भजन २६ ते ३०
भजन - २६
क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे ।
करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥
(अंतरा)
जरि योग-याग बहु केले ।
मन-पवन समाधी नेले ।
वनि निर्जनि घर बांधियले ।
तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥
(अंतरा)
जगि तीर्थधामही नाना ।
दरिकंदरि ऋषिच्या स्थाना ।
जी मोहविती शरिरांना ।
ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥
(अंतरा)
अति पंथ-मतांतर लोकी ।
परि आस पुरेना एकी ।
जळजळती एकामेकी ।
नच शांति वृत्तिला येइ, करी हृदया कावरे ॥३॥
(अंतरा)
सत् संग सुगम यासाठी ।
व्हावया वृत्ति उफराटी ।
परि बोध पाहिजे गाठी ।
विश्वास असा तुकड्यास,'अनुभवा दे भाव' रे ! ॥४॥
भजन - २७
हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी ।
उलटली परवशता ही पुरी ॥
गुलामगिरिच्या कर्कशा बेड्या, पडल्या पायी करी ।
धडकले परधर्माचे अरी ॥
तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी ।
लावती आग घरीचे घरी ।
(अंतरा)
'हिंदु'चा नाश व्हावया चिंतिती मनी ।
अति दुर्बल केला देश चहुबाजुनी ।
वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी ।
रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी ।
सखा हा भारत चिंता करी ॥१॥
गजांत-लक्ष्मी डुलली जेथे, सौभाग्याच्या गुणे ।
न होते काहि कुणाला उणे ।
सौख्य नांदले अखंड जेथे, 'रामराज्य' दणदणे ।
खेळले सैनिक निर्भयपणे ॥
तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे ।
भोगिले वैभव भारत-भुने ।
(अंतरा)
उतरला राहु आणि केतू हा अवकली ।
अन्नान्नदशा ही भारतभू पावली ।
ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली ।
असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी ।
सखा हा भारत चिंता करी ॥२॥
काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा ।
त्यातुनी काय काय ऎकता ? ॥
गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? ।
दुसरा झाला हा मागुता ॥
सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता ।
रहावे सावध अपुल्या हिता ।
(अंतरा)
सांगतो राम हा उपासकांच्या प्रती ।
'व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती' ।
यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती ।
करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी ।
सखा हा भारत चिंता करी ॥३॥
मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! ।
सिंधुच्या मर्यादित बिंदुनो ! ॥
कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! ।
लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ॥
शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! ।
उभी व्हा तरुणांनो ! बंधुनो ! ॥
(अंतरा)
हा धर्म-ध्वज घ्या करी, जपा मिळुनिया ।
कमवाच आपुला हक्क 'हक्क' म्हणुनिया ।
आळवा अंतरी देवदेवतासि या ।
तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी ।
सखा हा भारत चिंता करी ॥४॥
भजन - २८
बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ?
हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥
स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।
सोडुनी आज दशा का अशी ? ॥
वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे ।
सोडुनी वन-वन का फिरतसे ? ॥
भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ?
बावरा फिरशी का एकला ? ॥
(अंतरा)
तव मुकुत भक्त-हिरकणे विखुरले कसे ? ।
तव हृदय-कवच पंडीतहि जागी नसे ।
कर-कमालीची तरवार वीर ना दिसे ।
धैर्य-तेज-विजयता लीपलो, प्रसंग दुर्दैवसा ।
सांग बा ! प्राप्त जाहला कसा ? ॥१॥
तुझ्या कीर्तीची ध्वजा पहाता आयुष्यही ना पुरे ।
गंज-अधिगंज पुराणे भरे ॥
रत्नजडित किति कनक रुप्याचे जडाव तव साजिरे ।
गजावर लक्ष्मि भरार्या करे ॥
सदा सुखी आनंदित जनता, वीर वृध्द-लेकुरे ।
खेळती सिंह जसे वनि फिरे ॥
(अंतरा)
श्रीमंत-संत आणि राव-रंक एकसे ।
नच भेद कुणाला तयी कधी गमतसे ।
अधिकारान्वघि ते आरुढले, समरसे ।
अघोर संकट दिसे अचानक, जशी उतरली नशा ।
नसातुनि रंग दिसे भलतिसा ॥२॥
कष्ट करीता ढोरासम ही पिके न शेती जरा ।
द्रव्य व्यसनात होतसे चुरा ॥
विषयांधासम फिरती तरुणहि, तरुणी दुसर्या घरा ।
शांति ना मना तयांच्या जरा ॥
ऋतु काळ ना बघे, कधी जल, उष्ण वाढती मधे ।
वाहती वेळ-अवेळी नदे ॥
(अंतरा)
काय ही दुर्दशा आली ग्रहणे जशी ।
निर्जली निर्फली दुर्बल झाली कृषी ।
ती गजांतलक्ष्मी पळे, गमे परकिसी ।
चिन्ह दिसेना बरे, ऊठ तरि सावध होई कसा ।
कळेना काय ? स्वस्थ तू असा ॥३॥
निरिक्षुनी पाहता तुजकडे दिसशी वेड्यापरी ।
कोण हे ओढिति तुज बाहेरी ? ॥
परिस्थितीच्या लाल धुरंधर ज्वाला भवतालुनी ।
पोहोचल्या पेट घेत आतुनी ॥
निसर्ग वन साजिरे, धैर्य-बलवीर वृक्ष कडकडे ।
अग्निने जागि जळोनी पडे ॥
(अंतरा)
कुणि शांतविता नाहीच तुझ्या बाजुला ।
हे पुत्र असुनिया करिती अरि-गलबला ।
ओढती आप आपुल्याकडॆ तुजला ।
काळ वेळ ही अशी पातली, पाहतो का प्रभु असा ? ।
पुढे तरि देइल का भरवसा ? ॥४॥
भयाण ऎशा कठिण प्रसंगी साथ कोण दे तुला ?
