरवत जाणी ॥३॥
भले पसरले अधोर वन हे, पडलो त्या माजी।
काम-क्रोध-मद-मत्सर श्वापद, शरिरांतरि गाजी ॥४॥
ऎसि ऎकिली मात दयाळे ! तूचि दया करिशी ।
भक्तकामकल्पद्रुम जाणुनि, आलो तुजपाशी ॥५॥
तुकड्याला दे ठाव, पार कर नाव अभाग्याची ।
न तरी गेले ब्रिद हे वाया, तुला लाज याची ॥६॥