बोल हा आठवतो का खुला ? ॥
राहु-केतुच्या कचाटियातुनि बंध तोडुनी तुझे ।
कोण उचलतील बा ! हे वझे ? ॥
अर्धोन्मिलितापरी प्राण तव, छिन्न-भिन्न गमतसे ।
कोण तव यश घेइल सायसे ? ॥
(अंतरा)
दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे ।
तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे
धावतील ओढाया असुरांच्या जिभे ।
तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा ।
मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा ! ॥५॥
भजन - २९
राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहताना अंतरी ।
नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ॥धृ॥
पर सुखदुःखे मान आपुली, निष्कामी हो उनी ।
कार्य कर न्याय-नीती सेवुनी ॥
सद् धर्माच्या तत्त्व-तंतुला तोडु नको धावुनी ।
रुढीला नाचु नको घेउनी ॥
(अंतरा)
राष्ट्रीय बंधु-भावना रमू दे जगी ।
वाढवी प्रेम आपुल्य-पराच्या मधी ।
जातिंचे कडक निर्बंध ढिले कर अधी ।
स्वैरपणे रंगु दे वीर स्वातंत्र्य धराया करी ।
लावि ही ध्वजा दिगंतावरी ॥१॥
तत्त्व शोधल्याविणा कुणाची करू नको खंडणा ।
अधिकसा मांडु नको फड दुणा ।
निसर्ग-जग हा बाग प्रभुचा, रमवी मनि भावना ।
दुःखवू नको कुणाच्या मना ।
फुले फळे ही सुंदर निघतिल, कोण जाणतो खुणा ?
सुगंधे रुंजू दे मन्मना ॥
(अंतरा)
वाहु दे लाट ही जोराची आतुनी ।
'कुणी उठा उठा हो ! या पुढती धाउनी ।
करु राष्ट्र-धर्म-हा जागा अपुल्यातुनी' ।
ऎक्यपणाचे बाहु उभारुनि करू गर्जना बरी ।
होउ दे तरुण-वृत्ति बावरी ॥२॥
वेळ अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले ।
कर्म आचरोनि समयी भले ॥
देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले ।
पाहिजे सदा मनी शोधिले ॥
पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले ।
चलावे थोरांच्या पाउले ॥
(अंतरा)
ही याद असू दे, विसरु नको चालता ।
जरि काळ आडवा आला कर पालथा ।
सोड ही आता तरि भोळिव निर्जीवता ।
तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी ।
पडु दे प्राण प्रसंगावरी ॥३॥
भजन - ३०
श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना ।
उसळती वीर-बोध-भावना ॥धृ॥
सळसळता तै लाट वृत्तिची गीता-वाणीतुनी ।
निघाला ज्ञानांकुर गर्जुनी ॥
रणांगणावरि कठिण प्रसंगी, बोध करी वेधुनी ।
'उभा हो पार्थ सख्या !' म्हणउनी ॥
(अंतरा)
'हो जागा कर्तव्याला, घे गांडिवा ।
उजळवी जगी या विजयश्रीचा दिवा ।
दाखवी जगाला नीतिमार्ग हा नवा ।
धर्म-रक्षणा करावयासी तूच सख्या ! शाहणा ।
भिउ नको लढण्या समरांगणा'॥१॥
'अन्यायाला सहन करूनी जगणे नाही बरे ।
मरावे धर्म रक्षुनी खरे ॥
पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा ।
करावा नाश लढोनि पुरा ॥
क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा ।
फिरु नये रणांगणाहुनि घरा' ।
(अंतरा)
विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी ।
ठसविता शब्द हे विजय होय भुवरी ।
या करा तातडी वेळ नसे ही बरी ।
उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना ।
वाजती रण-वाद्ये दणदणा ॥२॥
भारतभूच्या तरुणासाठी बोध देउनी सखे ।
जाहले जय घेउनि पारखे ॥
सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे ।
विरु नका होउनि हृदयी फिके ॥
कर्तव्याची ज्योत जागती सदा असु द्या मनी ।
बोध घ्या गीताजयंतीतुनी ॥
(अंतरा)
धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना ।
थरथरा कापती शत्रुंच्या भावना ।
पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा ।
तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना ।
धरा हृदयाशि नंद-नंदना ॥३॥
शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी ।
नाहि त्या नाशक कुणि औषधि ।
धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी ।
बोध द्या तरुणा हृदयामधी ॥
उठ उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला ।
प्रार्थुया परमेशा-पाउला ॥
(अंतरा)
हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी ।
पूर्वजा दुःख बहु, पाहुनिय घातकी ।
अनुभवा आणता सर्वचि होती सुखी ।
तुकड्यादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा ।
रंगवा रणांगणी जीवना ॥४॥